पोप निवडीचा काळा धूर

    26-Feb-2025   
Total Views |
 
article on process of electing a pope
 
रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख होर्हे मारियो बेर्गोलियो म्हणजेच, सर्वश्रूत असलेले पोप फ्रान्सिस यांच्यावर गेले काही काळ रुग्णालयात उपचार आहेत. त्यांची प्रकृती ठीक व्हावी, याकरिता व्हॅटिकन सिटी येथे, त्यांचे हजारो समर्थक प्रार्थना करीत आहेत. वास्तविक त्यांना न्यूमोनिया झाला असून, त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अशा स्थितीत ते पदाचा राजीनामा देतील का, अशी चर्चा जागोजागी होत आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास त्यांच्या जागी कोण येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, पोप निवडीची प्रक्रिया किती गमतीशीर आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
 
खरंतर पोप हे पद आजीवन धारण करता येते. परंतु, अकाली मृत्यू झाल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव त्या व्यक्तीने पदाचा राजीनामा दिल्यास, नवीन पोपची निवड केली जाते. पोप बेनेडिक्ट (सोळावे) यांनी २०१३ साली पोप पदाचा राजीनामा दिला होता. गेल्या ६०० वर्षांत पदाचा राजीनामा देणारे पहिले म्हणून, त्यांची विशेष ख्याती आहे. कॅथलिक परंपरेनुसार, ’पोप कॉन्क्लेव्ह’च्या माध्यमातून नवे पोप निवडले जातात. पोप पदासाठीचा उमेदवार हा स्त्री नव्हे, तर माणूसच असावा लागतो. कॅथलिक चर्चमधील सर्वोच्च दर्जाचे पादरी ज्यांना ‘कार्डिनल’ म्हणून ओळखले जाते, ते नव्या पोपची निवड करतात. नवीन पोप निवडण्यासाठी हे कार्डिनल, अनेक बैठका घेतात. व्हॅटिकन सिटीच्या ‘सिस्टिन चॅपल’मध्ये, नवीन पोपसाठी मतदान होते. यात ८० वर्षांखालील कार्डिनलना, मतदानाचा अधिकार असतो. मतदान आणि बैठकीची संपूर्ण प्रक्रिया गुप्त ठेवली जाते. विशेष म्हणजे, या काळात कार्डिनल्सना बाहेरील जगाशी संपर्क ठेवण्याची कुठलीच परवानगी नसते.
 
हे कार्डिनल मग गुप्त मतपत्रिकेद्वारे मतदान करतात. मतदानाच्या दिवशी सकाळी सुरुवातीला, १२० कार्डिनल्स सिस्टिन चॅपलमध्ये एकत्र जमतात. हे कार्डिनल गोपनीयतेची शपथ घेतात, नवीन पोपची निवड होईपर्यंत स्वतःला कॉन्क्लेव्हमध्येच बंदिस्त करतात. मतदानाच्या पहिल्या दिवशी, नवा पोप मिळेलच याची शाश्वती नाही. निकाल जाहीर करण्यासाठी, तीन कार्डिनल नियुक्त केले जातात. हे कार्डिनल प्रत्येक मतपत्रिकेचे निकाल मोठ्याने वाचतात. कोणत्याही उमेदवाराला निर्धारित दोन तृतीयांश मते न मिळाल्यास, मतपत्रिका चुलीत पेटवली जाते. त्या अशा रसायनांद्वारे जाळल्या जातात की, त्यातून प्रचंड काळा धूर निघतो.
याउलट एखाद्या उमेदवारास जेव्हा दोन तृतीयांश मते मिळतात, तेव्हा आधी त्याच्या विजयाबाबत जाहीर केले जात नाही. तत्पूर्वी कार्डिनल्स कॉलेजच्या डीनला विचारले जाते की, विजयी उमेदवार स्वीकारार्ह आहे की नाही? जर डीनने मान्य केले, तरच शेवटच्या फेरीत मतपत्रिका जाळल्या जातात. यावेळी मात्र त्या अशा रसायनांद्वारे जाळल्या जातात की, त्यातून पांढरा धूर निघतो. त्यामुळे जगाला कळते की, नवीन पोप निवडला गेला आहे. अशी ही यांची निवडणूक प्रक्रिया. यावरून हे मात्र निश्चित की, विकेंद्रीकरण नव्हे तर केंद्रीकरण रचनेद्वारेच नवीन पोप निवडला जातो.
 
आज जरी पोप फ्रान्सिस यांच्यावर आपल्या आजारपणाचा मुद्दा समोर ठेवून, पोप पदाचा राजीमाना देण्याची वेळ आली, तरी पोप पदाचा अधिकृत उत्तराधिकारी म्हणून अद्याप कोणाचे नाव समोर आलेले नाही. तांत्रिकदृष्ट्या, कोणताही बाप्तिस्मा घेतलेला पुरुष, रोमन कॅथलिक पोप बनू शकतो. हे पाहता काही नावे पुढे येतात, व्हॅटिकनचे राज्य सचिव कार्डिनल पिएट्रो पॅरोलिन, पोंटिफिकल काऊन्सिल फॉर जस्टिस अ‍ॅण्ड पीसचे माजी प्रमुख कार्डिनल पीटर टर्क्सन (घाना), कॉन्ग्रॅगेशन फॉर द इव्हॅन्जेलिझेशन ऑफ पीपल्सचे प्रीफेक्ट आणि मनिलाचे माजी आर्चबिशप कार्डिनल लुईस टॅगले त्याचबरोबर, इतर संभाव्य उमेदवारांमध्ये कार्डिनल्स मॅटेओ झुप्पी, गेरहार्ड मुलर, अँजेलो स्कोला, अँजेलो बॅग्नास्को, रेमंड बर्क, रॉबर्ट सारा आणि माल्कम रंजित यांचाही समावेश आहे. त्यामुळे एकीकडे पोप फ्रान्सिस यांची प्रकृती स्थिरस्थावर होण्यासाठी, लोकांच्या प्रार्थना सुरू आहेत, तर दुसरीकडे राजीनामा दिल्यास नवीन पोप कोण होणार, याची धाकधूक जनतेला लागून आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक