"तुमच्या बालकांना निर्भिड बनवा. त्यांना माझ्यासोबत ठेवा. इथे राहून ते जिन राक्षसाला पाहतील, बघतील. मग जिन त्यांचा गुलाम बनेल. मग काय मुलांचे आणि कुटुंबाचे भवितव्य उज्ज्वल,” असे तो पिरबाबा म्हणजे, अजाज अहमद शेख सांगायचा. त्याचे मुरीद असलेले लोक, बालकांना त्याच्यासोबत राहायला पाठवायचे. मात्र, हा पिरबाबा जिनचा मुखवटा आणि तसे वेषांतर करून, या लहान मुलांवर बलात्कार करायचा. एका पालकाने याबाबत २०१६ साली पोलिसांत तक्रार केली आणि आता नऊ वर्षांनी, पिरबाबा अजाज अहमद शेख याला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आठ मुलांच्या साक्षीवरून आणि दोन मुलांच्या तक्रारीवरून, काश्मीर सोपोरच्या ‘चीफ ज्युडीशियल मॅजिस्ट्रेट’ अर्थात ‘सीजेएम’ने मीर वजाहत यांनी ’रणबीर पीनल कोड (आरपीसी)’चे ‘कलम ३७७’ अंतर्गत, या पिरबाबा अजाज अहमद शेखला शिक्षा सुनावली आहे.
२०१६ साली पोलिसांकडे तक्रार केलेल्या घटनेबद्दल, तब्बल नऊ वर्षांनी न्यायप्रक्रिया पूर्ण झाली. कारण काय? तर गुन्हेगार हा पिरबाबा म्हणून वावरायचा. धार्मिक दहशत आणि मुख्यत: समाजामध्ये भीती होती, की या बाबाच्या विरोधात बोलले तर नक्कीच आपल्याला दोजखमध्ये(नरक)जावे लागेल. या अंधश्रद्धेमुळे पीडित बालकांचे पालक, गुन्हेगाराविरोधात तक्रार करायला किंवा साक्ष द्यायला पुढे येत नव्हते. पिरबाबा म्हणून समाजात ओळख असलेल्या व्यक्तीला बालकांचा बलात्कार करणारा बाबा म्हणून शिक्षा भोगावी लागली, तर यात कौमची बदनामी होईल, असे मानणाराही वर्ग होताच. त्यामुळे २०१६ साली तुरूंगात गेल्या गेल्या एका महिन्यात, हा अजाज शेख जामीन मिळवून बाहेरही आला होता. दुसरीकडे या पिरबाबाच्या कुटुंबाने, न्यायालयाच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, काय म्हणावे? दुसरीकडे पाल्यावर अत्याचार करणार्या गुन्हेगाराची नाईलाज म्हणूनही पाठराखण, काही पालक करत होते, यापेक्षा दुसरे दुर्दैव काय? बरं, या गुन्हेेगाराने शोषण केले, तेसुद्धा त्याच्या कौममधलेच होते. तरीही ‘पिरबाबा’ या संज्ञेबद्दल लोकांमध्ये चांगलीच प्रतिमा राहावी म्हणून, त्याच्या कृत्याकडे समाजाच्या मोठ्या वर्गाने कानाडोळा करणे, हे गंभीरच आहे. खरे तर ही घटना म्हणजे हिमनगाचे टोक असावे. धार्मिक कट्टरतेचा आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणारे असे कितीतरी गुन्हेगार लपलेले आहेत.
विकृतीविरोधात लढा!
लग्नसमारंभाहून त्या पाच अल्पवयीन मुली परतत होत्या. नदी ओलांडत असतानाच १८ मुलांनी त्यांना अडवले. या मुलांनी त्या पाच बालिकांवर सामूदायिक बलात्कार केला. यातना, वेदना आणि बरंच काही, या मुलींच्या वाट्याला आले. या १८ मुलांचे वय काय, तर वय वर्षे १२ ते १७. या नराधमांना पोलिसांनी पकडले. ही घटना आहे झारखंडची. या बलात्कारकांडातील १६ वर्षांवरील मुलांवर प्रौढ व्यक्तींसाठी असलेल्या कायद्यानेच खटला चालणार आहे. १६ वर्षांखालील गुन्हेगारांना, बालसुधारगृहात पाठवले जाणार आहे. पण, त्या मुलींचे काय? बलात्कार झाला म्हणजे आयुष्याचा शेवट होत नसतो, हे शहाण्या समाजाचे म्हणणे. असे असले तरी, झारखंडच्या दुर्गम खेड्यातील या पाच बालिकांचे जगणे इतर मुलींसारखे सहज सुलभ राहणार आहे का? या मुलींची काय चूक होती? नव्हे बलात्कारित शोषित-पीडित बालिका, मुली, महिला यांची काय चूक असते? पण, कुणीतरी त्यांच्या आत्मसन्मानावर, देहभानावर आणि स्वप्नांवरही अत्याचार करतो आणि त्यांच्या मनाला, शरीराला शब्दातीत दु:ख वेदना देतो. अर्थात जावे त्यांच्या वंशा....
त्यामुळे वाटते की, बलात्कार करणारा गुन्हेगार बारा वर्षांचा असू दे किंवा कितीही वर्षांचा असू दे, त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा झालीच पाहिजे. असाहाय्य बालिकांवर अत्याचार करण्याची कुप्रवृत्ती जर वयाच्या बाराव्या वर्षी असेल, तर त्याच्या कुप्रवृत्तीला शिक्षा व्हायलाच हवी. गुन्ह्याला माफी नाही, हेच सूत्र हवे. याच घटनेतील नव्हे, तर देशातील कोणत्याही बलात्कारासंदर्भात घटनेतली गुन्हेगार हा अल्पवयीन आहे, म्हणून त्याच्यासाठी कमी शिक्षा हे तर्काच्या दृष्टीने पटते का? आता कुणी म्हणेल की, अल्पवयीन मुलांना समज नसते, गुन्ह्यांची ओळख नसते, अज्ञानामुळे ते गुन्हा करतात, मानवी दृष्टीतून त्यांना सुधारण्याची संधी द्यायला हवी, मान्य आहे. पण, मानवी जीवन, भावना आणि हक्क त्या अल्पवयीन गुन्हेगारासारखेच त्या पीडित बलात्कारित मुली महिलांनाही आहेच ना? त्यामुळेच वाटते की, बलात्कार प्रकरणात दोषी असणार्या अल्पवयीन मुलांनाही, प्रौढ गुन्हेगारांसारखीच शिक्षा व्हायला हवी. गुन्हा केल्यावर होणार्या शिक्षेबद्दलही, बालक आणि युवकांमध्ये जागृती व्हायला हवी. या विकृतीविरोधात समाजाने सर्वार्थाने लढा पुकारायला हवा!