आगामी वर्ष हे बांधकाम उद्योगात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, शाश्वत बांधकाम पद्धती आणि बाजारपेठेतील बदलत्या ट्रेंडमुळे लक्षणीय परिवर्तन घडवून आणणारे ठरणार आहे. अशावेळी जागतिक पातळीवर बांधकाम उद्योगात, डिजिटल साधनांमधील प्रगतीपासून ते पर्यावरणीय जबाबदारीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यापर्यंत, परिस्थिती वेगाने बदलत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे, ग्रीन बिल्डिंग आणि शाश्वतता. आजच्या दशकात शाश्वतता ही बांधकाम उद्योगाची एक कोनशिला आहे. बांधकाम कंपन्या हरित बांधकाम साहित्य वापरून, पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करत आहेत. बांधकाम आणि डिझाईन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या वर्षाच्या अखेरीस, जगभरातील बहुतेक प्रकल्प पर्यावरणपूरक शाश्वत असतील. आजकाल वाढत्या पर्यावरण जनजागृतीमुळे, आपसूक ग्राहकच पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या शोधात आहेत. त्यामुळे प्रकल्पांच्या डिझाईनपासून ते पूर्ण होईपर्यंत, शाश्वत पद्धतीचा वापरच बांधकाम प्रक्रियेत होत आहेत.
आर्किटेक्ट आणि बांधकाम व्यावसायिक पर्यावरणपूरक आणि ऊर्जा-कार्यक्षम अशा संरचनांवरच लक्ष केंद्रित करतात. हरित बांधकाम इमारतींचे फायदे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यापलीकडेही असतात. त्यात संसाधनांचा वापर अनुकूल करण्यासाठी, शाश्वत संसाधने आणि बांधकाम मॉडेल्स यांचा समाविष्ट आहे. आज एकीकडे बांधकाम क्षेत्राला उभारी मिळत असताना, दुसरीकडे बांधकाम उद्योगाला कामगारांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. कुशल कामगारांच्या कमतरतेमुळे ,उद्योगातील भागधारक आणि सरकारे यांच्यात कौशल्यातील तफावत भरून काढण्यासाठी सहयोगी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय, रोबोट्स आणि ऑटोमेशननेही काही प्रमाणात, दबाव कमी करण्यात सहकार्य केले आहे. या तंत्रज्ञानातील डेटा व्यवस्थापित करण्यासाठी, तांत्रिकदृष्ट्या कुशल कामगारांची आवश्यकता वाढत आहे.
ओपन ऍसेट २०२२ च्या ‘एईसी इंडस्ट्री आऊटलुक’ सर्वेक्षणामध्ये ७४ टक्के उत्तरदात्यांनी सांगितले की, ते आव्हानांवर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा विचार करत आहेत.आगामी काळात तंत्रज्ञान हे बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांसाठी, सर्वात मोठे वेगळेपण ठरेल. २०२५ आणि त्यानंतरही नवीन तंत्रज्ञानाची लोकप्रियता वाढणारच आहे. बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग हे त्यापैकी एक आहे. ड्रोन, ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, वेअरेबल टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स हे तंत्रज्ञान कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता सुधारण्यात मदत करतात. प्रकल्पाचा खर्च कमी करते आणि बांधकामाचा वेग जलद करते. जसजसे बांधकाम क्षेत्र या नवकल्पनांचा स्वीकार करत राहील, तसतसे बांधकाम प्रकल्प अधिक सुव्यवस्थित, सुरक्षित आणि अधिक किफायतशीर होतील.
‘आयबीएम’, ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘सिस्को’सारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या, स्मार्ट, शाश्वत शहरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. यामध्ये युएईमधील मसदार सिटी, दक्षिण कोरियामधील सोंगडो इंटरनॅशनल बिझनेस डिस्ट्रिक्ट, न्यूयॉर्क शहरातील हडसन यार्ड्स, भारताचा दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर यांचा समावेश होतो. हे प्रकल्प अर्थव्यवस्थेला चालना देणे, पायाभूत सुविधा सुधारणे आणि पर्यावरणीय आरोग्य वाढवणे हे उद्दिष्ट ठेवतात. खरे तर, स्मार्ट सिटी सोल्यूशन्स स्वीकारणारी शहरे, दोन दशकांत त्यांची ऊर्जा कार्यक्षमता ३० टक्क्यांनी वाढवू शकतात. ‘स्मार्ट सिटीज’च्या संकल्पनेने प्रेरित, जागतिक स्मार्ट बिल्डिंग मार्केट २०२९ सालापर्यंत ३२८.६२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
२०२५ मध्ये गृहनिर्माण आणि निवासी प्रकल्प क्षेत्रात लक्षणीय वाढ होईल. घरच्या खरेदीसाठी सुलभतेने उपलब्ध होणारे गृहकर्ज आणि इतर प्रोत्साहनांमुळे, नवीन घरे अधिक आकर्षक बनत आहेत. नवीन-घर विक्रीचा बाजारातील वाटा वाढला आहे. २०२४ साली एकल-कुटुंब गृहनिर्माण सुरू होण्याचा अंदाज ४.७ टक्के आणि २०२५ साली ४.२ टक्के वाढण्याचा अंदाज आहे. टाऊनहाऊस बांधकामदेखील तेजीत आहे. जे अधिक परवडणारे पर्याय प्रदान करते आणि शहरी भागात जागेची कमतरता दूर करते. बांधकाम क्षेत्रातील या बदलामुळे, कनेक्टेड पायाभूत सुविधांच्या विकासालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, ज्यामुळे शहरी राहणीमानातही क्रांती घडेल.