मागील वर्षीच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्या पार्श्वभूमीवर दि. २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करताना ‘एआय’च्या युगात मराठी यावर विचार करणे विशेष आवश्यक ठरते.
चॅटजीपीटी’ आणि आता ‘डीपसीक’ (आणि आता GROK-3) मुळे संपूर्ण जग ढवळून निघाले आहे. आधुनिक युगात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर अनेक क्षेत्रांत ‘एआय’चा वापर वाढत आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये मराठी भाषेचा वापरदेखील महत्त्वपूर्ण ठरत आहे. मराठी ही एक समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची भाषा आहे. मराठी ही जगामध्ये बोलल्या जाणार्या भाषांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात 13वी भाषा आहे, तसेच ती भारताच्या संविधानाच्या आठव्या अनुसूचित असणार्या 22 भाषांपैकी एक आहे.
‘एआय’च्या युगात मराठी भाषेचा वापर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सुकर आणि प्रभावी होऊ शकतो. उदाहरणार्थ, आजकाल स्मार्टफोन आणि कम्प्युटर सिस्टीम्सवर मराठीतून सहज संवाद साधता येतो. ‘गुगल सहायिका’, ‘अलेक्सा’, ‘सिरी’ यांसारख्या आवाज साहाय्यकांची मराठीतून सेवा उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान लोकांना मराठीतून कार्ये पूर्ण करण्यास मदत करत आहे. ‘एआय’च्या मदतीने भाषेचा अनुवाद, लेखन, संवाद आणि विविध प्रकारच्या कार्यांना मराठीमध्ये आणले जात आहे, ‘चॅटबॉट’मध्येसुद्धा मराठी खूप प्रमाणात येऊ लागले आहे. तसेच, सोशल मीडियावरही मराठीचे प्रमाण वाढले आहे. ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’ यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर मराठीतून माहिती, विचार आणि भावना व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे लोकांच्या संवादाची भाषा समृद्ध झाली आहे. ‘एआय’च्या साहाय्याने मराठीमध्ये लेखन, संपादन आणि सुधारणा अधिक सुलभ झाल्या आहेत. अनेक ऑनलाईन टूल्स आणि अॅप्स मराठीत उपलब्ध आहेत, ज्यांमुळे मराठी लेखकांना आपली कला सादर करणे अधिक सोपे झाले आहे.
शिक्षण क्षेत्रातही ‘एआय’चा वापर मराठी भाषेच्या प्रचारासाठी महत्त्वाचा ठरला आहे. मराठीतून शालेय पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, ऑनलाईन कोर्सेस आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाल्या आहेत. ‘एआय’च्या मदतीने मराठीतून विद्यार्थ्यांना सुलभ आणि आकर्षक शिक्षण मिळवता येते. उदाहरणार्थ, मराठी भाषेतील शिकवणी अॅप्स विद्यार्थ्यांना संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. आता तर ‘खान अॅकेडमी’सारखे लोकप्रिय अॅप्ससुद्धा मराठीत उपलब्ध आहेत.
मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी ‘एआय’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ‘एआय’च्या माध्यमातून मराठीचे संवर्धन आणि प्रसार होणे शक्य आहे. ‘एआय’च्या मदतीने, भाषेचे विविध रूप, काव्य, साहित्य आणि संवादाच्या इतर प्रकारांना डिजिटल स्वरूपात आणता येईल. 2025 पासून जन्मलेली ‘जेन बिटा’ हिला विशेषतः आणि आधीच्या ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’साठी मराठीची नाळ जुळण्यासाठी मराठीची डिजिटल उपलब्धता फार महत्त्वाची ठरेल. मराठी भाषेच्या 12 बोलीभाषा समजल्या जातात. उदाहरणार्थ कोकणी, मालवणी, वर्हाडी, अहिराणी इत्यादी. ‘एआय’चा वापर करून ग्रामीण-नागर किंवा बोलीभाषा-प्रमाणित या दोन्हींमधली दरी सांधण्याचे काम उत्तम होऊ शकेल.
निरंतर विकसित होणार्या ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या युगात, मराठी भाषेचा उपयोग नेहमीच नव्या आणि सर्जनशील पद्धतीने वाढत राहील. त्यासाठी संस्थात्मक प्रयत्न लागतीलच. उदाहरण द्यायचे म्हणजे, भारत सरकारने ‘भाषिणी’ हे 2022 मध्ये तयार केलेले (भाषा इंटरफेस फॉर इंडिया) तंत्र असेच आहे आणि त्यात ‘एनएलपी’ आणि ‘एआय’चा वापर करण्यात आला आहे. आपल्याला मराठी डिजिटल कंटेंटने ‘एआय’ची ट्रेनिंग मॉडेल्स मोठ्या प्रमाणात बनवावी लागतील. मात्र, यासाठी मराठी भाषेेचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर मराठीजनांनी तंत्रस्नेही बनणे आवश्यक राहील. यासाठी सरकारबरोबरच शैक्षणिक संस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास, मराठी भाषा ‘एआय’च्या युगात भारतातच नव्हे, तर जगभरात एक महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.
डॉ. भूषण केळकर
(लेखक न्यूफ्लेक्स टॅलेंटचे संचालक, एआय तज्ज्ञ, करिअर काऊंसिलर आहेत.)