मुंबई (अक्षय मांडवकर) - राज्यातील सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी वन विभागाच्या कांदळवन कक्षाअंतर्गत 'मरिन सेंटर ऑफ एक्सलन्स'ची निर्मिती करण्यात येणार आहे (maharashtra marine centre of excellence). या केंद्राच्या निर्मितीसाठीची पहिली बैठक मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडली (maharashtra marine centre of excellence). ज्यामध्ये देशाभरात सागरी जैववि
विधतेवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी या केंद्राच्या निर्मितीबाबतच्या सूचना राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवासा राव यांच्या समोर मांडल्या. (maharashtra marine centre of excellence)
'एक्सलन्स सेंटर' म्हणजे उत्कृष्टतेचे केंद्र. या केंद्रामध्ये विशिष्ट क्षेत्रातील नेतृत्व, संशोधन, प्रशिक्षण आणि सर्वोत्तम पद्धतींना पाठिंबा दिला जातो. महाराष्ट्रातील सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या संशोधन कार्याची निर्मिती, धोरणांची आखणी अशा शास्त्रीय बाबींना पाठिंबा देणाऱ्या 'एक्सलन्स सेंटर'ची निर्मिती 'कांदळवन कक्षा'अंतर्गत करण्यात येत आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी काही शास्त्रीय सूचनांची गरज होती. त्यासाठी मुंबईतील ईरा हाॅटेलमध्ये मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला 'कांदळवन प्रतिष्ठान'कडून देशातील नामांकित सागरी संशोधकांना आमंत्रित करण्यात आले होते. राज्याचे नवनिर्वाचित प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवासा राव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) एस.व्ही.रामाराव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) डाॅ. व्ही. क्लेमेंट बेन, उपवनसंरक्षक, कांदळवन कक्ष (अतिरिक्त कार्यभार) अक्षय गजभिये,
विभागीय अधिकारी (कांदळवन कक्ष उत्तर कोकण) दिपक खाडे आणि विभागीय अधिकारी (कांदळवन कक्ष दक्षिण कोकण) कांचन पवार उपस्थित होत्या. 'मरिन सेंटर आॅफ एक्सलन्स'चे कामकाज हे 'कांदळवन कक्षा'अंतर्गतच करण्यात येणार असून ऐरोली येथील 'सागरी आणि किनारी जैवविविधता केंद्रा'तून यासंबंधीचे कामकाज होईल अशी माहिती एस.व्ही.रामाराव यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
या बैठकीच्या सुरुवातीस एस.व्ही.रामाराव यांनी 'कांदळवन कक्ष' आणि 'कांदळवन प्रतिष्ठाना'मार्फत सुरू असणाऱ्या कामाची मांडणी केली. त्यानंतर ज्येष्ठ सागरी संशोधक आणि 'सृष्टी काॅन्झर्वेशन फाऊंडेशन'चे संचालक डाॅ. दिपक आपटे यांनी का खोल समुद्रात जैवविविधतेच्या नोंदी, सागरी जीवांच्या वर्गीकरणासाठी आवश्यक असणारे तज्त्र, स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास, दलदलीच्या जमिनीचे संवर्धन, खासगी क्षेत्रावर वाढणारे कांदळवन यासंबंधीच्या सूचना मांडल्या. तर 'डब्लूआयआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. सुरेश कुमार यांनी सागरी कासव संवर्धनासंबंधीच्या सूचना मांडत असताना किनाऱ्यावर होणाऱ्या कासवांच्या घरट्यांपैकी २० टक्के घरटी ही इन-सेतू पद्धतीने जागच्या जागी संवर्धित करणे गरजेचे असल्याचे सांगितले. 'डब्लूसीएस-इंडिया'च्या सागरी प्रकल्पाचे प्रमुख डॉ. अॅरन लोबो यांनी समाजभिमुख आधारित संवर्धनाच्या कामाबाबतच्या सूचना दिल्या. याशिवाय 'एनआयओ'चे डाॅ. कल्याण डे, 'आयआयएसईआर'चे पुण्यश्लोके बहादूरी, 'सीएसआयआर'चे डाॅ. मणिकंदन, 'आयआयएससी'चे टाइटस इमैनुएल, 'एनसीएफ'चे रोहन आर्थर आणि 'बीएनएचएस'च्या रेश्मा पितळे यांनी देखील आपल्या सूचना मांडल्या.
या बैठकीमधून सागरी कचरा, पाण्याची गुणवत्ता, जैवविविधतेचे नकाशीकरण, सुरुच्या लागवडीचे असणारे धोके, पर्यावरणपूरक इन्फ्रास्टक्चर अशा काही विषयांवर काम करण्याची गरज जाणवली असून याव्यतिरिक्त संशोधकांनी उपस्थित केलेल्या सूचनांची अंमलबजावणी आम्ही या सेंटरच्या माध्यमातून करणार आहोत. - एम. श्रीनिवासा राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)