'छावा' सिनेमा टॅक्स फ्री होणार? काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
19-Feb-2025
Total Views |
पुणे : संपूर्ण देशभरात सध्या 'छावा' चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारिता हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी सगळीकडून करण्यात येत होती. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, वीरता आणि विद्वत्ता प्रचंड होती पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. अशा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित अतिशय चांगला असा हा सिनेमा तयार झाला आहे. इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता हा सिनेमा तयार करण्यात आला केला. त्यासाठी मी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते विकी कौशल यांचे अभिनंदन करतो. हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. इतर राज्य चित्रपट टॅक्स फ्री करतात त्यावेळी करमणूक कर माफ करत असतात. पण महाराष्ट्राने २०१७ सालीच करमणूक कर नेहमीकरिता रद्द केला आहे. त्यामुळे चित्रपट करमुक्त करण्यासाठी आपल्याकडे तो करच नाही. पंरतू, या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता किंवा छत्रपती शंभूराजेंचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक काय चांगले करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू. छत्रपती संभाजी महाराजांना अपमानित करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवू आणि असे वागणाऱ्यांना सरकार आणि शिवप्रेमी माफ करणार नाहीत," असे ते म्हणाले.
महाराजांचे मावळे म्हणून आमचा राज्य कारभार सुरु!
छत्रपती शिवराय होते म्हणून आम्ही आहोत. छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान आणि आत्मतेज दिले. त्यांनी समतेचा संदेश दिला. अठरापगड जातींना एकत्र करून स्थापन केलेल्या स्वराज्यातून त्यांनी एकतेचा संदेश दिला. राज्य कारभार कसा चालवावा, वनसंवर्धन, जलसंवर्धन कसे करावे, करप्रणाली कशी असावी, समुद्री सुरक्षा कशी ठेवावी, हे सगळे आम्हाला महाराजांनी शिकवले. या सगळ्या आज्ञावलींचे पालन करत असताना छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला आणि फारसी भाषेतील शब्द वगळून सगळ्या आज्ञावली मराठी भाषेत करण्याचे काम दिले. हे आत्मतेज आणि आत्मभान घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आम्ही राज्य कारभार करत आहोत," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.