सातार्यातील चाळकेवाडी पठारावरुन, नव्याने शोधलेल्या पालीच्या नव्या प्रजातीचे शोधकर्ते डॉ. अमित सय्यद यांच्याविषयी...
प्रत्येकाच्या आयुष्याला कर्माची एक किनार असते. या माणसाच्या आयुष्याला, व्यवसाय क्षेत्रातील कर्माची किनार होती. मात्र, त्याची कर्मभूमी ही वन्यजीव संशोधन आणि संवर्धनाची भूमी झाली. गेल्या २५ वर्षांपासून हा माणूस, वन्यजीव संशोधन आणि संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहे. ‘उभयसृपशास्त्र’ हा आपल्याकडे वाळीत टाकलेला विषय. वाघ-बिबट्यांवरील संशोधनामध्ये प्रसिद्धी व पैसा मिळतो. त्यामुळे त्यासाठी हजारो संशोधकांची रीघ लागते. मात्र, समाजातील काही गैरसमजुतींमुळे साप, पाली आणि बेडूक अजूनही दुलर्क्षित राहिले आहेत. यांमधीलच १८ नव्या प्रजातींचा त्यांनी शोध लावला आहे. वन्यजीव सेवेचा विडा उचललेला हा माणूस म्हणजे डॉ. अमित सय्यद.
अमित यांचा जन्म दि. ५ ऑक्टोबर १९७७ रोजी सातार्यामध्ये झाला. त्यांचे आजोबा हे प्राणीप्रेमी होते. त्यामुळे अनुवंशिकतेने वन्यजीवांचे प्रेम, अमित यांच्याकडे बहुधा आले असावे. अमित यांच्या घरासमोरच सातार्यातील कारागृहाची भिंत होती. एके दिवशी या भिंतीमधून बाहेर निघालेल्या सापाला, काही लोक मारण्याचा प्रयत्न करत होते. अमित यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या लोकांनी “तुला या सापाविषयी माहिती आहे का?” असे प्रश्न केल्यावर, अमित निरुत्तर झाले. आपण ज्याला वाचविण्यासाठी धडपड करतोय, त्याविषयी माहिती नसल्याचे जाणवल्यावर ते ओशाळून गेले. मात्र, त्याच क्षणापासून सापांविषयीचे वाचन वाढवत, साप ओळखायलाही सुरुवात केली. अशातच एकदा शेजारच्या घरात साप अडकल्याचे पाहून अमित यांच्या मित्रांनी त्यांना सर्पमित्र म्हणून उभे केले. यापूर्वी कधीही साप न पकडलेल्या आणि साप पकडण्याचे तंत्रदेखील अवगत नसलेल्या अमित यांच्या पायाखालची जमीनच सरकरली. त्यात घरात अडकलेला साप म्हणजे, प्रचंड विषारी घोणस. मात्र, अत्यंत लकबीने त्यांनी तो साप पकडला आणि त्याला सुखरुप नैसर्गिक अधिवासात सोडले. या घटनेपासून अमित यांची ओळख सर्पमित्र म्हणून झाली. सर्पबचाव करण्यासाठी त्यांना लोक संपर्क करू लागले.
सर्पबचावाचे काम करताना, त्यांनादेखील अनुभव मिळू लागला. सापांना वाचवण्याचे शास्त्रीय तंत्र, त्यांनी स्वतः अवगत करून घेतले. यादरम्यान आपले शिक्षणही पूर्ण केले. ‘इंडियन मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर’मधून पदवी घेतल्यानंतर, वडिलांना कौटुंबिक व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. मात्र, सरीसृपांची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. २०००-०१च्या दरम्यान त्यांनी, वनविभागासोबत सर्प आणि वन्यजीवबचावाच्या कामाला सुरुवात केली. सर्पमित्रांना सर्पबचावाचे शास्त्रीय तंत्र शिकवण्यासाठी, त्यांनी सातार्यात कॅम्प घेण्यास सुरुवात केली. यासाठी महाराष्ट्रातील अनेक सर्पमित्रांची पाऊले सातार्यात वळू लागली. वनविभागाच्या मदतीने ‘एक गाव, एक सर्पमित्र’ ही मोहीम सुरू केली. याअंतर्गत गावागावातील तरुणांना सर्पबचावाचे प्रशिक्षण दिले. सर्प आणि वन्यजीव बचावाच्या कामाच्या वाढत्या व्यापाला एका व्यासपीठाची गरज होती. म्हणून अमित यांनी २००५ मध्ये, ’वाईल्डलाईफ प्रोटेक्शन अॅण्ड रिसर्च सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. मात्र, सर्पबचावाच्या कामाचा माणसाला नेमका काय फायदा आहे? असा प्रश्न पडल्यावर त्यांनी, ‘सर्पदंश’ या वेगळ्या शाखेवर काम करण्याचा निर्णय घेतला.
सर्पदंशावर काम करण्यासाठी, त्यांनी सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालये गाठली. याठिकाणी सर्पदंश झालेल्या रुग्णांच्या निरीक्षणास सुरुवात केली. सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर प्रथमोपचार कसे करावे, हे शिकून घेतले. त्या माध्यमातून जवळपास ४ हजार, ५०० सर्पदंश झालेल्या लोकांचे, अमित यांनी प्रथमोपचार केले आहेत. सर्पबचाव आणि सर्पदंश या माध्यमातून आलेल्या अनुभवातून, अवगत झालेली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अमित यांनी दोन पुस्तकेदेखील लिहिली आहेत. २००८ साली प्रकाशित झालेल्या ’सर्प एक पृथ्वीवरील आश्चर्य’ या पुस्तकामध्ये सापांच्या ५२ प्रजातींचे वर्गीकरण, त्यांची ओळख, त्यांचे प्रकारांविषयी इत्थंभूत माहिती दिली आहे. तर ’घातकदंश आणि प्रथमोपचार’ या पुस्तकाच्या माध्यमातून साप, विंचूपासून मधमाशीपर्यंतच्या दंशावर कशा पद्धतीने प्रथमोपचार करावे, याविषयी माहिती देण्यात आली आहे.
सापाविषयी काम करत असताना अमित यांनी, उभयचरांवरदेखील लक्ष केंद्रित केले. खासकरून, उभयचरांच्या टॅक्सोनोमीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. यासाठी भारतातील काही जंगले पालथी घातली. ’झेडएसआय’ संस्थेच्या विविध संग्रहालयांमध्ये जाऊन, त्याठिकाणी संग्रहित केलेल्या नमुन्यांचे निरीक्षण केले. घरचा व्यवसाय सांभाळून, रात्री पश्चिम घाटातील जंगलात जाऊन अत्यंत अपुर्या साधनांच्या मदतीने त्यांनी, अभ्यासाला सुरुवात केली. या माध्यमातून २०१३ साली त्यांनी ’घाटे शब्रफ्रॉग’ या बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला. त्यानंतर २०१६ साली ’यलो-बेलिड डॉर्फ गेगो’ या पालीच्या प्रजातीचा आंबोलीतून शोध लावला. जनुकीय अभ्यासाच्या माध्यमातून, या कुळातील पालीचा शोध लावण्याचा हा भारतातील पहिला अभ्यास ठरला. अमित यांचा नव्या प्रजातींच्या संशोधनाचा हा प्रवास आजतागायत सुरू आहे. आजवर त्यांनी एक बेडूक, १६ पाली आणि एक विंचू मिळून, १८ प्रजातींचा शोध नव्याने लावला आहे. याशिवाय, संस्थेच्या माध्यमातून ते कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, वन्यजीव तस्करी, वन्यजीव जनजागृती या क्षेत्रांतही भरीव काम करत आहेत. वन्यजीव संवर्धन आणि संशोधन क्षेत्रात आपले आयुष्य वेचणार्या अमित यांना, पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.