मुंबई (अक्षय मांडवकर) - 'इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'च्या (आययूसीएन) 'शार्क स्पेशालिस्ट ग्रुप'ने कोकण किनारपट्टीवरील केळशी-उंटबर आणि मालवणचे सागरी क्षेत्र हे 'संकटग्रस्ट' शार्क आणि पाकट प्रजातींसाठी महत्त्वाचे क्षेत्र म्हणून नामांकित केले आहे (konkan region identified as ISRA). या क्षेत्राची ओळख 'इम्पॉटंट शार्क अॅण्ड रे एरिया' (इस्त्रा) म्हणून पटविण्यात आली आहे (konkan region identified as ISRA). 'संकटग्रस्त' म्हणून नोंद असलेल्या शार्क आणि पाकट प्रजातींच्या संरक्षणासाठी या क्षेत्राची पटवलेली ओळख महत्वाची आहे. (konkan region identified as ISRA)
शार्क म्हणजेच मुशी, पाकट म्हणजेच स्टींग रे, जायन्ट गिटारफीश, साॅफिश या सागरी मत्स्यप्रजातीचा 'इस्लामोब्रान्च' कुळात समावेश होतो. आययूसीएनने जगातील 'इस्लामोब्रान्च' कुळातील ३१६ प्रजाती संकटात सापडल्याचे म्हटले आहे. भारतातील एकूण ५१ समुद्री मत्स्यप्रजाती विलुप्तीच्या उंबरठ्यावर येऊन उभ्या राहिल्या आहेत. म्हणूनच आययूसीएनच्या शार्क स्पेशालिस्ट ग्रुपने आजवर १२५ क्षेत्रांना इस्त्राची ओळख दिली आहे. यामध्ये आता केळशी-उंटबर आणि मालवणच्या सागरी परिक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. 'इस्त्रा'ची ओळख प्रामुख्याने बंदरावर वाहून आलेल्या शार्क, पाकट आणि गिटारफीशची संख्या पाहून पटवली जाते. मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अनावधाने अडकलेले हे जीव मच्छीमारांकडून बंदरांवर आणले जातात. कोणत्या बंदरावर असे जीव वाहून आल्याची संख्या जास्त आहे, याचे सर्वेक्षण करुन 'इस्त्रा'ची ओळख पटवली जाते.
केळशी-उंटबर या क्षेत्राची ओळख 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन सोसायटी-इंडिया'च्या टीमने केली आहे. रत्गागिरी जिल्ह्यातील बंदराचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना केळशी-उटंबर येथील मासळी उतरवण्याच्या धक्क्यावर सर्वाधिक 'संकटग्रस्त' शार्क आणि गिटारफीशच्या प्रजाती आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी या जागेची निवड करुन तसा प्रस्ताव 'आययूसीएन'च्या 'शार्क स्पेशालिस्ट ग्रुप'ला पाठवला. हा प्रस्ताव मान्य करुन ग्रुपने या क्षेत्राला 'इस्रा' क्षेत्र म्हणून नामांकित केले आहे. केळशी-उटंबर येथे 'शार्पनोज गिटारफिश' आणि 'वाइडनोज गिटारफिश' या दोन प्रजाती प्रामुख्याने आढळून आल्या. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही प्रजाती 'भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित आहेत. म्हणजेच त्यांना वाघाऐवढे संरक्षण आहे. तसेच 'आययूसीएन'च्या लाल यादीत या दोन प्रजातींचा समावेश 'नष्टप्राय' प्रजातींच्या यादीत करण्यात आला आहे. मालवणमध्ये 'लाँगहेड ईगल रे' ही 'संकटग्रस्त' आणि 'वाइडनोज गिटारफिश' ही 'नष्टप्राय' प्रजात आढळून आली आहे.
मासेमारीवर बाधा नाही
केळशी-उंटबर आणि मालवणचे सागरी क्षेत्र हे 'इम्पॉटंट शार्क अॅण्ड रे एरिया' (इस्त्रा) म्हणून नामांकित करण्यात आले असले तरी, सद्यपरिस्थितीत या क्षेत्रावर कोणत्याही प्रकारे मासेमारीलर बंदी होणार नाही. शार्क, पाकट आणि गिटारफीश प्रजातींच्या संवर्धनाकरिता धोरण आखण्यासाठी अशा प्रकारे विशेष क्षेत्रांची ओळख पटवली जाते. इस्त्राप्रमाणे 'इम्पाॅटंट मरिन एरिया', 'इम्पाॅटंट मरिन मॅमल' एरिया या क्षेत्रांची देखील ओळख पटवण्यात येते.