स्वत:च्या सर्व जबाबदार्या पूर्ण करत मराठी संगीत रंगभूमीची सेवा करणार्या गुणवंत अभिनेत्री, कलाकार प्राजक्ता शहाणे यांच्याविषयी...
संगीत नाटक म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याचा अनमोल हिरा! शब्दांना स्वरांची झालर, संवादांना लयीची साथ आणि अभिनयाला संगीताची मधुर संगत लाभली की, नाटक फुलते एका अद्भुत स्वरूपात. संगीत नाटक ही केवळ कलाकृती नाही, तर शतकानुशतके रसिकांच्या हृदयात सन्मानाने वसलेली परंपरा आहे. बालगंधर्वांच्या मोहक स्वरांनी जिवंत झालेले, केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ यांच्या आवाजाने भारलेले आणि नंतरच्या पिढ्यांनी हृदयापासून जपलेले हे संगीत नाटक, आजही रसिकांना भुरळ घालते.
‘सौभद्र’चा प्रेमभाव असो, ‘मानापमान’चा संघर्ष असो किंवा ‘संशयकल्लोळ’चे नाट्य असो, प्रत्येक नाटकात एक वेगळीच जादू आहे. आजही ज्येष्ठ रसिकांपासून तरुण प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक पिढी या कलेच्या प्रेमात आहे. महाराष्ट्राच्या रंगभूमीवरचे हे चंपापुष्प काळाच्या ओघातही नव्याने दरवळत आहे, ते संगीत नाट्यकर्मींमुळेच. प्राजक्ता शहाणे या अशाच एक गुणवंत अभिनेत्री होय!
रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्य लावगण हे प्राजक्ता यांचे गाव. प्राथमिक शिक्षण याच गावात पूर्ण केल्यानंतर, पुढे दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्राजक्ता यांना आत्तेकडे राहावे लागले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी रत्नागिरी खंडाळा येथील महाविद्यालयात, विज्ञान शाखेमधून पूर्ण केले. बारावी झाल्यानंतर ’एव्हिएशन, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट’ क्षेत्रात डिप्लोमा पूर्ण केला. मात्र, पदवीचे शिक्षण त्यांना घेता आले नाही. फयान वादळात प्राजक्ता यांच्या घराचे नुकसान झाले. त्यामुळे घर पुन्हा बांधत असताना, केलेल्या अतिरिक्त शारीरिक मेहनतीचा दुष्परिणाम प्राजक्ता यांच्या वडिलांच्या तब्येतीवर झाला. त्यामुळे वडिलांची सुश्रुशा करण्यालाच प्राजक्ता यांनी प्राधान्य दिले.
त्याकाळात चरितार्थ म्हणून काही ठिकाणी नोकरीदेखील केली. याच काळात प्रथमेश शहाणे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतरच प्राजक्ता यांचा संगीताचा प्रवास सुरू झाला. आजवर असलेली आवड छंदामध्ये परावर्तित करण्याबाबत, प्राजक्ता यांचे पती प्रथमेश यांची आग्रही भूमिका असल्याचे प्राजक्ता सांगतात. प्रथमेश स्वत: उत्तम तबला वादक असल्याने, संगीताचे महत्त्व आणि ज्ञान त्यांच्याकडेच होते. त्यामुळे प्राजक्ता यांना नक्कीच त्याचा फायदा झाला. त्यानंतर संगीत शिकण्यासाठी रत्नागिरीमधील प्राजक्ता लेले यांच्याकडे त्यांनी सराव सुरू झाला. प्रवेशिका पूर्णपर्यंतच्या परीक्षाही प्राजक्ता, लिलया उत्तीर्ण झाल्या. याच काळात रत्नागिरीमधील ‘खाल्वायन’ या संस्थेच्या माध्यमातून, प्राजक्ता यांना नाटकात लहानशी भूमिका करण्याची संधी मिळाली. प्राजक्ता यांचे रंगभूमीवर पडलेले हे पहिले पाऊल होते. मात्र, हा प्रवास अल्पायु ठरला. प्रथमेश यांना गोव्यामध्ये तबला शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने, प्राजक्ता यांना गोव्याला जावे लागले. त्यामुळेच प्राजक्ता यांचा नाटकांशी असलेला संबंध कमी झाला.मात्र, प्राजक्ता यांनी संगीत विद्यार्जनामध्ये अंतर पडू दिले नाही. त्यांनी गोव्यामधील वास्तव्यात समीक्षा काकोडकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्याची सुरुवात केली. मात्र, नंतर काही कारणास्तव त्यांना पुन्हा रत्नागिरीला परतावे लागले.
रत्नागिरीला परतल्यावर प्राजक्ता यांनी, हॉस्टेलच्या मुलांची क्षुधातृप्ती करण्यासाठी सासूबाईंच्या कामात हातभार लावण्यास सुरुवात केली. सासूबाईंबरोबर राहून त्या पुरणपोळ्यादेखील शिकल्या. सासूबाईंचा पुरणपोळ्यांचा व्यवसाय आज प्राजक्ता समर्थपणे सांभाळत आहेत. दरम्यानच्या काळातच, प्रथमेश आणि प्राजक्ता यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्यामुळे काहीसा कालखंड लहान बाळाचे संगोपन करण्यातच गेले. मात्र, त्यानंतर प्राजक्ता यांनी रत्नागिरीमध्येच, परब मॅडमकडे संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. याच काळात गुहागर तालुक्यातील वाघांबे गावच्या परस्पर साहाय्यक मंडळाच्या माध्यमातून संगीत नाटकांमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली. या मंडळाचे दिग्दर्शक घनश्याम जोशी अर्थात विसू काका यांनी, संगीत ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील उमा या भूमिकेची संधी दिली. प्रथमेश यांनीदेखील त्याच नाटकात कविराज यांची भूमिका केल्याची आठवण, प्राजक्ता सांगतात.
परस्पर साहाय्यक मंडळाच्या माध्यमातून ‘हौशी राज्य संगीत नाट्य स्पर्धे’त विविध नाटके सादर केली जातात. त्यामुळे सादरीकरणाचे दडपण साहजिकच प्राजक्ता यांच्यावर होते. मात्र, हर्षे काका यांनी नाट्यसंगीताविषयी दिलेले ज्ञान आणि करून घेतलेली तयारी, कायमच विश्वास देऊन जाते, असे प्राजक्ता सांगतात. त्यानंतर प्राजक्ता यांनी परस्पर साहाय्यक मंडळाच्या ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत सुवर्णतुला’, ‘संगीत मंदारमाला’, ‘संगीत जय जय गौरी शंकर’, ‘संगीत बावनखणी’ अशा अनेक नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत.
अनेक नाटकात ‘गुणवंत अभिनेत्री पुरस्कार’ही मिळाला आहे. मात्र, या सार्यामागे विसू काका आणि हर्षे काका यांचे मार्गदर्शन लाख मोलाचे असल्याचे त्या सांगतात. त्याचबरोबर प्रथमेश यांनी जोडीदार म्हणून जशी भक्कमपणे साथ दिली, तसाच भक्कम पाठिंबा सासू सासर्यांचाही असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या पाठिंब्यामुळेच बाळ लहान असतानाही, एक आई तिची आवड जोपासू शकली, असे मत प्राजक्ता व्यक्त करतात. तसेच, त्यांचा मुलगा अंबरिश हासुद्धा आता नाटकात रमतो. त्यामुळे भविष्यात एक संगीत नाटकाचा प्रेक्षक आम्ही आताच तयार केल्याचे समाधान आहे, असे प्राजक्ता म्हणाल्या. आज घरातील सर्व गृहिणींची जबाबदारी आणि कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत, त्या स्वत:चा छंद जोपासत आहेत. भविष्यात ‘सौभद्र’सारख्या अनेक नाटकांत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. प्राजक्ता यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
कौस्तुभ वीरकर