गाथा समृद्ध ग्रंथालयाची...

    22-Feb-2025
Total Views |

श्री संत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय
महाराष्ट्रातील समृद्ध ग्रंथालयांच्या परंपरेतील एक उत्तम ग्रंथालय म्हणजेच आळंदी(देवाची)मधील ‘श्री संत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय.’ सध्या राजधानी नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही सुरु आहे. त्यानिमित्ताने दुर्मीळ अशा संदर्भग्रंथांचा तसेच, हस्तलिखितांचा प्रचंड मोठा संग्रह असलेल्या या अनोख्या ग्रंथालयाविषयी...

एखाद्या गावात आडवाटेने फिरताना काही गोष्टी या सहज मनात भरतात आणि मग त्याबद्दल अधिक जाणून घेतल्यावर अभिमान वाटतो. असेच मध्यंतरी माऊलींच्या दर्शनासाठी अलंकानगरीत अर्थात आळंदीला गेल्यावर ‘श्री संत निवृत्तीनाथ महाराज ग्रंथालयाला’ भेट देण्याचा योग आला. खरं तर ग्रंथालय म्हणजे ग्रंथसंग्रहाचे स्थान. ‘ग्रंथालय’ ही प्राचीन सामाजिक संस्था असून, तिला मोठा इतिहास आहे आणि मानवी संस्कृतीशी तो बर्‍याच अर्थी समांतर आहे. ग्रंथ, वाचक आणि ग्रंथालयातील सेवक हे ग्रंथालयाचे तीन प्रमुख घटक आणि या घटकांचे स्वरूप व त्याविषयीच्या कल्पना काळानुसार बदलत असतानासुद्धा आधुनिकीकरण याबरोबरच अद्ययावत ग्रंथालयाची वास्तू आणि तेथील स्वच्छता ही कौतुकास्पद आहे.
 
श्री माऊलींच्या कृपाप्रेरणेने ‘श्रीपाद सेवा मंडळा’चे मामासाहेब देशपांडे यांनी स्थापन केलेल्या ‘श्री ज्ञानदेव सिद्धबेट तपोवन ज्ञान-योग-अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान’ या संस्थेच्यावतीने आळंदीच्या वैभवात मोठी भर घालणारा एक प्रकल्प आकारास आला आहे. महाराष्ट्रातील समृद्ध ग्रंथालयांच्या परंपरेतील एक उत्तम ग्रंथालय म्हणजेच ‘श्री संत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय’ आहे आणि ते प्रत्यक्षात बघण्यासारखे आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आपण आवर्जून बघू शकतो.
 
बर्‍याच वेळा पुस्तकांच्या देवाणघेवाणीचे केंद्र म्हणजेच ग्रंथालयाची ओळख असते. पण, हे फक्त ग्रंथालय नसून अद्ययावत सुविधांनी युक्त एक संपन्न अभ्यासकेंद्र आहे. दुर्मीळ आणि प्राचीन ग्रंथ कसे जतन करता येतील, याचे प्रात्यक्षिक येथे बघता येईल. आजघडीला ग्रंथालयाने अडीच लाख ग्रंथसंख्येचे उद्दिष्ट ठेवलेले असून, लवकरच ते पूर्णत्वाला जाईल, हा विश्वास वाटतो. आज एकूण 77 हजार एकूण पुस्तके, नऊ हजार संदर्भग्रंथ आणि जवळपास 70 हजार इतर पुस्तके येथे बघायला मिळतात. यानिमित्ताने सर्व संतवाड्मयाचा सखोल, तौलनिक अभ्यास व्हावा, तसेच त्यांच्या तत्त्वज्ञानाची शिकवण, जीवन कसे उन्नत करू शकेल, याचे चिंतन व मनन व्हावे व त्याकरिता संशोधन करणे, यासाठी हे ग्रंथालय तत्पर आहे. वाचकांना याचा फायदा व्हावा आणि त्यांनी फायदा करून घ्यावा, हीच ग्रंथालयाची इच्छा आहे.
 
ग्रंथ आणि ग्रंथालय अभ्यासकांसाठी ग्रंथालयाच्या पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावर व्यवस्था करण्यात आली आहे. या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे असणार्‍या अत्यंत दुर्मीळ अशा संदर्भग्रंथांचा तसेच हस्तलिखितांचा प्रचंड मोठा संग्रह पहिल्या मजल्यावर सांभाळलेला आहे. ग्रंथालयाच्यावतीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहेत आणि तो म्हणजे दुर्मीळ आणि महत्त्वाच्या पोथी आणि पुस्तकांचे स्कॅनिंग करून ते सर्व ग्रंथ अभ्यासकांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि त्याचे प्रात्यक्षिक बघून ते समजून घेणे म्हणजे एका अर्थाने पर्वणीच आहे. त्यासाठी उत्तमोत्तम दर्जाचे स्कॅनर, प्रिंटर येथे असून, अनेक ग्रंथांचे डिजिटायझेशन पूर्ण झालेले आहे आणि काही अजूनही चालू आहे.
 
या ग्रंथालयाची कार्यपद्धती पण अनोखी आहे. म्हणजे, दुर्मीळ हस्तलिखिते व पुस्तके मिळवणे, त्यांची योग्य ती सफाई करणे, त्यानंतर महत्त्वाची संदर्भ आणि पुस्तके यांची यादी करून संशोधन करणार्‍या समूहाकडे ती हस्तांतरित करणे, त्यानंतर संशोधन करणारे ठरवतात की, ही पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध असतील, तर आपणास स्कॅन करावी लागत नाही, अन्यथा त्या पुस्तकांचे संगणकीकरण (ीलरपपळपस) करणे आवश्यक आहे, हे ठरवतात. स्कॅनिंग झालेली पुस्तके अत्याधुनिक अशा ‘मशीन लर्निंग’ या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने त्याची गुणवत्ता चांगली आहे की नाही, हे तपासून, त्यानंतर स्कॅन केलेल्या प्रत्येक पुस्तकाचे प्रत्येक पान हे मूळ पुस्तकाप्रमाणे झाले आहे की नाही, याची तपासणी केली जाते आणि त्यानंतर सर्व गुणवत्ता व पुस्तकाची वाचनीयता तपासून सदर पुस्तक किंवा हस्तलिखित हे पोर्टलवर ठेवण्यात येते आणि वाचक त्याचा उपयोग करू शकतो.
 
आज या ग्रंथालयास अनेक मान्यवर अभ्यासकांचे ग्रंथसंग्रह प्राप्त झालेले आहेत. ‘मराठी मॅन्युस्क्रिप्ट सेंटर’ने सुमारे 1 हजार, 100 हस्तलिखित ग्रंथ व पोथ्या मोठ्या विश्वासाने या संस्थेला दिल्या आहेत. हे सर्व ग्रंथवैभव अभ्यासकांसाठी अनमोल खजिनाच आहे. उत्तमोत्तम ग्रंथांची दिवसागणिक त्यात वाढ होत आहे. आज स्कॅनिंग पूर्ण झालेली साधारण 1 हजार, 200 पुस्तके आपण बघू शकतो. अनेक मान्यवरांनी आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनीसुद्धा या ग्रंथालयाला भेट दिली आहे.
 
ग्रंथांवर मनस्वी प्रेम करण्यार्‍या प. पू. शिरीषदादा कवडे आणि अनिरुद्धदादा आगटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ग्रंथालय यशस्वी वाटचाल करीत आहे. नवनवीन उपक्रमांसह वाचकांना, अभ्यासकांना ज्ञानसमृद्ध करण्याचा मानस असलेले हे ग्रंथालय अभ्यासकांना महत्त्वाचे योगदान देणारे ठरले आहे. सनातन वैदिक धर्मातील दुर्मीळ हस्तलिखिते आणि काही ग्रंथ कागदांवर टिकेल की नाही, असा प्रश्न पडल्याक्षणी काही ग्रंथ हे सर्वोत्तम कागदावर छापून जतन करण्यात आले आहेत. त्यामुळे ते नवीन रूपात बघताना आश्चर्य वाटते.
 
आज ग्रंथालयातील वाचक सभासदांची संख्या तसेच, नोंदणीकृत ग्रंथ संख्या सतत वाढत आहे. निवडक कथा, कादंबर्‍या, विविध भाषांमधील वाड्.मय चोखंदळपणे खरेदी करण्यासाठी ग्रंथालय नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. तसेच, इतर सामाजिक संस्था व पुस्तकप्रेमींकडून ग्रंथदेणग्यासुद्धा लाभल्या आहेत. अनेकांना प्रश्न पडतो की, आपली ग्रंथसंपदा कुठे देता येईल किंवा काही दुर्मीळ ग्रंथ चांगल्या पद्धतीने कुठे ठेवता येतील, त्यांच्यासाठी हे ग्रंथालय सर्वोत्तम पर्याय आहे. कारण, त्यामुळेच शेकडो विषयांवरील हजारो पुस्तके ग्रंथालयात संग्रही राहतील आणि येणार्‍या पिढीला याचा फायदा करून घेता येईल. कारण, ग्रंथ हेच गुरू आहेत आणि प्रत्येकाला ते दिशादर्शक आहेत आणि कायम राहतील. यासाठी समृद्ध ग्रंथालये राहिली, तर माणूसही सतत नावीन्यपूर्ण आणि संशोधनाच्या शोधात राहील. आवर्जून भेट द्यावी असे ग्रंथालय...
 
सर्वेश फडणवीस 
 
(ग्रंथालयाचा पत्ता : श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय, वडगांव-घेणंद रस्ता, सर्व्हे क्रमांक 47/1, आळंदी(देवाची), तालुका खेड, जिल्हा पुणे)8668541181