भारताने प्राचीन काळातच वैज्ञानिक प्रगती केली असल्याचे असंख्य पुरावे आहेत. अध्यात्मिक असो अथवा वैज्ञानिक असो, भारताने त्यात मोलाची कामगिरी केली. मात्र, पाश्चात्य इतिहास लेखक कायमच याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. भारताच्या प्रगतीला नाकारून, उणेपणा मात्र ते ठळकपणे जगासमोर मांडतात.
कोणत्याही वस्तूचा शोध कुठे लागला; असा प्रश्न आला की, पाश्चिमात्य विद्वान प्रथम रोम आणि ग्रीसकडे बोट दाखवतात. कारण, आजची पश्चिम, यात युरोप आणि अमेरिका दोन्ही आले, ही रोमन आणि ग्रीक वैचारिक वारशावर उभी आहे. पण, समजा रोमन साम्राज्य किंवा ग्रीक साम्राज्य यांच्याही अगोदरच्या काळातला एखादा शोध आहे; तर मग त्यासाठी इजिप्त किंवा चीन यांच्याकडे बोट दाखवले जाते. म्हणजे समजा, तलम रेशमी किंवा सुती कापडाचा शोध कुठे लागला; असा प्रश्न आला, तर बेधडक इजिप्तकडे निर्देश केला जातो. कारण काय तर, इजिप्तच्या पिरॅमिडच्या उत्खननात राजे-राण्यांच्या मृतदेहांना तशा कपड्यात गुंडाळलेले आढळले. रोषणाईसाठी वापरले जाणारे फटाके किंवा बंदुकीची दारू म्हणजेच बारुद यांचा उगम कुठे झाला; तर म्हणे चीनमध्ये झाला. तसेच, कागदाचा शोध कुठे लागला; तर म्हणे, चीनमध्ये लागला. इसवी सनाच्या सुमारे १०५ या वर्षी चीनमध्ये त्साई लुन किंवा काई लुन या इसमाने, कागद सर्वप्रथम बनवला. त्याने म्हणे मासे पकडण्याची जुनी जाळी आणि जुन्या कपड्यांच्या चिंध्या यांचा एकत्र लगदा करून तो वाळवला. मग त्या वाळलेल्या लगद्यावर त्याने काहीतरी लिहिले. ते लिखाण पसरले नाही किंवा फुटले नाही. मग त्याने पुन्हा लगदा बनवून, त्यात काही विशिष्ट झाडांचा रस किंवा लगदा मिसळला. यातून बनलेला सुका लगदा आणखीनच चांगल्या दर्जाचा झाला आणि अशा रीतीने कागदाचा जन्म झाला. हा त्साई किंवा काई लुन कोण होता; तर राजाच्या अंतःपुरावर देखरेख ठेवणारा अधिकारी होता. या सगळ्याला पुरावा काय; तर चिनी इतिहासकारांनी म्हणे हा सगळा वृत्तांत लिहून ठेवला आहे. बरे मग, चीनमधून हा कागदाचा शोध पश्चिमेकडे कसा पोहोचला?
त्याचाच वृत्तांत अलेक्झांडर मन्रो नावाच्या विद्वानाने, ‘पेपर ट्रेल’ या आपल्या ताज्या पुस्तकामध्ये दिला आहे. इ. स. १०५ मध्ये चीनमध्ये कागद निर्माण झाला खरा पण, इ. स. ७५१ पर्यंत तरी पश्चिमेला त्याची काहीच माहिती नव्हती. म्हणजे तोपर्यंत पश्चिमेतले लोक पपायरस, चामड्याचे तुकडे, वेगवेगळ्या प्राण्यांची कातडी किंवा भूर्जपत्रे यांच्यावरच लिखाण करत होते. इसवी सनाच्या सातव्या शतकात इस्लामचा जन्म झाला. इस्लामच्या झेंड्याखाली अरबांचे साम्राज्य, मध्य आशियात वेगाने फैलावू लागले. अरबांच्या सत्तेेचे म्हणजे खिलाफतीचे मध्यवर्ती केंद्र, मक्का-मदिनेहून बगदाद या प्राचीन शहरात गेले. तिथे अब्बासी वंशाचे खलिफा राज्य करू लागले (अब्बासाईड खलिफेट). ते पूर्वेकडच्या तुर्कवंशीय प्रदेशांवर स्वार्या करून, राज्यविस्तार भाणि धर्मप्रसार करू लागले. अशा घटनाक्रमात इ. स. ७५१ साली बगदादी अरब आणि चीन यांच्या सैन्यांची गाठ, मध्य आशियातल्या तलास इथल्या रणांगणावर पडली. अरब जिंकले. त्यांनी बर्याच चिन्यांना कैद केले नि गुलाम म्हणून बगदादला नेले. या चिनी गुलामांकडून अरबांना, कागद बनवण्याची कला प्राप्त झाली. इ. स. ७९५ मध्ये अब्बासी घराण्यातला सगळ्यात प्रसिद्ध खलिफा हारून अल् रशीद याच्या कारकिर्दीत, बगदादमध्ये पहिला कागद कारखाना निघाला. मग मुसलमानांची आणखी दोन प्रसिद्ध केंद्र म्हणजे, दमास्कस किंवा दमिश्क आणि अलेक्झांड्रिया किंवा इस्कंदरिया अशा दोन शहरांमध्ये, कागद निर्मिती सुरू झाली. इजिप्तपासून मोरोक्कोपर्यंत म्हणजे संपूर्ण उत्तर आफ्रिकेत पुढच्या ४०० वर्षांमध्ये भरपूर कागद केंद्र निर्मिती केंद्र निघाल्यानंतर, मोरोक्कोतल्या मूरीश अरब मुसलमानांनी सन ११५०च्या सुमारास कागद स्पेनमध्ये नेला. अशा रीतीने एकदाचा कागद युरोपात पोहोचला.
यानंतर सन १४३९ साली गटेनबर्गने मुद्रणयंत्राचा शोध लावून, त्या कागदावर सर्वप्रथम ‘बायबल’ छापले. पुढच्या काळात युरोपीय संशोधकांनी कागद निर्मितीचे इतके असंख्य यांत्रिक-तांत्रिक प्रकार नि प्रक्रिया शोधून काढल्या की, इसवी सनाच्या १२व्या शतकाच्या मध्यापर्यंत या लोकांना कागदच माहिती नव्हता, यावर विश्वासच बसू नये. कागदाच्या निर्मितीचा हा इतिहास तसा सर्वज्ञात आहे. मग अलेक्झांडर मन्रो या विद्वानाने आपल्या ताज्या पुस्तकात नवे काय शोधले आहे? मन्रोचे म्हणणे असे आहे की, इलेक्ट्रिसिटी, पेनिसिलीन, काचेचा चष्मा, ऑटोमोबाईल कम्बश्चन इंजिन हे आधुनिक शोध जरी फार क्रांतिकारक मानले जात असले, तरी खरा क्रांतिकारक शोध आहे तो म्हणजे कागदाची निर्मिती हा आणि हा शोध चीनने दोन हजार वर्षांपूर्वीच लावला, म्हणून मन्रो चीनची भरभरून स्तुती करतो आहे. मन्रो म्हणतो, इसवी सनाच्या चौथ्या शतकात, जेव्हा आमचे रोमन नि ग्रीक विद्वान पपायरसच्या तुकड्यावर किंवा चामड्यावर लिहित होते; तेव्हा चीनमध्ये सर्वसामान्य माणसेसुद्धा सर्रास कागद वापरत होती. लिहिण्यासाठी आणि टॉयलेट पेपर म्हणून सुद्धा. अनेक उत्तमोत्तम बौद्धग्रंथ कागदावर ग्रथित होऊन, जपान आणि कोरियापर्यंत पोहोचले देखील होते. इसवी सनाच्या १५व्या शतकात इटलीमध्ये झालेला ‘रिनायसान्स’ म्हणजे पुनरुज्जीवन, हा सध्याच्या आधुनिक विज्ञानयुगाचा प्रारंभ मानला जातो. या क्रांतिकारक विकासक्रमात, कागदाचा वाटा फार मोठा आहे.
मन्रोच्या या सर्व प्रतिपादनात तथ्य आहेच. पण, आपल्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे, मन्रोेसकट सगळे पाश्चिमात्य विद्वान रोमन, ग्रीक, इजिप्त, चीन यांचा आवर्जून उल्लेख करताना, भारताला अगदी आठवणीने विसरतात. चीनमधला एक अधिकारी त्साई लुन याने इ. स. १०५ मध्ये कागदाचा शोध लावला, या चिनी इतिहासकारांच्या म्हणण्यावर मन्रोेसारखे विद्वान विश्वास ठेवतात. पण, मग इ. स. पूर्व ३२७ मध्ये ग्रीक आक्रमक अलेक्झांडर याच्याबरोबर भारतात आलेला निआर्कस याने, ‘हिंदू लोक कापूस कुटून त्यापासून कागद बनवतात’ असे स्वच्छपणे लिहून ठेवले आहे, याकडे मात्र ते आठवणीने दुर्लक्ष करतात.
इसवी सनाच्या चौथ्या शतकात चिनी विद्वानांनी बौद्धग्रंथ कागदावर लिहून, जपान आणि कोरियात नेले, असे मन्रो म्हणतो. पण, स्वतः चिनी बौद्ध परंपरा तसे म्हणत नाही. चिनी बौद्ध परंपरेनुसार, फा हियान हा पहिला चिनी बौद्ध भिख्खू इ. स. ३९९ ते इ. स. ४१४ या काळात, चीनमधून भारतात आला. त्याने इथून अनेक उत्तमोत्तम ग्रंथ चीनमध्ये नेले. मग त्याने आणि बुद्धभद्र नावाच्या एका भारतीय भिख्खूने मिळून, त्यांचे चिनी भाषेमध्ये भाषांतर केले.युरोपमध्ये कागद सन ११५० मध्ये गेला, असे मन्रो म्हणतो. पण, इसवी सनाच्या ११व्या शतकात मध्य भारतात ‘भोजपाल’ म्हणजे आजचे भोपाळ हे स्वत:च्या नावाचे शहर वसवणार्या, परमारवंशीय भोजराजाला कागद बनवण्याची कला चांगलीच अवगत होती. राजा भोज परमार कमळांच्या देठांपासून कागद बनवत असे आणि म्हणून, कमळांची शेती करण्यासाठी भोपाळ शहर नि आसपासच्या प्रदेशात त्याने असंख्य तलाव बांधले होते. युरोपात स्पेनमध्ये मूर मुसलमानांनी कागद नेण्यापूर्वी, १०० वर्षे म्हणजे इ. स. १०५३ मध्ये राजा भोज मरूनसुद्धा गेला होता.
आणि केवळ भारतीयांनाच कागद माहिती होता असे नव्हे. युरोपियन लोकांना इजिप्तबद्दल जवळीक वाटते कारण, इजिप्तचे टॉलेमी राजे हे मूळचे इजिप्शियन नसून, ग्रीक वंशीय होते. इसवी सन पूर्व २८३ यावर्षी मरण पावलेला राजा टॉलेमी सॉटर याने, अलेक्झांड्रियामध्ये एक भव्य ग्रंथालय सुरू केले. त्याचा मुलगा टॉलेमी फिलाडेल्फस याने त्या ग्रंथालयात, देशोदेशींचे ग्रंथ आणवले. रोमन सम्राट ज्युलियस सीझरने इजिप्तवर स्वारी केली तेव्हा, अलेक्झांड्रियाच्या या विख्यात ग्रंथालयात सात लाख ग्रंथ होते, अशी नोंद रोमनांनीच केलेली आहे. आता हे एवढे सगळे ग्रंथ पपायरसवर किंवा चामड्यावर लिहिलेले होते, असे समजणे मूर्खपणाचे ठरेल. या ग्रंथालयाला रोमन सैनिकांनी आग लावली, तरी बरेच ग्रंथ बचावले, ते पुढे इ. स. ३९१ मध्ये ख्रिश्चन सैन्याने जाळून टाकले. म्हणजे, पुढे मुसलमानांनी युरोपातली आणि भारतातली ग्रंथालये बेचिराख केली, त्याची सुरुवात युरोपियांनीच केलेली होती.
असो. एकंदरीत पाश्चिमात्य विद्वान, लेखक, साहित्यिक हे भारताला मुळी मोजतच नाहीत. भारताची ही तर्हा, तर महाराष्ट्राबद्दल बोलायलाच नको! महाराष्ट्रातले जीर्णनगर, जुण्णनगर किंवा जुन्नर हे शहर अत्यंत प्राचीन आहे. कल्याण स्थानक म्हणजे ठाणे, शूर्पारक म्हणजे सोपारा या कोकणातल्या बंदरांमार्फत, जुन्नरचा व्यापार थेट रोमपर्यंत चालायचा. जुन्नरमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचा कागद बनायचा, जो संपूर्ण महाराष्ट्रात तर वापरला जायचाच पण, मुसलमानी राजवटीत उत्तर भारतातही जायचा.
अलेक्झांडर मन्रो किंवा तत्सम युरोपीय पश्चिमी विद्वानांच्या खिजगणतीतही जुन्नर, भोपाळ किंवा एकंदरीतच भारत नाही. इजिप्तमधील पिरॅमिडमधल्या राजा-राणीच्या मृतदेहांभोवती रेशमी आणि सुती कापड गुंडाळलेले आहे, म्हणून ते म्हणे सर्वात प्राचीन. अरे, पण ते कापड बनले भारतात, वाराणसीत आणि ‘बौद्ध जातक’ ग्रंथांमध्ये त्या अतितलम कापडाचा उल्लेख ‘काशी कुत्तीय’ या नावाने केला आहे, त्याचे काय?
नाही! अशा उल्लेखांकडे दुर्लक्ष करायचे. भारतीय हिंदू-बौद्ध लेखक काय म्हणतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. मग तो पुरावा ‘लिटररी एव्हिडन्स’ असो, नाहीतर ‘आर्किऑलॉजिकल एव्हिडन्स’ असो, तो अनुल्लेखाने मारायचा. पण, भारताबद्दल आणि त्यातही भारताच्या उणीवांबद्दल मॅगेस्थिनीस, प्लिनी, अल् बेरुनी वगैरे परकीय प्रवासी लेखक काय म्हणतात, ते मात्र अगदी ठळकपणे दाखवून द्यायचे. कारण? कारण सरळ आहे. भारत हा दुर्लक्ष करण्यासारखाच देश आहे. पण, मग चीनची एवढी तारीफ का? कारण, चीन ही उभरती महासत्ता आहे. चीन ही प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. ती काबीज करायची असेल, तर चिनी समाजाला, राज्यकर्त्यांना आंजारून, गोंजारून, चुचकारून घ्यायला पाहिजे. म्हणजे इतिहासलेखनाचे उद्दिष्टही, अखेर वर्तमान व्यापारी स्वार्थ साध्य करणे हेच आहे, सत्यशोधन हे नाही.