बीड : (Suresh Dhas Massajog ) बीडमधील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. मात्र आता आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आंदोलनस्थळी जाऊन भेट दिल्यानंतर मस्साजोग मधील ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
आमदार सुरेश धस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh murder case) पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करण्यात यावं आणि त्यांना सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या प्रकरणात गाफीलपणा करणारे आणि संशयास्पद भूमिका बजावणाऱ्या वाशी पोलिस स्टेशनच्या पोलिसांचे सीडीआर तपासण्यात यावेत आरोपींना मदत करणारे डॉ.संभाजी वायबसे (Dr. Sambhaji Vaybhase) यांची चौकशी करून त्यांना सह आरोपी करावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच आमदार धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहित कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आमदार सुरेश धसांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
१) पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करून सह आरोपी करावे.
२) फरार आरोपी कृष्णा आंधळे यास तात्काळ अटक करावी.
३) वाशी पोलीस स्टेशन जि. धाराशिव येथील पोलीस उपनिरीक्षक घुले, पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते, पोलीस हवालदार गोरख फड आणि पोलीस हवालदार दत्ता बिक्कड, यांचे तात्कालीन कालावधीतील मोबाईल कॉल्सचे सीडीआर तपासून त्यांना सह आरोपी करण्यात यावे.
४) आरोपींना मदत करणारे डॉ.संभाजी वायबसे आणि त्यांच्या पत्नी, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे, शिवलिंग मोराळे यांची चौकशी करून त्यांना सह आरोपी करावे.
५) संतोष देशमुख हत्या प्रकरण शासकीय अभियोक्ता म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.
६) हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे.
७) संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे पार्थिव बोरगाव शिवारातून उचलल्यानंतर शासकीय रुग्णालय येथेघेऊन जाणे अपेक्षित असताना पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे सदरील गाडी कळंब या गावाच्या दिशेने कोणाच्या सांगण्यावरून घेऊन जात होते? याची चौकशी करणे.
८) नितीन बिक्कड यांचाही या हत्याप्रकरणी सहभाग असून त्यांनाही सह आरोपी करण्यात यावे.