महाकुंभास मृत्युकुंभ म्हणणाऱ्या ममतादीदी या गोष्टींवर बोलणार का?
19-Feb-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mamata Banerjee Marutyukumbh Statement) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभास 'मृत्युकुंभ' म्हणत आक्षेपार्ह विधान केलंय. सोबतच त्यांनी महाकुंभात व्हीआयपींना विशेष सुविधा आणि गरिबांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप केलाय. हा सर्वप्रकार नुकताच पश्चिम बंगालच्या विधानसभेत घडला. यापूर्वी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरी आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी जाहीर करण्याबाबत अखिलेश यादव यांनी लोकसभेमध्ये अकलेचे तारे तोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आपल्याच पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान जो हिंसाचार झाला होता, त्यावर ममतादीदी कधी बोलणार?
वास्तविक महाकुंभास 'मृत्युकुंभ' म्हणणाऱ्या ममता दीदींना पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांमधील राजकीय हत्यांची आकडेवारी आधी तपासून घ्यावी. कारण निवडणुकीच्या काळात प्रत्येक राज्यात हिंसाचार होणे ही येथील एक संस्कृती बनली आहे. जुलै २०२३ दरम्यान बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या तारखा जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा १५ जणांची हत्या झाल्याची नोंद आहे.
२००३ पासून पाहिलं तर त्याकाळात झालेल्या पंचायत निवडणूकीदरम्यान ७६ जणांचा मृत्यू झाला होता. यातील ४० हून अधिक लोकांचा मतदानाच्या दिवशीच मृत्यू झाला. २०१३ आणि २०१८ च्या निवडणुकांमध्येही केंद्रीय दले येथे तैनात करण्यात आली असतानाही हिंसाचार काही थांबला नाही. २०१३ मध्ये ३९ आणि २०१८ मध्ये ३० जणांचा मृत्यू झाला. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा डेटानुसार देशात महिलांसाठी असुरक्षित असणारे पश्चिम बंगाल हे देशातील चौथे राज्य आहे. प. बंगालमध्ये २०२१ मध्ये महिलांविरोधात एकूण ३५८८४ इतके गुन्हे घडले आहेत. या राज्यात २०१९ मध्ये २९८५९ तर २०२० मध्ये ३६४३९ महिलांविरोधात गुन्हे घडले आहेत.