मेथी : महाराष्ट्रातील यादवकालीन मंदिरांचा हिरवागार वारसा

    22-Feb-2025
Total Views |

Methi
 
मागच्या अडीच हजार-तीन हजार वर्षांपासून भारताच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्वांगीण जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारा प्रदेश म्हणजे आपला महाराष्ट्र. या आपल्या राज्यात प्राचीन वैभवशाली संस्कृतीच्या खुणा जागोजागी दिसतात. पण, काही प्रदेश, भाग हे दुर्लक्षित किंवा अपरिचित असतात. महाराष्ट्रातील अशाच एका अपरिचित पण महत्त्वपूर्ण वारसास्थळाचा परिचय आपण आज करून घेणार आहोत.
 
अगदी शाळेत असल्यापासून धुळे जिल्ह्याची ओळख पुस्तकांमध्ये रखरखीत हवामान, कमी पाऊस, दुष्काळी भाग, जनजाती क्षेत्र आणि स्वातंत्र्यलढ्यात नंदुरबारचा शिरीष कुमार याचे हौतात्म्य एवढ्यापुरती मर्यादित होते. पुढे इतिहासाचा, प्राचीन भारतीय वारसास्थळांचा अभ्यास सुरू केल्यानंतर धुळ्याकडे असलेल्या समृद्ध ऐतिहासिक गोष्टींची, वास्तूंची हळूहळू ओळख होऊ लागली. राजवाडे संशोधन केंद्र, वाग्देवता मंदिर, जवळच असलेले झोडगे गावातले माणकेश्वर मंदिर, बळसाणे गावातला मंदिर समूह तसेच, नुकतेच ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या चैत्राम पवार यांचे बारीपाडा गाव आणि परिसर अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण जागा या धुळे जिल्ह्यात आहेत. त्यातलेच एक महत्त्वाचे जाणून घेण्यासारखे स्थळ म्हणजे मेथी.
 
धुळ्यापासून साधारण तासाभराच्या अंतरावर, सोनगीर-दोंडाईचा रस्त्यावर हे मेथी नावाचे गाव आहे आणि आजपासून 900 वर्षे आधी यादव राजांच्या कालखंडात बांधलेली लक्ष्मी-नारायणाची सुंदर मंदिरे इथे उभी आहेत.
 
गावात प्रवेश केल्यानंतर मुख्य रस्त्याच्या उजवीकडे ही दोन मंदिरे आजूबाजूला आहेत. दोन्ही मंदिरे ही प्रशस्त अधिष्ठान म्हणजे ‘प्लिथं’ किंवा पाया यावर उभी असून, लक्ष्मी मंदिराला समोरच्या बाजूने पायर्‍या आहेत, तर नारायण मंदिराच्या समोरून आणि उत्तरेकडून अशा दोन्ही बाजूने पायर्‍या आहेत. याच मंदिरात समोरच्या बाजूला आपल्याला वाहन मंडपदेखील दिसतो. गाभार्‍यातल्या देवतेचे वाहन हे या मंडपात असते. या ठिकाणी तिथे गरुड, विष्णूचे वाहन, विराजमान असावे असा अंदाज आहे. नारायण मंदिराच्या बाह्य भिंतींवर (मंदिर स्थापत्यशास्त्रीय भाषेत याला ‘मंडोवर’ असे म्हणतात) विष्णूशी निगडित वेगवेगळ्या कथा सांगणार्‍या शिल्पांची रचना केली आहे. देवकोष्ठात म्हणजेच बाह्य भिंतींवर मध्यभागी असणार्‍या प्रमुख चौकटींमध्ये अधिष्ठात्री देवतेची वेगवेगळी रूपे, कथा असतात. तिथे विष्णूचे विविध अवतार दिसतात. याच ठिकाणी पश्चिम दिशेला असलेल्या देवकोष्ठात एक अत्यंत दुर्मीळ शिल्प कोरलेले आहे.
 
विष्णूची वैकुंठ मूर्ती. हरिपाठात उल्लेख आलेला वैकुंठ म्हणजे हेच शिल्प. वैष्णवांचे पंचरात्र सिद्धांत मांडणारे हे शिल्प आहे. तीन चेहरे असणारी ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. मधला चेहरा हा वासुदेवाचा असतो, उजवीकडे त्याचा भाऊ संकर्षण जो सिंहमुखी दाखवतात आणि डावीकडे वासुदेवपुत्र प्रद्युम्न हा वराहमुखी असतो. पाठीमागे श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध असतो, जो अश्वमुखी असतो. प्रत्येक शिल्पात हा असतोच असे नाही. वासुदेवाचे हे तिन्ही चेहरे जीव, मन आणि अहंकार यांचे प्रतिनिधित्व करतात. याबद्दल डॉ. देगलूरकर सर यांनी त्यांच्या ‘विष्णूमूर्ती’ या पुस्तकात विस्तृत विवेचन केले आहे. काश्मीर, राजस्थान, मध्य प्रदेश अशा काही ठिकाणी हे शिल्प आहेत. पण, महाराष्ट्रात मंदिरावर असलेले कदाचित हे एकमेव वैकुंठ मूर्तीचे शिल्प असेल.
 
वैकुंठमूर्ती बरोबर या मंदिरात अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इतिहासाची रचना करत असताना अभ्यासकांना सर्वांत जास्त मदत होते ते लेखी पुराव्यांची. हे पुरावे ताम्रपट, शिलालेख, पत्र, नाणी या माध्यमातून आढळतात. या मंदिरात असाच एक अत्यंत महत्त्वाचा मोठा शिलालेख आपल्याला बघायला मिळतो. यात मंदिराला गाव दान दिल्याचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. या लेखामुळे मंदिराचा काळ ठरवण्यासाठी खूप मोठी मदत झाली आहे. नारायण मंदिराच्या प्रवेशद्वारावर जी पट्टी आहे, त्यावर गरुड कोरलेला दिसतो आणि त्याच ठिकाणी लक्ष्मी मंदिरात तिथे लक्ष्मी कोरलेली आहे. लक्ष्मी मंदिरात सरस्वतीची पाश आणि अंकुश घेतलेली खूप सुंदर मूर्ती आहे. या मंदिरांच्या अधिष्ठानात गजथर-कीर्तिमुख थर अशा दोन पट्टीसुद्धा कोरलेल्या आहेत. लक्ष्मी मंदिरात काही खांबांचे तुटलेले तुकडे आहेत. त्यावर असलेले नक्षीकाम बघून एकेकाळी हे मंदिर किती भव्य आणि सुंदर असेल, याची कल्पना करता येते.
 
याच गावात मंदिरापासून थोड्या अंतरावर दुसर्‍या बाजूला अजून एक मंदिर आहे, त्या मंदिराला ‘कृष्णामाई मंदिर’ म्हणतात. या मंदिरात तीन गर्भगृह आहेत, हे याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. मंदिराच्या खांबांवर वरच्या बाजूला काही स्त्री शिल्प दिसतात. ही शिल्प मातृकांची असावी, असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे. इथेच समोर एक बारवदेखील आहे. बारव म्हणजे पायर्‍यांची विहीर आणि तिच्या सर्व बाजूंनी देवकोष्ट (देव्हारे) आपल्याला इथे दिसतात. तिथे पूर्वी खूप सुंदर मूर्ती असाव्या, असा अंदाज इतर सर्व काम बघून नक्कीच बांधता येतो. पण, बारव ही अत्यंत वाईट परिस्थितीत आहे, पायर्‍या ढासळल्या असून बाजूची भिंतदेखील हळूहळू खचत निघाली आहे. याच ठिकाणी एक बाजूला देवळी आहे, तिथे शेषशायी विष्णूची एक सुंदर मूर्ती कोरलेली आहे.
 
आज या मंदिरांची अवस्था फार बरी नाही. परकीय आक्रमणात तर नक्कीच उद्ध्वस्त झाली आहेत. पण, त्यानंतर आपणदेखील त्यांची काळजी घेण्यासाठी असमर्थ ठरलो आहोत, हे अमान्य करता येणार नाही. ही मंदिरे लोकांना समजावीत, इथे येण्याची लोकांची संख्या वाढावी, मंदिरांचे वैभव परत अनुभवता यावे म्हणून गावकरी आणि धुळे जिल्ह्यातील नागरिक आणि काही संस्था यासाठी खूप कष्ट घेत आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, जळगाव अशा शहरांत राहणार्‍या लोकांसाठी शनिवार, रविवार सहज भेट देऊन येऊ शकतो, अशी ही ठिकाणे आहेत. या जागा आपल्या कवेत अनेक कथा घेऊन बसल्या आहेत. आपले कान तयार आहेत का हे ऐकण्यासाठी? त्या जागा अनुभवण्यासाठी? कारण, आपल्या समृद्ध संस्कृती आणि वारसा यांची साक्ष देणारी आणि तरीही दुर्लक्षित अशी ही मंदिरे आपली वाट बघत आहेत!
 
इंद्रनील बंकापुरे
 
7841934774
indraneel@virasatindia.in