नीलमताई बोलल्या ते कटू सत्य! खरं बोलल्यावर...; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
26-Feb-2025
Total Views |
मुंबई : दिल्लीच्या साहित्य संमेलनातील व्यासपीठावर डॉ. नीलम गोऱ्हे जे बोलल्या ते कटू सत्य आहे. काळे धंदे बाहेर काढल्यामुळे त्यांना (उबाठा) मिरच्या लागल्यात, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी दिली.
अंधेरीतील शेर ए पंजाब नगर येथील बीएमसी मैदानात शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी लाडक्या बहिणींचा आभार मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगीखासदार रवींद्र वायकर, आमदार चित्रा वाघ, आमदार मुरजी पटेल यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हमाले की, "डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीच्या साहित्य संमेलनातील व्यासपीठावरुन एक वाक्य बोलल्या, हे वाक्य काहीजणांना प्रचंड झोंबले. नीलमताईंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्यामुळे त्यांना मिरच्या लागल्या. राज ठाकरे बोलले की त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे, निलेश राणेदेखील यापूर्वी बोलले आहेत. त्यामुळे हे काही नवीन नाही. परंतू, नीलमताई बोलल्यानंतर त्यांना मिरच्या लागल्या. एका बहिणीला एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणे त्यांना शोभत नाही. खरे बोलल्यानंतर मनाला बोचते. नीलमताई खरेच बोलल्या. आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक आहे. त्या जे बोलल्या ते कटू सत्य आहे."
...म्हणून पोटदुखी थांबत नाही
"महिलांवर अत्याचार झाल्यास नीलम गोऱ्हे या पहिले धावून जातात. शक्ती विधेयकामध्ये निलमताईंचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर महिलांना अधिक सक्षम करण्यासाठीसुद्धा त्या काम करतात. पण हीच काही लोकांची पोटदुखी आहे. चांगले काम करणाऱ्यांना बदनाम कसे करायचे, ही त्यांची पोटदुखी आहे. ही पोटदुखी थांबत नाही कारण ते डॉक्टरकडून औषध घेत नाहीत तर कंपाऊंडरकडून घेतात," असा टोलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.