‘कांदळवन कक्षा’अंतर्गत सुरू होणार्या ‘मरिन सेंटर ऑफ एक्सलन्स’ संदर्भातील बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीत ‘भारतीय वन्यजीव संस्थान’चे (डब्लूआयआय) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश कुमार यांनी राज्यातील सागरी कासवसंवर्धनातील बदलांविषयी विस्तृतपणे चर्चा केली. याच चर्चेचा आधार घेऊन प्रत्यक्ष किनार्यावर काय परिस्थिती आहे, याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
भारताच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही किनारपट्टीवर सागरी कासवांची वीण होते. तसेच अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवरदेखील सागरी कासवे अंडी घालण्यासाठी येतात. भारताची पूर्व किनारपट्टी ही खास करून ‘ऑलिव्ह रिडले’ या सागरी कासवाच्या प्रजातीच्या विणीसाठी ओळखली जाते. ओडिशाच्या गरिमाथा आणि ऋषिकुल्य या किनार्यांवर एकाचवेळी लाखो ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. ज्याला ‘अरिबाडा’ असे म्हटले जाते. सध्या हा ‘अरिबाडा’ ओडिशाच्या किनार्यावर सुरू असून अंदाजे दहा लाख ऑलिव्ह रिडले माद्यांनी ऋषिकुल्य किनार्यावर येऊन अंडी घातली आहेत. अंदमान-निकोबार बेटावर सागरी कासवांमधील सर्वात मोठ्या लेदरबॅक कासवाची वीण होते, तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरात आणि लक्षद्वीप बेटांवर ऑलिव्ह रिडले बरोबरीनेच संकटग्रस्त ग्रीन सी कासवाची वीण होते, तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळ याठिकाणी ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालण्यासाठी येतात.
गुजरात आणि केरळच्या किनार्यांवर मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन सुरू आहे. त्यामुळे कासव विणीच्या अनुषंगाने असणारी येथील किनार्यांची क्षमता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. डॉ. सुरेश कुमार यांच्या मते, सध्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीसाठी शिल्लक राहिलेला उत्तम प्रदेश हा उत्तर रत्नागिरीपासून गोव्यापर्यंत आहे. उत्तर कोकणाचा विचार केल्यास पालघर, मुंबई आणि रायगड येथील किनारे पर्यटन केंद्रित झाले आहेत. सागरी आणि किनारी खेळ, किनार्यांवर प्रकाश दिव्यांचे वाढलेले प्रमाण आणि रात्र पर्यटन यांमुळे प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील किनार्यांची क्षमता कासव विणीच्या अनुषंगाने नष्ट झाल्याच्या बरोबरीने आहे. सध्या रायगड जिल्ह्यात दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि मारळ या चार किनार्यांवर सागरी कासवांची घरटी आढळतात. त्यामध्येही श्रीवर्धन किनार्यावरील वाढलेल्या पर्यटनामुळे येत्या काही वर्षांत येथेदेखील कासवांची घरटी होणार नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात काही किनार्यांवर अजूनही पर्यटन पोहोचलेले नाही. किमान रात्र पर्यटनाच्या संकल्पनेतून हे किनारे अजूनही सुरक्षित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा सात किनार्यांवर पहिल्यांदाच कासवांची घरटी आढळली आहेत. त्यामुळे रत्नागिरीत कासव विणीच्या किनार्यांची संख्या 16 वरून 23 झाली आहे.
राज्यातील कासव संवर्धनाच्या पद्धतीमध्ये कासवांची अंडी ही किनार्यावर तयार करण्यात आलेल्या हॅचरीत हलवली जातात. कोल्हा-कुत्र्यांपासून संरक्षित करण्याच्या अनुषंगाने ही उपाययोजना केली जाते. कासवांच्या जन्मदर हा त्यांच्या उबवणीसाठी आवश्यक असणार्या तापमानावर अवलंबून असतो. अंडी ही हॅचरीत किती वेळात आणि वेगाने हलवली जातात, यावर जन्मदर ठरतो. गेल्यावर्षी म्हणजेच 2023-24च्या कासवविणीच्या हंगामात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मिळून कासवांच्या जन्मदर हा 64 टक्के होता. त्या हंगामात एकूण 2 हजार, 566 घरटी आढळून आली. त्यामाध्यमातून 2 लाख, 46 हजार, 609 अंड्यांचे संवर्धन करण्यात आले. या अंड्यांमधून बाहेर पडलेल्या 1 लाख, 58 हजार, 873 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे जन्मदर उच्च ठेवायचा असल्यास किनार्यावर सापडणारी किमान 20 टक्के कासवांची घरटी ‘इन-सेटू’ पद्धतीने संरक्षित करणे गरजेचे आहे. म्हणजेच आहेत त्या ठिकाणी त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
यासंदर्भातील उपाययोजना कांदळवन कक्ष - दक्षिण कोकण विभागाने सिंधुदुर्गच्या किनार्यांवर सुरू केली असून सुमारे 250 हून अधिक घरटी ‘इन-सेटू’ पद्धतीने संरक्षित करण्यात आली आहेत. मात्र, हॅचरीबरोबरच ‘इन-सेटू’ पद्धतीने घरटी संरक्षित करायची असल्यास मोठ्या प्रमाणावर संरक्षण जाळ्यांसारख्या साधनसामग्रीची गरज असते. सध्या वनविभागाकडून या जाळ्या पुरवल्या जात असल्या, तरी त्या वेळेत पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे बीच मॅनेजर बर्याच वेळा मासेमारीची जाळी वापरून हॅचरीतील किंवा ‘इन-सेटू’ घरट्याचे संरक्षण करतात. या जाळ्या सहजपणे कोल्हे, कुत्रे आणि मुंगुसांकडून फाडल्या जातात. कासवांबरोबरीनेच कासवांच्या विणीसाठी आवश्यक असणार्या अधिवासातदेखील काही बदल झाले आहेत. यामधील लक्षवेधी बदल आहे, तो म्हणजे सुरुच्या लागवडीचा. सुरु लागवडीचा कासवांवर होणारा परिणाम आणि त्यामुळे किनार्याचे बदलणारे रूप याविषयी ऊहापोह करूया पुढच्या भागात...
(क्रमशः)