कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच, असे म्हणतात. महाराष्ट्र काँग्रेसची गत त्याहून निराळी नाही. विधानसभेच्या निकालानंतर अस्थिपंजर झालेल्या पक्षाला आधार देण्याऐवजी, वरिष्ठ नेत्यांना एकमेकांच्या पायात पाय घालण्यात अधिक रस. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, नितीन राऊत अशी अनेक नावे त्यात घेता येतील. ‘एकाला झाकावा, दुसर्याला काढावा’ इतके यांचे पराक्रम महाभयंकर. बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाल्याचा आनंद जितका सत्ताधार्यांना झाला नसेल, त्याहून अधिक आनंद स्वपक्षीयांनी साजरा केला. बरे, इतके करून हाती काय आले? भोपळाच! ना सत्ता, ना विरोधी पक्षनेत्याची खुर्ची मिळाली. प्रदेशातील नेत्यांचे कारनामे हायकमांडच्या कानावर पडताच, त्यांनी प्रदेशाध्यक्षाची उचलबांगडी केली. या पदावर अशी व्यक्ती आणून बसवली की, महाराष्ट्रात टाचणी पडली, तरी त्याची माहिती दिल्लीला पोहोचेल.
हर्षवर्धन सपकाळ यांनी परवा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव आणि त्यांची कार्यपद्धती एकसमान. शांत, संयमी, मवाळ. सकपाळ यांनी याआधी आमदारकी, जिल्हा परिषद सदस्य आणि अन्य महत्त्वाची पदे भूषवली असली, तरी ते महाराष्ट्राला फारसे परिचित नाहीत. बहुतांश काँग्रेस कार्यकर्त्यांनीही त्यांचे नाव अलीकडेच ऐकले असावे. त्यामुळे खुर्चीवर बसण्याआधी स्वतःची ओळख निर्माण करण्याचे मुख्य आव्हान त्यांच्यापुढे असेल. पडत्या काळात पक्षाला सावरणे आणि ऊर्जितावस्था प्राप्त करून देणे, ही झाली पुढची बाब. त्याआधी पायात पाय घालणार्यांचा बंदोबस्त करावा लागेल. हे काम एखाद्या अग्निदिव्यापेक्षाही महाकठीण! कारण, त्यांना ज्यांच्या ‘कॉलर’ला हात घालायचा आहे, ते सगळे मातब्बर आणि महाधूर्त म्हणून ओळखले जातात. राजकारणात टिकण्यासाठी त्यांनी आजवर अनेक नरड्यांवर पाय दिल्याचे इतिहास सांगतो. अशावेळी पक्षातील सरंजामशाही मोडीत काढण्याच्या नादात स्वतःचे बलिदान द्यावे लागू नये म्हणजे मिळवले. नाना पटोलेंनी ती हिंमत करून पाहिली. मुळात त्यांचा स्वभाव राकट असल्यामुळे काहीकाळ त्यांनी पक्षात धाकही निर्माण केला. पण, चिखलात दगड टाकले म्हटल्यावर अंगावर शिंतोडे उडणारच! नानांची गच्छंती झाली. आता हर्षवर्धन सपकाळ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
जुन्या भिंतीला नवा रंग
‘चुलीपुढे शिपाई अन् घराबाहेर भागुबाई’ ही म्हण बहुदा काँग्रेस नेत्यांसाठीच तयार झाली असावी. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय बैठकांमध्ये ही मंडळी मोठमोठाली भाषणे करतात आणि प्रत्यक्षात लढायची वेळ येते, तेव्हा नामानिराळी राहतात. संस्थांने खालसा होण्याची भीती असते. पण, लढाईत नेत्यांनीच शरणागती पत्कारली, तर कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरवशावर राहायचे? काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही परवा तेच केले. राहुल गांधींचा चेहरा पुढे करून लोकसभा आणि अनेक राज्यांतील निवडणुका लढवल्या गेल्या. त्यात काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. महाराष्ट्रात तर मानहानिकारक पराभव झाला. त्याची जबाबदारी राहुल गांधींनी घेणे अपेक्षित होते. पण, खर्गेंनी ती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर ढकलली.
निवडणुकीतील परिणामांसाठी (निकाल) महासचिव आणि त्या-त्या राज्यांतील प्रभारींना जबाबदार धरले जाईल, असे फर्मानच खर्गेंनी सोडले. पण, राहुल गांधींचे पाप अन्य कोणी स्वतःच्या माथ्यावर का घ्यायचे? राहुल घाण करणार आणि कार्यकर्त्यांनी ती साफ करायची, हे दिवस आता सरले. हल्लीचा कार्यकर्ता हुजरेगिरीवर नाही, तर स्वतःच्या हिमतीवर पक्षात स्थान मिळवण्यावर विश्वास ठेवतो, हे एव्हाना काँग्रेस नेत्यांना कळले असेलच. अलीकडच्या वर्षांमध्ये काँग्रेसने किती नवे युवा सदस्य जोडले, याचे अवलोकन केल्यास त्यांना आपली जागा कळेल. तरीदेखील महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवण्याची भाषा करतात, हे हास्यास्पदच! ते महाराष्ट्र काँग्रेसची पुनर्बांधणी करायला निघाले आहेत, प्रत्यक्षात त्यांना संघटनेचे पुनरुज्जीवनच करावे लागेल. नवतरुण जोपर्यंत जोडला जात नाही, तोपर्यंत सत्तेची वाट बिकट आहे, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. तरुणांना काँग्रेस पक्षाकडे आकर्षित करणे, जवळपास अशक्य असल्याचे तेदेखील जाणतात. कारण, द्वेषमूलक विचार, नक्षलवाद्यांना खतपाणी घालण्याची वृत्ती, हिंदू धर्माबद्दल द्वेषभावना, घराणेशाहीला बळ देणारी कृत्ये करणार्यांसोबत युवा पिढी कशी जोडली जाईल? त्यामुळे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांनी जुन्या भिंतीला नवा रंग देण्यापेक्षा भिंतच नवी उभारावी, जेणेकरून स्पर्धेत टिकाव धरता येईल!