छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या हिंदू समाजाचे दैवत! मात्र, नेहरू-गांधी परिवार याला अपवाद असावे. छत्रपतींचे आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे या परिवाराला इतके वावडे की राहुल गांधींनी छत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी चक्क महाराजांना श्रद्धांजली अर्पण करावी? अज्ञानी आहे, काही कळत नाही, असे म्हणावे, तर याच राहुल गांधींना परदेशात जाऊन देशाची बदनामी करण्याची तेवढी चांगलीच अक्कल आहे की! म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीच्या दिवशी श्रद्धाजंली वाहून, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि करोडो शिवप्रेमींचा अपमानच केला आहे.
खरेच का राहुल गांधींना माहिती नसेल की, शिवजयंती म्हणजे छत्रपतींचा जन्मदिन सोहळा आहे? खरेच का राहुल गांधींना श्रद्धांजली कधी वाहतात, ते कळत नसेल? कुणी म्हणेल की, राहुल गांधींनी कधी कुठे काय करावे, यासाठी लोक नेमलेले आहेत. ते सांगतात तेच राहुल करतात आणि हेच लोक त्यांचे सोशल मीडियाही ‘हँडल’ करतात. त्यामुळे छत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी राहुल यांनी छत्रपतींना श्रद्धांजली वाहिली. यात राहुल यांची चूक नाही, तर त्यांच्या ‘पीआर टीम’ची चूक. पण, प्रश्न आहे की, ‘पीआर टीम’च्या इशार्यावर राहुल गांधी नाचतात का? त्यांना त्यांचे असे काही विचारच नाहीत का? छत्रपतींसारखा राजा पूर्वी कधी झाला नव्हता आणि होणारही नाही. अशा उत्तुंग, कर्तृत्ववान, आदर्श राजाबद्दल त्याच्या जीवनकर्तृत्वाबद्दल माहिती घ्यावी, असे चुकूनही राहुल यांना वाटले नाही का? जातपात, आरक्षण, संविधान बचाव वगैरे म्हणत समाजात दुही माजवताना याच राहुल गांधींची बुद्धी तेजतर्रार होते. कसेही करून सत्ता मिळावी, यासाठी शकुनी काय चाल चालेल, अशी खेळी करत ते ‘भारत जोडो’बिडो यात्रा काढतात. पण, जय धर्माचाच होतो. त्यामुळे शकुनी कधीच विजयी होत नाही. असो. याच यात्रेमध्ये हिंदूंच्या देवांचा अपमान करण्यासाठी ‘येशू हाच देव आहे,’ असा प्रश्न विचारण्याची बुद्धीही त्यांना आहे. मात्र, जयंतीच्या दिवशी काय करावे, याबद्दल त्यांना बुद्धी नाही, तारतम्य नाही. हे कसे शक्य आहे? राहुल गांधी यांचे पणजोबा नेहरू यांनीसुद्धा छत्रपतींबाबत आक्षेपार्ह शब्द लिहिले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नेहरू आणि त्यांच्या काँग्रेसची जी मराठी आणि महाराष्ट्रद्वेष्टी भूमिका राहिलेली आहे, ती सगळ्या जगाला माहीत आहे. राहुल गांधी तोच वारसा पुढे चालवत आहेत. शिवरायांचा अपमान करणार्या राहुल गांधींचा निषेध!
‘एलिझाबेथ’ पहिली नाही!
एलिझाबेथ कोलबर्न ही महिला ब्रिटिश नागरिक असूनही, एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करायची. त्यावेळी ‘पाकिस्तानी प्लॅनिंग कमिशन’चे सदस्य तौकिर शेख तिचा वरिष्ठ म्हणून काम करायचा. पुढे २०१३ साली या महिलेने आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते तरुण गोगाई यांचा पुत्र गौरव गोगाई यांच्याशी विवाह केला. त्यानंतरही एलिझाबेथ आणि तौकिर शेख यांचा संपर्क कायम राहिला. गौरव गोगाई संसदेच्या परराष्ट्र प्रकरणाशी संबंधित समितीचे सदस्यही नव्हते. पण, तरीही एलिझाबेथसोबत गौरव यांनी पाकिस्तानी दूतावासातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांची भेट घेतली होती.
त्यानंतर गौरव यांनी संसदेमध्ये भारताच्या सुरक्षेविषयी प्रश्न विचारले. भारताच्या किनारपट्टीच्या सागरी सुरक्षेची स्थिती काय आहे, किनारपट्टीवर किती रडार बसवले आहेत आणि किती बसवायचे आहेत वगैरे वगैरे. या प्रश्नांच्या उत्तरांनी पाकिस्तानला योग्य ती मदत होणार होती. हे प्रश्न का विचारले गेले? पाकिस्तानच्या उच्चायुक्तांच्या भेटीबद्दलची माहितीही गौरव यांनी शासनाला दिली नाही. तसेच विवाहानंतर १२ वर्षांनंतरही त्यांच्या पत्नीनेही ब्रिटिश नागरिकत्व सोडले नाही. एलिझाबेथ यांचे सासरे आसामचे मुख्यमंत्री होते. तौकिर शेख याचा एलिझाबेथ यांच्या सासरच्या घरीही सहज प्रवेश होता का? मुख्यमंत्र्यांच्या घरी पाकिस्तानच्या वरिष्ठ पदावरच्या व्यक्तीचा वावर असेल, तर भारताच्या सुरक्षिततेचे काय? या संदर्भात भारतीय जनता पक्षाने प्रश्न विचारले. तर या प्रकरणात काँग्रेस गौरव यांचे समर्थन करत आहे. मात्र, आसाम सरकारने अली तौकिर शेख आणि अन्य अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला. भारतात अस्थिरता यावी, यासाठी तौकिरने कट रचला का? त्यासाठी संपर्कातील कुणी देशद्रोही व्यक्तीने त्याला सहकार्य केले का, यासंदर्भात सत्य शोधण्यासाठी आसाम सरकारने ‘एसआयटी’ही नेमली आहे. यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, “भारतीय राजकारणातील महत्त्वाच्या व्यक्तींशी विवाह केलेली एलिझाबेथ ही काही पहिली विदेशी महिला नाही, याआधीही भारताची सून बनून एक विदेशी महिला आलीच होती. त्यावेळच्या घटनांचाही मागोवा घ्या.” अर्थात, जनभावना आहेत त्या. तुर्तास आसाम सरकारच्या कारवाईचे अभिनंदन!
९५९४९६९६३८