गीता केवळ श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले शाब्दिक तत्त्वज्ञान नसून, जीवनातील अनंत गूढ तत्त्वांचे ज्ञान प्राप्त करून, प्रत्यक्ष जीवन जगण्याचे एक महान दिव्य शास्त्र आहे. यादृष्टीने हे महनीय शास्त्र जगासमोर आल्यास, सर्व जगच या महान ग्रंथाकडे मानवी जीवनाकरिता एक आवश्यक संहिता म्हणून बघेल. यामुळे भगवद्गीता केवळ हिंदूंचा धार्मिक ग्रंथ न राहता, अखिल विश्वाचा जीवन ग्रंथ बनेल.
आपण प्रदक्षिणा का करतो?
प्रदक्षिणा म्हणजे उजव्या हाताच्या बाजूने, एखाद्या मध्यवर्ती केंद्राभोवती फिरणे. मंदिरात गेल्यावर वैदिक परंपराभिमानी लोक प्रथम घंटा वाजवितात आणि नंतर इष्ट देवतेभोवती प्रदक्षिणा करतात. ‘प्र’ म्हणजे पुढे व‘दक्षिणा’ म्हणजे, उजव्या हाताच्या दिशेने. अन्य कोणत्या व्यवहारात अशी प्रदक्षिणा करीत नसतात. नाही म्हणायला, प्रेत संस्काराच्या वेळेससुद्धा प्रदक्षिणा करतात, पण त्याचे कारण मृत व्यक्ती देवतास्वरुप झाली, असे मानण्यात आहे. अन्य धर्मपंथीयांत प्रदक्षिणेचा असला शास्त्रीय प्रकार नाही. वैदिक परंपरेच्या लोकांचे पाहून, ख्रिश्चनांचे चर्चमध्येही घंटा लावण्याला सुरुवात झाली आहे. परंतु, घंटा का लावावी? याचे शास्त्रीय कारण त्यांचेजवळ नाही. मंदिरातील प्रदक्षिणेबाबत महत्त्वाचे दिव्य शास्त्रीय कारण आहे.
लेखकाचा असा अनुभव आहे की, शरीराबाहेर उद्गमन करताना म्हणजे जीविताचे विघटन करताना, साधकाला जे दिव्य चक्र दिसते, त्याची गती उलट म्हणजे अपसव्य असते आणि शरीरात पुनर्प्रवेश करताना म्हणजे घटनाप्राप्तीकरिता अर्थात जिवंत होताना, त्याच दिव्य चक्राची गती सुलट म्हणजे प्रदक्षिण असते. यावरून असा निष्कर्ष निघतो की, घटनाप्राप्तीकरिता विश्वातील दिव्य गती ‘सव्य’ म्हणजे प्रदक्षिण असते, तर विघटनेकरिता तीच गती अपसव्य असते. आम्ही मंदिरात जाऊन देवतेला इष्ट घटना देण्याची प्रार्थना करतो. देवळात गेल्यावर कोणीच अनिष्ट घटना मागत नसतो. भगवंताकडून आम्ही मागतो पुत्रप्राप्ती, धनप्राप्ती, यशप्राप्ती इत्यादी प्राप्तीकरिता, दिव्य जगतातील गती प्रदक्षिण असते,. म्हणून परमेश्वराला इष्ट घटना मागताना आम्ही वरील अतींद्रिय शास्त्राला धरून, वैदिक परंपरेत भक्त मंदिरात प्रदक्षिणा करतो व भगवंताला इष्ट तेच मागतो. अन्य धर्मपंथांतील धार्मिक आचरणात वरीलप्रमाणे, वैदिक परंपरेसारखी शास्त्रीय दृष्टिकोन नाही. वैदिक परंपरेतील प्रत्येक आचरणात व संस्कारात, वरीलप्रमाणे शास्त्रीय बैठक असते. याचे कारण वैदिक परंपरा कोणा एका व्यक्तीच्या आज्ञेतून वा संदेशातून उत्पन्न झाली नसून, अतींद्रिय शास्त्रातील जटिल अनुभव घेणार्या अनेक महान ऋषींच्या अनुभवातून व दीर्घ सूक्ष्म विचारातून साकारली आहे. म्हणूनच जगातील विद्वान व विचारी जन, वैदिक परंपरेकडे दिवसेंदिवस आकर्षित होत आहेत.
वरील दिव्य अनुभवावरून आपण विश्वगतीच्या एका महान सिद्धांताप्रत येतो की, घटनाप्राप्तीकरिता विश्वगती सव्य असते, तर विघटनाकरिता तीच गती अपसव्य होत असते. मृत्यू म्हणजे विनाश. म्हणून मृत्यूसमयी जाणत्याला विश्वचक्रगती अपसव्य, तर जन्मघटनेसमयी तीच गती, सव्य दिसत असली पाहिजे. आजचे जग विज्ञानानुसार चालले आहे. मानवी जीवनातील बहुतेक आचार व व्यवहार पाश्चात्यप्रणित वैज्ञानिक उपकरणे व सिद्धांतानुसार बसविली जात आहेत, मग ते देश कोणत्याही जातीचे असोत. एका अर्थाने वैज्ञानिक जगतात सर्व जगाचीच शब्द व संस्कारासह, पाश्चात्यांची उसनवारी चालली आहे. सर्व जगाचा पोशाख व राहणी पाश्चात्य पद्धतीची होत आहे. तसे करण्यात कोणत्याच धर्मीयांना संकोच वाटत नाही. असे असता, अतींद्रिय शास्त्रावर आधारलेली वैदिक परंपरा, आचारविचार सर्व जगातील मानव समाजाने स्वीकारण्यात कोणताच गौणपणा नाही. आपापल्या प्रार्थना मंदिरांत गेल्यावर घंटा वाजवून, परमेश्वराच्या कल्पित केंद्रस्थानाभोवती वैदिकांप्रमाणे प्रदक्षिणा करण्यास इतरांना प्रत्यवाय नसावा. त्यात सत्य अतींद्रिय शास्त्र आहे, केवळ कल्पना विलास वा देशपरत्वे स्वीकारलेला आचार नाही. मानवी आचारात शास्त्रीयता असावी.
अपसव्यगती एवं श्राद्धकर्म
वैदिक परंपरेतील प्रत्येक व्यवहारात ऋषिमुनींनी, अतींद्रिय शास्त्रांचा आधार घेतला आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व षोडश संस्कारांतून व्यक्तीला अधिक संस्कारित करून, तिचे अतींद्रिय जीवन उत्क्रांत व उच्च करणे, हा विचार वैदिक परंपरेत सतत ठेवला गेला. व्यक्तीच्या मरणात जडव्यवहाराचे विघटन आहे. विघटनाची विश्वगती अपसव्य आहे. म्हणून मृत्यूपश्चात केल्या जाणार्या श्राद्ध संस्कारात, अपसव्य गतीने जानवे वा तर्पण करताना अंगुलीगती करावी लागते. वैदिक परंपरेतील श्राद्धकर्माला, त्यातील अतींद्रिय शास्त्र त्यांना अवगत नसल्यामुळे अन्य पंथीय हसतात, हे स्पष्ट आहे. त्यांचे म्हणणे असे की, मृत्यूनंतर कोणी कोणाला तर्पण द्यायचे आणि त्या मृत व्यक्तीला ते कसे पोहोचणार? काही धर्मपंथांत मृत्यूनंतर जीवनच मानत नाहीत. मग मृत्यूनंतरच्या श्राद्धकर्माद्वारे मृतात्म्याला सद्गती मिळण्यासाठीची कर्मे कशाला करायची? असले प्रश्न करून टिंगल करताना दिसतात. परंतु, महत्त्वाचा प्रश्न असा की, ते मानीत नाहीत म्हणून अतींद्रिय शास्त्रअनुभवास येत नाहीत काय? कोपरनिकसने पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असा शोध लावला. त्याचे हसे करून, कर्मठ धर्माधिकार्यांनी कोपरनिकसचा सिद्धांत बायबल विरोधी व धर्मबाह्य मानला आणि फर्मान काढले की, पृथ्वीने इतःपर सूर्याभोवती फिरू नये. बिचारी पृथ्वी! तिला पूर्वीप्रमाणे सूर्याभोवती फिरणे क्रमप्राप्तच होते. आजही पृथ्वी सूर्याभोवती फिरतच आहे.
अतींद्रिय जगतातील सिद्धांत अपक्व धर्मपंथांनी मानले नाहीत, म्हणून तसे ते नाहीतच, असे मानणे चुकीचे होईल. आज सतत अन्वेषणांद्वारे हे सिद्ध झाले आहे की, पुनर्जन्म व मृत्यूनंतर जीवात्म्याला दिव्य गती आहे. असले दिव्य जगतातील संशोधन व सिद्धांत मांडणारे, अनेक ख्रिश्चन व मुसलमानदेखील आहेत. मृत्यूनंतरच्या जीवनगतीला व पुनर्जन्माला हसणारी व्यक्ती आता अज्ञानी मानली जाईल, इतके विपुल संशोधन या विषयावर झाले आहे. अतींद्रिय शास्त्रानुसार इहजन्मातील कर्मभारामुळे जीवात्मा गतिमान होऊन, त्या गतीला योग्य अशा लोकात म्हणजे अवस्थेत जातो. म्हणून तशा गतिमान परंतु मृत शरीरातून मुक्त जीवाला, वैदिक परिभाषेत ‘प्रेत’ असे म्हटले आहे. ‘प्र’ म्हणजे समोर, तर ‘एत’ म्हणजे कंपन करीत जाणे. जीवात्म्याच्या त्या गतीला, त्याचे संबंधित गोत्रज आपल्या श्रद्धेने युक्त संस्काराद्वारे उत्तम गती देऊ शकतात,असा या शास्त्रातील सिद्धांत आहे. श्रद्धेने केलेल्या संस्कारांना वा कर्माला श्राद्ध म्हणतात. मृत्यूनंतर जीवात्म्यावर घडणारा हा शेवटचा संस्कार, जीवात्म्याचे गोत्रज करीत असतात. असले मृत्यूनंतरचे सूक्ष्म संस्कार त्या प्रेतात्म्याला, उत्तम गती देऊ शकतात. (क्रमशः)
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७