भारतीय जीवनपरंपरेचा ध्यास

    25-Feb-2025   
Total Views |
 
swojas bilurkar
 
भारतीय संगीत, वाद्य, तालशास्त्र आणि भारतीय पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व जनसामान्यांना पटवून देणार्‍या स्वोजस बिलुरकर यांच्याविषयी...
 
"अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतलेस. तू शिक्षण पूर्ण करशीलच आणि अभियंताही होशील. मात्र, अभियंता होण्यासोबतच, तू तुझे स्वत्व शोधशील आणि त्यातून स्वतःचेअस्तित्व उभे करशील,” असे प्रदिप बिलुरकर त्यांच्या लेकाला अर्थात स्वोजस यांना म्हणाले होते. प्रदिप यांच्या मार्गदर्शनानुसार आज स्वोजस अभियंता तर आहेतच, मात्र ‘प्रयाग म्युझिक इमरशन सेंटर’च्या माध्यमातून, संगीताचे सुरेल धुडे मुलांना देत आहेत. ड्रम या पाश्चात्य वाद्याचे त्यांनी प्रशिक्षण घतले आहे. ’रॉकस्कुल ट्रिनिटी स्कुल’ येथे ड्रमवादनात, विशारद गुणवत्ता त्यांनी मिळवली. पाश्चिमात्य वाद्यांसोबत शास्त्रीय संगीत गायन, असा वेगळाच बाज असलेला ‘मंजर बँड’ त्यांनी तयार केला. पुणे, मुंबई आणि इतरही ठिकाणी या आगळ्यावेगळ्या बँडचे कार्यक्रम झोकात झाले.
 
सर्वच पाश्चिमात्य वाद्य ते लीलया वाजवतात.मात्र, असे असतानाही त्यांनी तबला या भारतीय वाद्यामध्ये, स्वतःचे असे दोन कायदे निर्माण केले आहेत. पाश्चात्य वाद्यशैलीवर प्रभुत्व मिळवले असतानाच, भारतीय संगीतशैलीची महती आणि अभिजात तालसौंदर्य याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच ते स्वतः आता गुरू किरण परळीकर यांच्याकडे, शास्त्रीय संगीत शिकत आहेत. वाद्यांमध्ये नवनिर्मिती करण्याचे त्यांचे ध्येय आहे आणि हे ध्येय, त्यांच्या अंतरमनात कायमच रूंजी घालत असते. अभियंता असल्याने, अभियांत्रिकी क्षेत्रात चांगली नोकरी मिळण्याची संधी असूनही त्यांनी नोकरी केली नाही. तसेच, याच क्षेत्रातील उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठीही वातावरण अनुकूलच होते. मात्र, तरीही त्यांनी उद्योग-व्यवसाय या क्षेत्रात पाऊल टाकले नाही. कारण एकच, वाद्यकलेतील नवनिर्मितीचा ध्यास! या ध्यासामुळेच त्यांने आपले अवघे जीवन, संगीताच्या तालशास्त्र रागशास्त्राला समर्पित केले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘प्रयाग म्युझिकल इमरशन सेंटर’मध्ये, विद्यार्थी वाद्य शिकायला येतात. वाद्यासोबतच आणि पाश्चात्य संगीतशैलीसोबतच या विद्यार्थ्यांना, आवर्जून भारतीय प्राचीन संगीतकलेचेही ज्ञान दिले जाते.
 
स्वोजस यांचे संगीतप्रेम, तालनिष्ठा ही वादातीत आहे. पण याचबरोबर, ते उत्तम गिर्यारोहक आहेत. तसेच, पर्यावरणपूरक जीवनशैली समाजात रूजावी, यासाठीही ते कार्य करतात. आपले पूर्वज प्लास्टिकचा वापर न करता, संपन्न जीवन जगत होते. आज आधुनिक जीवनशैलीशी समन्वय साधत, आपल्या पूर्वजांची ती पर्यावरणपूरक जीवनशैली आपण अंगीकारली पाहिजे, असे त्यांचे मत. प्राचीन जीवनशैलीमधील चांगल्या बाबींचा आजच्या जीवनशैलीत वापर करण्यात यावा, याबाबत ते आग्रही आहेत. पारंपरिक धार्मिक आणि सामाजिक रितीरिवाजांना विज्ञानाच्या तर्कनिष्ठेतेवर तपासत, स्वोजस त्यांचा अर्थ शोधतात. त्यामुळेच मोबाईलचा कमीत कमी वापर आणि प्रत्यक्ष संवाद साधावा, यासाठीही ते अनेक कार्ये करत आहेत. युवकांमध्ये विज्ञाननिष्ठता वाढवणे, हे त्यांचे ध्येय आहे. भारतीय जीवनशैली ही वैभवशाली होती. अनेक आघात होऊनही, ती आजही टिकून आहे. या जीवनशैलीचे संवर्धन व्हावे, युवक-युवतींना या जीवनशैलीचे माहात्म्य समजावे, यासाठी ३२ वर्षांचे स्वोजस काम करत आहेत. संगीतक्षेत्र असू दे की, दैनंदिन जीवनाचे क्षेत्र असू दे, सर्वच क्षेत्रात प्राचीन भारतीय विचारसंकल्पनांचे महत्त्वही स्वोजस चुकता मांडतात.
 
प्रदिप बिलुरकर आणि ज्योती हे मुळचे निगडी पिंपरी-चिंचवडचे. प्रदिप हे आयटी क्षेत्रात काम करायचे, तर ज्योती या गृहिणी. घराला रा. स्व. संघाचा परिसस्पर्श लाभलेला. त्यामुळे कुटुंबाला देश-समाजनिष्ठेचे भान आपसुक लाभलेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे, जीवनकार्याचे बाळकडू स्वोजस यांना घरातूनच मिळालेले. मुलाने शिकावे, मात्र स्वतःचे स्वत्व शोधून आयुष्य घडवावे, या विचारांचेच हे बिलुरकर दाम्पत्य. त्यामुळे स्वोजस यांना वाद्य वाजवण्याची आवड आहे हे लक्षात येताच, ज्योती यांनी त्यांना तबलावादनाची शिकवणी लावली. पण, पुढे स्वोजस यांना, ड्रम वाद्याविषयी आकर्षण वाटू लागले. त्यामुळे त्यांनी ड्रम वाद्याचे प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण घेतानाच त्यांना वाटू लागले की, पाश्चात्य तालसुरांपेक्षा भारतीय संगीत वाद्यांची आणि तालाची खोली अधिक आहे. ती एक साधना आहे. या साधनेतून साधक नवनिर्मिती करू शकतो. त्यामुळेच त्यांनी ‘मंजर’ नावाचा, स्वतःचा बँड उभा केला. त्यानंतर ‘प्रयाग म्युझिकल इमरशन सेंटर’ही सुरू केले.
 
तसेच,एका खासगी कंपनीच्या माध्यमातून, पुण्यातील जवळजवळ ४० शाळांमध्ये ते वाद्य शिकवण्याचे काम करतात. भारतीय जीवनशैलीवर आधारित त्यांचे जीवन संगीतमय आहे. त्यांची जीवनसंगिनी पूजा यासुद्धा, त्यांच्या विचारानुसार काम करतात. स्वोजस म्हणतात, “तबल्यामध्ये स्वनिर्मित दोन नवीन कायदे निर्माण केले आहेत. त्या कायद्यांसंदर्भात कार्यक्रम करण्याचा विचार आहे. तसेच, भारतीय संगीत वाद्यपरंपरेचे वैभव आणखीन समृद्ध व्हावे, यासाठीही काम करायचे आहे. सगळ्याचे मूळ, प्राचीन पारंपरिक भारतीय जीवनशैलीवर आधारित आहे. ती भारतीय जीवनशैली, समाजात आजही आहे. ती संवर्धित, वृद्धिंगत करण्याचे काम करत आहे आणि करत राहणार आहे.” स्वोजस यांच्या तालसाधनेला आणि भारतीय जीवनशैलीच्या संवर्धनकार्याला दै.‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.