दक्षिण भारतातील तामिळ ही जगातील संस्कृत एवढीच, प्राचीन अभिजात भाषा आहे. या भाषेत अनेक रामकथा लिहिल्या गेल्या आहेत. त्यामध्ये इसवी सनाच्या नवव्या शतकात चोल राज घराण्याच्या राजवटीत, कम्बन् हा थोर महाकवी, चिंतक, तत्त्वज्ञ होऊन गेला. या महाकवीचे रामायण ‘कम्ब रामायण’ तथा ‘रामावतारम्’ म्हणून विश्वविख्यात आहे. जागतिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती महाकाव्य म्हणून, कम्ब रामायणाचा गौरव केला जातो. ‘कविचक्रवर्ती’ अशा अनेक पदव्याप्राप्त कम्बन् हा राजकवी होता. तामिळ भाषा गौरव, कीर्तिस्तंभ म्हणून, दोन महाकवींना ओळखले जाते. पहिले महाकवी तिरुवलुवर आणि दुसरे कविचक्रवर्ती राजकवी कम्बन. ‘कम्ब रामायण’ सहा कांडाचे असून, 123 अध्याय आणि दहा हजार ओळींचे रसोत्कट काव्य आहे.
गेल्या काही लेखांमध्ये आपण, उत्तर भारतातील आणि पूर्व-पूर्वोत्तर भारतातील रामायणांचे अवलोकन केले. आता आपण दक्षिण भारतातील रामायणांचे शब्ददर्शन करूया. दक्षिण भारत म्हटले की, पहिला मान जगातील सर्वात प्राचीन अशा तामिळ भाषेतील कविचक्रवर्ती कम्बन् याच्या ‘कम्ब रामायण’ महाकाव्यालाच देणे रास्त ठरते. प्रभु श्रीरामांवर उत्तर भारतीय साहित्यात जेवढे विपुल लिहिले गेले, तेवढेच विपुल साहित्य आपणांस दक्षिण भारतातील तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या चार भाषांमध्ये आढळते. त्यामुळे श्रीराम हा उत्तर भारतीयांचा असा अपप्रचार करीत, भारतीय संस्कृतीमध्ये भेदाभेदाची बीजे रोवण्याचा कुटील प्रयत्न काही जण करतात, तो साफ खोटा आहे. तामिळ ‘कम्ब रामायण’ शिवाय मल्याळम भाषेत ‘रामचरितम्’, ‘रामकथापट्टू’, ‘कण्णश रामायण’, ‘रामायण चम्पू’, ‘केरळ वर्म रामायण’, तेलुगू भाषेत ‘द्विपद रामायण’, ‘निर्वचनोत्तर रामायण’, ‘भास्कर रामायण’, ‘राम्याभ्युदयम्’, ‘सुग्रीव विजयम्’, ‘मोल्ल रामायण’, ‘गोपीनाथ रामायण’, ‘एकोजी रामायण’, कन्नड भाषेतील ‘तोरवे रामायण’, ‘मैरावणकालग’, ‘जैमिनी भारत’ या काही प्रमुख साहित्यकृती आहेत. या सर्व साहित्यकृतींमध्ये रामकथा भक्तीभावाने गायलेली आहे. दक्षिण भारताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य, मोठेपण म्हणजे, भक्ती आंदोलनाचा उदय हा दक्षिण भारतात झाला आणि मग ते कालांतराने संपूर्ण भारतात पसरले. ‘भक्ती दक्षिण उपजी।’ असे संतवाणीत वर्णन आहे.
भक्ती द्राविड उपजी लाए रामानंद ।
परगट कियो कबीरने सप्तदीप नवखंड ॥
कबीरांच्या गौरवार्थ या काव्यात, दक्षिण भारतातील ‘द्राविड प्रांती भक्तीचा’ उदय झाला आणि ती थोर संत रामानंदांनी, उत्तर भारतात आणली. कबीराने तिचा जगात प्रसार केला. अशा प्रकारे दक्षिण भारत ही भक्तीची जननी आहे आणि या भूमीत, वैष्णव भक्तभागवत आळवार संतांनी रामभक्तीने, राम गीताने भक्ती आंदोलनाचा हलकल्लोळ केला. या पार्श्वभूमीवर आपण या लेखात, कविचक्रवर्ती कम्बन् याच्या ‘कम्ब रामायणा’चे शब्ददर्शन करू.
‘कम्ब रामायण’ तथा ‘रामावतारम्’
कवी कम्बन् याचा जन्म नवव्या शतकात, चोल राजवटीमध्ये ‘तिरुवलुंदर’ गावी झाला. त्याचे वडील आदित्तन हे राजपुरोहित विद्वान होते. कम्बन्चे लहानपण वडिलांच्या धर्मपरायण सत्संगात गेले. वडिलांपाशीच त्यांनी अगदी लहान वयातच, विविध ग्रंथाचा अभ्यास केला. त्याकाळी तमिळनाडूमध्ये विष्णु, रामभक्त वैष्णव आळवार संतांचे, भक्ती आंदोलन चरम अवस्थेत होते. नम्माळवार संतांच्या सत्संगाने, कम्बन् रामभक्तीकडे आकर्षित झाला व रामाचा बालभक्त म्हणून सर्वत्र ओळखला जाऊ लागला. या नम्माळवार संतांच्या प्रेरणेने व वडिलांच्या प्रोत्साहनपर मार्गदर्शनाने, कम्बन् याने रामायण लिहिण्याचा शुभ संकल्प केला. कम्बन् अद्भूत प्रतिभेचा धनी होता. केवळ पाच वर्षांच्या कालावधीत त्याने, दहा हजार ओळी, 123 अध्याय अर्थात पादम् असे सहा कांडाचे रामायण पूर्ण केले. फाल्गुन पौर्णिमेच्या मंगल दिनी (इ. स. 885) या रामायणाचे श्रीरंगम् येथे विद्वत्जन, पुरोहितवृंद, धर्ममार्तंडांच्या उपस्थितीमध्ये जाहीर वाचन झाले. कम्बन् चे हे ‘रामावतारम्’ रामायण ऐकून, सारा विद्वान श्रोतेवर्ग अभिभूत-विस्मयचकीत झाला. त्या विद्वत्सभेतच, कवी कम्बन् यास ‘कविचक्रवर्ती’ असा गौरव पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले. कम्बन् पूर्वीही अनेक भावकवींनी रामायणे, रामकथा तामिळ भाषेत लिहिल्या होत्या. पण, कम्बन्चे ‘रामावतारम्’ हे सर्वश्रेष्ठ तामिळ रामायण म्हणून, सर्वांनी त्याची प्रशंसा केली. ‘तामिळ शारदेचा कौस्तुभमणी’ असे त्यास, तामिळ साहित्यविश्वात अढळ स्थान लाभलेले आहे.
कविचक्रवर्ती कम्बन्चे ‘रामावतारम्’ हे रसपरिपूर्ण, उत्कट महाकाव्य आहे. हे रामायण गोस्वामी तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’च्या 600 वर्षे आधी लिहिले गेले, हे लक्षात घेण्यासारखे आहे. विशेष म्हणजे इ.स. नववे शतक ते 14वे शतक ही 500 वर्षे, कम्बन् प्रभावाचे ‘कांचन युग’ मानले जाते. असा कम्बन् हा युग निर्माता श्रेष्ठ महाकवी होता. त्यांच्या प्रज्ञा, प्रतिभेच्या भरार्या, शब्दसामर्थ्य, सौंदर्य दृष्टी, उदात्त व्यापक विचार याचे विलक्षण मोहक दर्शन आपणास, ‘रामावतारम्’मध्ये होते. प्रभू रामचंद्र हा केवळ राजपुत्र, राजाच नव्हे, तर एक अवतारी दिव्य महापुरुष आहे, असा त्याचा रामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. दैवी महापुरुष म्हणून तो, रामाचे गुणवर्णन करतो.
कम्बन् केवळ साहित्यिक, केवळ भाविक भक्त नाही, तर थोर तत्त्वचिंतक आहे. अर्थशास्त्र, ज्योतिष, राजनीतीसह अनेक विषयांवर त्याचे प्रभुत्व आहे. त्यामुळे त्यांच्या रामायणात देश, काळ, परिस्थिती, लोकजीवन याविषयी अनेक प्रकारचे, अनेक विचार तो व्यक्त करतो. त्याच्या रामायणात राष्ट्रीय, सामाजिक एकतेचा, समरस समाजाचा स्वर प्रखरपणे जाणवतो. हिंदू सनातन संस्कृतीचा यथोचित स्वाभिमानपूर्वक गौरव आहे. कम्बन् हा वैष्णव रामभक्त असला, तरी तो संकुचित पंथबद्ध नाही. त्याचे काव्य कोणत्याही एका पंथ-संप्रदायाचा पुरस्कार करीत नाही. तो रामाप्रमाणे शिवशक्तीचा उपासक आहे. पंथ-संप्रदाय, देवदेवता यांच्यातील भेदाभेद त्याला मान्य नाही. त्यामुळे कम्बन् रामायणाचे, सर्व पंथ संप्रदायांनी स्वागत व कौतुक केलेले आहे. राम-रामायणावरील समग्र साहित्याचे विश्वविख्यात अभ्यासक, संशोधक डॉ. कामिल बुल्के यांनीही, ‘कम्ब रामायणा’ची प्रशंसा केलेली आहे व त्याची विश्वसाहित्यातील श्रेष्ठ काव्याची गणना केलेली आहे.
विद्याधर ताठे
9881909775
(पुढील लेखात ः कन्नड भाषेतील तोरवे रामायण)