जनजाती क्षेत्रातील वंचित विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने, अविरत कार्य करणारे ‘पेन्स सहयोग फाऊंडेशन’चे योगेश सावे यांच्या कार्याविषयी...
महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेलगत असलेल्या डहाणू तालुक्यात, चिंचणी नावाचे एक गाव आहे. या गावात राहणारे योगेश हरेश्वर सावे गेली दहा वर्षे जनजाती क्षेत्रातील वंचित विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी विशेष कार्य करत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या ‘पेन्स सहयोग फाऊंडेशन’च्या माध्यमातून, गेल्या आठ वर्षांत झालेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. एका नामांकित कंपनीत उच्च पदावर काम करत असतानाही, ‘या देशाचे आणि एकाअर्थी या समाजाचे आपण देणे लागतो’ या विचारापासून ते कधी लांब गेले नाहीत. यातूनच त्यांनी, आपल्या जन्मभूमीसाठी आपले सर्वस्व वाहिल्याचे दिसते.
योगेश सावे यांचा जन्म दि. २३ ऑगस्ट १९७७ रोजी, चिंचणी गावातच झाला. इथल्या जि.प.मराठी शाळेत त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. रा. हि. सावे विद्यालय, तारापूर या ठिकाणी, मराठी माध्यमिक शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षणही घेतले. पुढे चिंचणीतच ‘विज्ञान’ विषयात कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी मुंबई येथून ‘इलेक्ट्रॉनिस’ या विषयात अभियांत्रिकी पदवी घेतली. अनेक आयटी कंपनीमध्ये नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर, गेली १८ वर्षे ‘टाटा कन्सल्टन्सी’मध्ये ‘आयटी कन्सल्टन्ट’ म्हणून नोकरी करत आहेत. घरी सध्या आई, बायको, मुलगी, मुलगा असा परिवार असून, संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
नोकरीनिमित्त मुंबई येथे जाणे झाले असले, तरी योगेश यांना आपल्या गावातील संघर्षमय जीवनाची जाणीव होती. त्यामुळे गावातील लोकांसाठी, त्यांच्या रोजगारासाठी आपण काहीतरी करावे असे त्यांना कायम वाटे. या भावनेने मग २०१६ साली काही मित्रांनी एकत्र येऊन, ’प्रारंभ’ म्हणून एक सुरुवात केली. ग्रामीण भागातील शाळेतल्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडवण्यासाठी आपल्यापरीने मदत करायलाही सुरुवात केली. याकामात त्यांची पत्नी दीप्ती सावे यांनी, त्यांना साथ द्यायची ठरवली. कुटुंब सांभाळून, दोन मुलांची आणि संसाराची जबाबदारी घेऊन, महिलांसाठी कौशल्य आणि रोजगार देण्याच्या सक्षम उपक्रमात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
कार्याला सुरुवात झाल्यानंतर हळूहळू या कार्यात, अनेकजण जोडले गेले. त्यानुसार, २०१८ रोजी ‘पेन्स सहयोग फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि ग्रामीण भागातील शाळेसाठी जोमाने काम चालू झाले. ही संस्था शिक्षण, कौशल्य विकास आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणारी, राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेअंतर्गत ग्रामीण भागात राबवण्यात आलेल्या ‘गुरुकिल्ली’ या उपक्रमातून, आतापर्यंत दहा हजारांपेक्षा अधिक मुलांना शैक्षणिक मदत मिळाली आहे. तसेच, मुलींनाही उच्च शिक्षणासाठी मदत मिळवून देण्यात यश आले आहे. वास्तविक ‘गुरुकिल्ली’ हा ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थ्यांसाठी, एक शैक्षणिक प्रोत्साहन कार्यक्रम आहे. शालेय पायाभूत सुविधांचा अभाव, सार्वजनिक वाहतुकीचा अभाव यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, ‘गुरुकिल्ली’ प्रकल्पांचे प्राथमिक आणि उच्च विभागात वर्गीकरण केले आहे. सध्या ग्रामीण भागातील शाळांसाठी ‘गुरुकिल्ली मॅजिकल लायब्ररी’ या उपक्रमातून, मजेशीर विज्ञान प्रयोगद्वारे मुलांची आकलन शक्ती वाढवण्याचे काम सुरू आहे. त्यामार्फत ४६० पेक्षा अधिक मुलांना फायदा होत आहे. हा उपक्रम डहाणूतील जिल्हा परिषद शाळा, दौडनपाडा, गंजाड, वाणगाव, पालघरच्या अतिदुर्गम भागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठीही राबविण्यात आला आहे.
शिक्षणाबरोबरच गावा-गावातील महिलांचा कौशल्य विकासही व्हावा, या उद्देशाने चालवल्या जाणार्या ‘सक्षम’ नावाच्या उपक्रमाद्वारे, एक हजारांपेक्षा अधिक महिलांना शिवणकामचे कौशल्य देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या पालघरमध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणी सक्षम केंद्र असून, अनेक महिलांना रोजगार मिळतो आहे. विशेष म्हणजे, ‘सक्षम’ उपक्रमाद्वारे ८००हून अधिक जनजाती भागातील शालेय मुलींना भरतकामाचे तसेच, मुलांसाठी सुतारकाम, प्लम्बिंग इत्यादी प्रशिक्षण देऊन, रोजगाराच्या अनेक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्याच बरोबरीने ग्रामीण महिलांसाठी भरतकाम आणि आरिवर्क प्रशिक्षणातून, रोजगार निर्मिती केली जाते आहे. आजघडीला संस्थेने सात गावे दत्तक घेतली असून, त्यांच्या विकासाचे कार्य आपल्या हाती घेतले आहे.
सामाजिक कामासोबतच योगेश यांना पर्यावरणाचीसुद्धा विशेष आवड आहे. गेल्या पाच वर्षांत आपल्या पर्यावरण उपक्रमातून त्यांनी, दहा हजारांपेक्षा अनेक वृक्षलागवड केली आहेत. आपली नोकरी, कुटुंब सांभाळत समाजसेवेचा भार वाहणारे योगेश सावे आणि दीप्ती सावे, पुरस्कार आणि गौरवापासून दूरच राहतात. कारण, देशासाठी आणि समाजासाठी आपल्या हातून काही तरी काम होत आहे, हाच त्यांच्यासाठी मोठा गौरव असून, याच उद्देशाने ते आजवर काम करत आले आहेत. आपल्या गावच्या विकासासाठी, प्रत्येकाने किमान खारीचा वाटा उचलण्याची आज खरी आवश्यकता आहे. योगेश सावे यांनी त्यांच्या कार्यातून, आपल्यासमोर एक अतिशय उत्तम उदाहरण ठेवले आहे. यापासून प्रत्येकानेच प्रेरणा घ्यायला हवी. योगेश यावे यांच्या पुढील वाटचालीसाठी, दै. ‘मुंबई तरुण भारत‘च्यावतीने अनेक शुभेच्छा!