स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे शतपैलू होते, असे अनेकदा आपण ऐकतो, वाचतो. पण, सर्वार्थाने सावरकरांच्या जीवनातील शतपैलू ह. त्र्यं. देसाई यांनी याच नावाच्या पुस्तकातून 40 वर्षांपूर्वी शब्दबद्ध केले होते. या पुस्तकाची नवीन आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली असून, दि. 26 फेब्रुवारीच्या सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त या पुस्तकाचे परीक्षण...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तेजस्वी जीवनाचा वेध अभ्यासक-लेखक घेत आले आहेत आणि अद्याप घेत आहेत. सावरकरांसारख्यांचे जीवन जितके अभ्यासावे, तितके त्यातील लोभस आणि प्रेरक पैलूंचे अधिकाधिक दर्शन होत राहते. हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी सावरकरांच्या जीवनाचा वेध ‘शतपैलू सावरकर’ या पुस्तकातून घेतला होता. हे पुस्तक म्हणजे सावरकरांचे चरित्र नाही. मात्र, त्यांच्या चरित्रातूनच अनेक आठवणी, संदर्भांनी बहुल असे हे पुस्तक होय. त्यासाठी देसाई यांनी आगळी लेखनशैली वापरली. जणू एखादा वक्ता सावरकरांच्या एकेका पैलूवर भाषण देत आहे, अशी कल्पना करून 65 भाषणांमधून सावरकरांची जीवनगाथा मांडत त्यातून प्रतीत होणार्या त्यांच्या पैलूंचा धांडोळा देसाई यांनी घेतला होता. या निराळ्या शैलीमुळे पुस्तक वाचकप्रिय ठरले होते. तथापि, मध्यंतरीच्या काळात ते उपलब्ध नव्हते. या पुस्तकाचे मोल लक्षात घेऊन, पुणेस्थित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मंडळा’ने या पुस्तकाची नवीन आवृत्ती नुकतीच प्रकाशित केली. अनेक छायाचित्रांसह देखण्या स्वरूपात हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
या पुस्तकात देसाई यांनी सावरकरांच्या जीवनातील ढोबळमानाने सर्वपरिचित घटना, प्रसंगांचा समावेश केला आहे आणि त्यात अस्वाभाविक काही नाही. याचे कारण ते प्रसंग वगळता येणे अशक्य. मात्र, पुस्तकाचे मर्म हे कदाचित विस्मृतीत गेलेल्या किंवा अपरिचित अथवा अल्पपरिचित घटना, प्रसंग, आठवणी यांना उजाळा देऊन सावरकरांच्या पैलूंचे दर्शन घडविण्यात आहे. यातील अनेक आठवणी, संदर्भांना प्रासंगिकतादेखील आहे, हे त्यांचे वैशिष्ट्य. उदाहरणार्थ, प्रारंभीच्याच ‘सातामुखी सावरकर’ या प्रकरणात देसाई यांनी सावरकरांविषयी काही दिग्गजांनी व्यक्त केलेल्या भावनांचा उल्लेख केला आहे. त्यात मानवेंद्रनाथ रॉय यांच्यापासून जनरल करिअप्पा यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. बॅरिस्टर नाथ पै यांची प्रतिक्रिया आवर्जून उल्लेख करावी अशी. सावरकरांचा गौरव सरकारने केला नाही, याबद्दल खेद व्यक्त करताना पै यांनी “आपले सरकार सूर्याकडे पाठ फिरवून काजव्यांच्या पाठीमागे धावत सुटले आहे,” अशी खंतही व्यक्त केली आहे. ‘भारतरत्न’ पुरस्कार हाही सावरकरांसाठी अपुरा आहे, असे त्यांनी म्हटले होते. ज्यांच्या प्रतिक्रियांची निवड देसाई यांनी केली आहे. त्यातील कोणीही हिंदुत्ववादी नाहीत. शिवाय, सावरकरांच्या हयातीतच त्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. आताच्या काळात सावरकरांवर काही घटकांकडून हेतुपुरस्सर अश्लाघ्य टीका होत असताना, या प्रामाणिक भावनांचे मोल आगळे! शिवाय आता गरळ ओकणार्यांचे खुजेपण अधिकच जाणवून देणार्या.
त्यापुढील 65 प्रकरणांतून देसाई यांनी सावरकरांच्या बहुपेडी जीवनाचा धांडोळा घेतला आहे. सावरकरांची ज्ञानलालसा, त्यांची गुणोत्तेजकता, त्यांचे संघटन कौशल्य, त्यांची चिंतनशीलता, त्यांचे वक्तृत्व, त्यांचे लेखन, त्यांचे राजनीतिपटुत्व, समाजसुधारक म्हणून त्यांची भूमिका, त्यांची विज्ञाननिष्ठा, इथून त्यांच्यातील वत्सल पिता इथंपर्यंत सावरकरांचे ‘शत’पैलू देसाई यांनी उलगडून दाखविले आहेत. या सर्व प्रतिपादनातील उल्लेखनीय भाग म्हणजे, त्यातील संदर्भबहुलता. केवळ सांगोवांगी अशा आठवणी न देता, देसाई यांनी आवश्यक तेथे प्रकाशित साहित्याचे संदर्भ आणि अवतरणे दिली असल्याने त्या प्रतिपादनाला वजन प्राप्त होते. यातील अनेक आठवणी, संदर्भ असे असू शकतात. जे आताच्या काळात कदाचित विस्मृतीत किंवा चर्चेच्या परिघाच्या बाहेर असतील. पण, या पुस्तकाच्या निमित्ताने अशा संदर्भांना पुन्हा उजाळा मिळाल्याशिवाय राहणार नाही. “मी माझे ‘कमला’ काव्य मिल्टनच्या छायेत बसून लिहिले आहे,” असे सावरकरांनी कवी उल्हास यांना सांगितले होते. असे नमूद करून लेखक सावरकरांची बहुश्रुतता आणि विद्वत्ता याचे दर्शन घडवतो. सावरकरांमधील पत्रकार ते लंडनमध्ये शिकत असताना कसा जागृत होता, हे कथन करताना शिवरामपंत परांजपे यांच्या ‘काळ’ पत्रासाठी सावरकरांनी 45 वार्तापत्रे पाठवली होती, याचे स्मरण करून देतानाच, त्या वार्तापत्रांची शीर्षके किती संयुक्तिक होती, हेही देसाई निदर्शनास आणतात.
सावरकर हे वक्तादशसहस्रेषु, त्यांचे वक्तृत्व स्वयंभू होते, असा ना. सी. फडके यांचा अभिप्राय लेखक नमूद करतात. सावरकरांच्या अनेक भाषणांमधील उतारे लेखकाने समाविष्ट केल्याने, त्या अमोघ वक्तृत्वाला आशयाची आणि चिंतनाची कशी जोड होती, याचा प्रत्यय आल्याखेरीज राहणार नाही. ‘प्रचारक नाटककार’ या प्रकरणात लेखकाने नाटककार म्हणून सावरकरांची भूमिका प्रचारकाची होती, हे विशद केले आहे. त्यामुळे नाटक म्हणून त्यांच्या दर्जाविषयी मतमतांतरे आहेत. मात्र, सावरकरांची भूमिका स्पष्ट असल्याने त्यातून काय साधायचे, याबद्दल त्यांच्या मनात संदिग्धता नव्हती. हिंदू समाजाचे पौरुष जागे करणे, हा त्यामागील हेतू. ‘सन्यस्तखङ्ग’ नाटकातील भावनोत्कट प्रसंग पाहताना नाट्याचार्य खाडिलकरांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या, अशी आठवण लेखकाने नमूद केली आहे. त्यावरून सावरकरांच्या नाटककार म्हणून लेखणीतील सामर्थ्य दृगोच्चर झाल्याखेरीज राहणार नाही. भाषा, लिपी यांचा संबंध केवळ लेखनमाध्यमाशी नसतो. राष्ट्रभक्ती, देशाभिमान, स्वातंत्र्य यांच्याशीदेखील असतो. भाषा आणि लिपी या दोन्हींच्या बाबतीत सावरकरांचे कार्य निःसंशय मोलाचे! ‘प्रिन्सिपल अत्रें’चे ‘आचार्य अत्रे’ सावरकरांमुळे झाले आणि नु. म. वि. हायस्कूल ही प्रशाला सावरकरांमुळेच झाली, याचा उल्लेख करून सावरकरांचा हा पैलू किती झळाळणारा होता, याचीच प्रचिती लेखकाने दिली आहे.
‘मराठी भाषेचे शुद्धीकरण’ हे पुस्तक सावरकरांनी लिहिले होते. ‘भाषाशुद्धी’ विषयावर 1925 ते 1951 साली असे ते वृत्तपत्रांतून लिहित होते, असे लेखकाने नमूद केले आहे. नागरी लिपी सुधारक म्हणून सावरकरांनी देवनागरी लिपीत अत्यावश्यक तेवढ्या सुधारणा केल्याचे पण, त्या विषयवार लेखनही केले. हिंदी साहित्य संमेलनाच्या लिपीसुधारणा समितीवर त्यांची सन्माननीय सदस्य म्हणून निवड झाली होती. पण, ते रत्नागिरीत स्थानबद्ध असल्याने ते सभासदत्व त्यांना स्वीकारता आले नाही, ही आठवण उद्बोधक!
सावरकरांचे संस्कृत प्रेम आणि प्रभुत्व त्यांच्या काव्यातून कसे प्रकट होई, याची ‘जयोस्तुते’पासून अनेक उदाहरणे लेखकाने दिली आहेत आणि सावरकरांच्या या आगळ्या पैलूवर प्रकाश टाकला आहे. ‘स्वातंत्र्यसंरक्षक सावरकर’ या प्रकरणात राष्ट्रीय संरक्षण सिद्धतेविषयी सावरकर किती आग्रही होते, याचे दाखले लेखकाने दिले आहेत. सावरकरांनी एका भाषणात “हिंदुस्थान स्वतंत्र झाला, तेव्हाच आजूबाजूचे सिक्कीम, नेपाळ, भूतान, ब्रह्मदेश, तसेच मॉरिशस, डच गयाना इत्यादी आपले हिंदू उपनिवेश आपल्याकडे आशेने पाहत होते, मिळू पाहत होते. पण, जो भारत यःकश्चित नागांपासून स्वतःचे रक्षण करू शकत नाही, तो चीनपासून आमचे रक्षण काय करणार, अशा हताशेने ते चीनकडे वळले आहेत,” असे म्हटले होते आणि आपली विमानदळे मजबूत करा, हा सल्ला त्यांनी दिला होता. चीनकडून भारताला 1962 साली नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला, तेव्हा सावरकरांची भीती अनाठायी नव्हती, हे सिद्ध झाले आणि त्यांचा सल्ला योग्य होता, हे अधोरेखित झाले. या सगळ्या पैलूंमध्ये काहीसा आश्चर्यकारक वाटणारा पैलू म्हणजे ‘विनोदप्रिय सावरकर’ हा. अंदमानात बारीचे प्रचंड फुगलेले पोट पाहून सावरकरांना शाळेत पृथ्वीचा आकार दाखविण्यासाठी ठेवलेल्या फुग्याची आठवण होत असे आणि बारीच्या पोटावरील पट्टा म्हणजे, त्या पृथ्वीच्या गोलावरील विषुववृत्त भासत असे. अशा काही अन्य प्रसंगांचा उल्लेख करून एखाद्या तत्त्वज्ञात दुर्मीळ वाटावा, अशा पैलूंवर लेखकाने प्रकाश टाकला आहे.
सावरकर आणि टिळक यात टिळक आणि सावरकर यांच्या कार्यातील अनेक साम्यस्थळे लेखकाने उलगडून दाखविली आहेत. सावरकर आणि गांधी, सावरकर आणि सुभाषबाबू, सावरकर आणि रा. स्व. संघ, या प्रकरणांतून सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील सह-प्रवासी, सल्लागार, मार्गदर्शक या भूमिकांतून कसे दिसतात, यावर लेखकाने लिहिले आहे. 1938 साली नागपूर येथे संघाच्या झालेल्या शिबिराचे उद्घाटन सावरकरांनी केले होते. 1938 साली पुण्यात झालेल्या ‘हिंदू युवक परिषदे’त बोलताना सावरकरांनी “रा. स्व. संघ हा भावी हिंदूराष्ट्राची आशा आणि भावी पिढी निर्माण होण्याचे एकमेव स्थान आहे,” असा विश्वास व्यक्त केला होता. डॉ. हेडगेवार यांचे देहावसान झाल्याचे समजल्यावर सावरकरांनी नागपूरला तार पाठवली : ‘डॉ हेडगेवार गेले! संघ चिरायू होवो!’
प्रस्तुत पुस्तक अशा आठवणी आणि संदर्भांनी ओतप्रोत भरले आहे. त्यातून सावरकरांचा त्यावेळच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजतोच. पण, त्यातून सावरकरांची अनंत रूपे समोर उभी राहतात. त्यांचे हे प्रत्येक रूप त्यांच्या एकेका पैलूचे प्रतीकच! त्या प्रत्येक पैलूचे बीज हे सावरकरांच्या उत्कट देशभक्तीत होते, याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानोपानी येईल. संरक्षणसिद्धतेपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेपर्यंत प्रत्येक बाबतीत सावरकरांच्या भूमिकांचे, योगदानाचे ठायीठायी स्मरण व्हावे, असे त्यांचे द्रष्टेपण हा या सर्व पैलूंचा ‘लसावी’ असेच म्हटले पाहिजे. आताच्या विमर्शाच्या (नॅरेटिव्ह) संघर्षात अनेक संदर्भ पुरवेल, असा हा उण्यापुर्या 400 पृष्ठांचा घसघशीत ऐवज आहे. म्हणूनच या ताज्या आवृत्तीचे स्वागत करावयास हवे.
राहुल गोखले
पुस्तकाचे नाव : शतपैलू सावरकर
लेखक : हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई
प्रकाशक : स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मंडळ, पुणे
पृष्ठसंख्या : 416
मूल्य : रुपये 500
(पुस्तक पुणेस्थित ग्राहक पेठ येथे 25 टक्के सवलतीत उपलब्ध)
(पुस्तकासाठी संपर्क : विद्याधर नारगोळकर, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मंडळ (संपर्क क्र. 9922889823); सूर्यकांत पाठक, कार्यकारी संचालक, ग्राहक पेठ, पुणे (संपर्क क्र. 9422016895)