आई आणि बाळाचे नाते जगावेगळेच! कोणत्याही बाळाचे ठायी आईविषयी अपरंपार प्रेम असते. आपल्या हातून झालेल्या असंख्य चुका अथवा प्रमाद ते बाळ, आईपाशी मोकळ्या मनाने सांगते. सार्या जगाने जरी दुषणे दिली, दूर लोटले, तरी माझी आई मला दोष लावणार नाही, तर ती मला सांभाळून घेईल आणि योग्य मार्गदर्शनही करेल, हाच दृढ विश्वास बळाच्या मनामध्ये असतो. या विश्वासाला आजतागायत तरी विश्वातील समस्त मातृशक्तींनी कायमच जपले आहे. हाच आधार घेत, आई भवानीच्या चरणी आदि शंकराचार्यांनी आत्मोद्धाराचे ज्ञान देण्याचा हट्ट या स्तोत्रात केला आहे. आदि शंकराचार्य विरचित श्री भवानी अष्टकम् या स्तोत्राचा हा भावानुवाद....
भव पत्नी ती भवानी. हिचा उल्लेख आपल्याकडे आई भवानी, रेणुकाभवानी, तुळजाभवानी, दुर्गाभवानी या विभिन्न नामांनी केला जातो. तुळजाभवानी देवीची, आदि शंकराचार्यांनी पुनःप्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख आहे. याच भवानीदेवीची अनन्य शरणागत भावाने केलेली ही आळवणी आहे. ईश्वरी शक्तीप्रति, साधकाचा शरणागत भाव जागृत करणारे हे अष्टक आहे.
न तातो न माता न बन्धुर्न दाता
न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता।
न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि॥१॥
हे जगतजननी माते भवानी, मला तुझ्या वाचून अन्य कोणीही आधार नाही. तू म्हणशील, अरे तुला आई, वडील, भाऊ, बहीण, आश्रयदाते परोपकारी धनी, पुत्र, कन्या, बायको आणि भरपूर सेवक, पोषणकर्ता अर्थात पालक हे सगळे आहेतच की, मग तुला माझी ती काय गरज?
पण आई, यांच्यापैकी कोणीही उपयोगाचे नाही. वित्त, वैभव, धनसंपत्ती, विद्या या सर्व गोष्टीही वेळेला उपयोगाला येत नाही. वृत्ती म्हणजे निर्वाहाचे साधन, ते सुद्धा जिथल्या तिथेच राहाते. अंतिमतः एक तुझाच आधार उपयोगाला येतो. मला तुझ्याशिवाय दुसरा मार्ग नाही. तूच एकमेव मार्ग, उपाय, आधार, आश्रय आणि रक्षणकर्ती आहेस. अर्थात, तूच माझी गती आहेस. तात्पर्य, आई भवानी, तूच माझे रक्षण कर.
भवाब्धावपारे महादुःखभीरु
प्रपात प्रकामी प्रलोभी प्रमत्तः।
कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि॥२॥
भवाब्ध म्हणजे भवसागर. हा भयावह आहे. अनादि, अनंत आहे, याला पार अर्थात पैलतीर नाही. यात विसाव्याचे स्थानसुद्धा नाही. त्यातील जल म्हणजे अज्ञान असून, अज्ञानातून उत्पन्न होणार्या विविध कामनांचे कर्मफळ स्वरूप, दुःख हेच आहे. यातील महाग्राह म्हणजे मगरी, सुसरी म्हणजे वार्धक्य, मृत्यू आणि दुर्धर आजार आहेत. मनाला मोहवणारे विषय आणि त्यांच्या भोगाने सुखावणारी इंद्रिये, त्यातून निर्माण होणारा सुखाचा आभास, हेच यातील विसाव्याचे क्षण आहेत. ज्याला वैषयिक अनावर अशा लालसा आहेत, तो प्रकामी असतो. मी, असाच प्रकामी आहे.
मला लोभ अनावर झालेले असून, मी असाच प्रलोभी आहे. प्रमत्त शब्दाचे अर्थ वेडा, गैरसावध, बेफिकीर, चुका करणारा, विहित कर्मे न करणारा आणि प्रचंड अहंकारी असे आहेत. हे सर्वच दुर्गुण माझ्यात पुरेपूर भरले आहेत.
या सगळ्यात अडकलेल्या माझ्या अंतर्मनाला मात्र ही जाणीव आहे की, या अज्ञानात मी अनेक जन्म गुरफटून राहू शकतो. या सत्याची जाणीव मला अत्यंत भयभीत करत आहे. यातून बाहेर पडण्याचा मला ज्ञात असलेला एकमेव मार्ग म्हणजे, तुझी अंतःकरणपूर्वक आळवणी करणे.
न जानामि दानं न च ध्यानयोगं
न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रम्।
न जानामि पूजां न च न्यासयोगं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि॥३॥
जन्मापासून अठरा विश्वे दारिद्—यात जगलेल्या मला दान देणे म्हणजे काय असते, हेच माहीत नाही. त्याचप्रमाणे मला ध्यानयोगसुद्धा ज्ञात नाही. मला तंत्रशास्त्रात सांगितलेली पूजापद्धती ज्ञात नाही. त्यामुळे न्यास, मुद्रा, यंत्रपूजा, होमहवन कशाकशाचेच मला ज्ञान नाही. तुझी स्तोत्रे कशी जपावी, तुझा मंत्र कसा म्हणावा, तुझी पूजा कशी करावी, हे मला उमजत नाही. अंतरंगन्यास, बहिरंगन्यास काहीही मला ज्ञात नाही.
अशा अज्ञानी स्वरूपात, तुझ्या चरणकमळांचा आश्रय घेणे इतकेच मला समजत आहे. म्हणून आई भवानी मी तुला आळवतो आहे की, माझ्या आत्म्याला सद्गति केवळ तूच प्रदान करू शकतेस.
न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं
न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित्।
न जानामि भक्तिं व्रतं वापि
मातर्गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि॥४॥
हे जगद्जननी आई भवानी, मला पुण्य कसे अर्जित करतात, हेच माहीत नाही. सत्कर्मे करून पुण्य कमवावे, हे मला कधीच जमले नाही, ना तीर्थक्षेत्राला जाऊन पुण्यप्राप्ती मला साधली आहे. मला मुक्ती म्हणजे काय, हे सुद्धा माहीत नाही आणि चित्ताचा लय कसा साधायचा, याचेसुद्धा मला ज्ञान नाही. तुझ्या स्वरूपी चित्त कसे लीन करावे, हे कधी जाणून घेण्याचा मी प्रयत्नसुद्धा केला नाही. हे आई तुझी भक्ती कशी करावी, तुझे व्रत कसे करावे, याचेसुद्धा मला काहीही ज्ञान नाही.
कुकर्मी कुसङ्गी कुबुद्धिः कुदासः
कुलाचारहीनः कदाचारलीनः।
कुदृष्टिः कुवाक्यप्रबन्धः सदाहं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि॥५॥
हे जगद्जननी आई भवानी, मी नेहमी निंदा, टवाळी, चहाडी करणे यांसारख्या कुकर्मात रत असतो. त्याचप्रमाणे मला दुर्जनांचीच संगत नेहमी आवडते. माझी बुद्धीसुद्धा मी सत्कार्यात किंवा विधायक गोष्टींसाठी न वापरता, इतरांचे अनिष्ट कसे होईल हाच विचार करण्यात वापरत आलो आहे. मी स्वतःच्या शाश्वत हिताचा एकदाही विचार आजवर केला नाही. मी माझी प्रज्ञासुद्धा, नीच लोकांचे भले करण्यासाठीच आजवर खर्च केली आहे. मी माझी बुद्धी आणि शक्ती, विघातक आणि नकारात्मक कार्यासाठीच खर्च केली आहे. मी कधीही कुलपरंपरा आणि कुलाचाराचे पालन केलेले नाही. मी नेहमीच मलीन आचरणात व्यग्र राहिलो आहे. दुसर्याचे धन, वैभव, स्त्री यांच्याकडे मी नेहमी मलीन दृष्टीनेच पहिले आहे, त्यांचे हरण करण्याचा विचार केला आहे. मी नेहमीच वाईट चिंतन करणार्या वाक्यांचीच, रचना करत आलेलो आहे. कधी चांगले बोललो नाही, कधी चांगले लिहिलेही नाही. ज्या सर्व दुर्गुणांचा उल्लेख केलेला आहे, त्याऐवजी एक जरी सद्गुण असेल, तरीसुद्धा त्यातून आत्मा उन्नत होऊ शकतो. परंतु, सर्व दुर्गुणांनी लिप्त व्यक्तीच्या आत्म्याच्या उन्नतीचा मार्गच खुंटतो. सर्व दुर्गुणांनी लिप्त असलेल्या मला एकमेव आधार तुझा आहे.
प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं
निशीथेश्वरं वा कदाचित्।
न जानामि चान्यत् सदाहंशरण्ये
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि॥६॥
हे जगद्जननी आई भवानी, तू शरणागतांचे रक्षण करणारी आहेस. हा तुझा स्वभावधर्म मला ज्ञात असल्याने, मी अन्य कोणत्याही देवाला कधी शरण गेलो नाही किंवा त्यांच्याकडे पाहिलेसुद्धा नाही. प्रजेश म्हणजे ब्रह्मदेव, रमेश म्हणजे विष्णू, महेश म्हणजे शिव, सुरेश म्हणजे देवांचा राजा इंद्र, दिनेश म्हणजे सूर्य, निशीथेश्वर म्हणजे रात्रीचा स्वामी अर्थात चंद्र आणि अन्य कोणतेही दैवत मी जाणत नाही.
विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले
चानले पर्वते शत्रुमध्ये।
अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि॥७॥
हे शरणागतवत्सले आई भवानी, विद्वानांच्या सभेत मी वाद घालत असताना, माझी मनस्थिती अत्यंत खिन्न, विषण्ण असताना, माझ्या हातून काही प्रमाद म्हणजे प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करणारी चूक घडत असताना, मी प्रवासात असताना, मी जलविहार करत असताना किंवा अग्नीच्या संकटात सापडलो असताना, मी पर्वतावर किंवा निबिड अरण्यामध्ये वाट चुकलेलो असताना किंवा मी शत्रूंनी वेढला गेलो असताना, या प्रत्येक क्षणी मला फक्त तुझीच आठवण होते. त्यावेळी मला हा विश्वास असतो की, या सगळ्या संकटांमधून तूच मला सुखरूप तारणार आहेस. ज्याप्रमाणे मला या प्रापंचिक संकटांमधून तू वाचवतेस, त्याचप्रमाणे तू माझ्या पारमार्थिक जीवनातसुद्धा माझे संरक्षण कर.
अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो
महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः।
विपत्तौ प्रविष्टः प्रनष्टः सदाहं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि॥८॥
हे शरणागतवत्सले आई भवानी, मी अनाथ आहे. मला कोणीही स्वामी किंवा त्राता नाही. मी दरिद्री आहे. मी वार्धक्याने आणि विविध रोगांनी गांजलो आहे. मी अत्यंत दुर्बल आणि दीन झालेलो आहे. माझ्या वाणीला जडत्व आलेले आहे, मी बोलूसुद्धा शकत नाही. मी सदासर्वकाळ संकटात सापडलेलो आहे. माझा नाश ओढवला आहे. अशा स्थितीत आई भवानी तूच माझा एकमेव आधार आहे.
म्हणून आई भवानी मी तुला आळवतो आहे की, माझ्या आत्म्याला सद्गति केवळ तूच प्रदान करू शकतेस, मी तुझ्या चरणी शरण आलो आहे, मला सद्गति दे.!
सुजीत भोगले
९३७००४३९०१