अधारणीय शारीरिक वेग

भाग २

    18-Feb-2025
Total Views |

diet 
 
आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर आपले आरोग्य अवलंबून असते, हे आपण जाणतोच. पण, तरीही कळत-नकळतपणे खाण्या-पिण्याच्या सवयींमधील टाळाटाळ, बेशिस्त यामुळे शरीरातील टाकाऊ भाग बाहेर फेकला जात नाही. असा टाकाऊ भाग जितका अधिक काळ शरीरात राहील, तितका तो शरीराला अपायकारक ठरू शकतो. परिणामी, आरोग्याचा समतोल ढासळतो. तेव्हा, याविषयी नेमके आयुर्वेदशास्त्रात काय मार्गदर्शन केले आहे, ते जाणून घेऊया.
 
शरीराचे उत्सर्जन करण्याच्या क्रियेला ‘वेग’ (urges) असे म्हटले आहे. शरीरातील अन्नसेवन, पाणी पिणे, बाह्य वातावरणातील वायूची देवाणघेवाण या सगळ्या गोष्टी नियमित सुरू असतात. यातील पोषक अंशाने शरीराचे पोषण होत असते आणि काही अंश त्याज्य भाग उत्पन्न होतो. तो त्याज्य भाग विशिष्ट शारीरिक अवयवांतून शरीराबाहेर उत्सर्जित केला जातो, टाकला जातो. हे त्याज्य घटक म्हणजे शरीरातील मलभाग (faeces), मूत्र (urine), घाम (sweat), अपचनामुळे होणारी उलटी किंवा डोळ्यांत काही गेल्यास येणारे अश्रू हेदेखील सर्व त्याज्य घटकच आहेत, जे शरीरात राहिल्यास शरीराला अपाय करू शकतात. त्या सर्व गोष्टी त्याज्य आहेत आणि त्यांचा निचरा शरीर वेळोवेळी करत असते. हे उत्सर्जन वेग स्वरुपात म्हणजेच 'urges’ अशा प्रकारचे असतात. याचा अर्थ शरीराबाहेर त्यांची गति याची संवेदना होते आणि मग ती क्रिया केली जाते. यातही मनाचा मोठा सहभाग असतो. ती संवेदना मनाला समजून मन त्या-त्या विशिष्ट अवयवाला कार्य करण्यास प्रवृत्त करते.
 
मन जर एखाद्या कार्यात मग्न असेल, तर वेग रोखून धरला जातो. पण, वेगाचे धारण हे काही अंशीच शक्य आहे. हे वेग, ही संवेदना रोखू नये, थांबवू नये, असे आयुर्वेदशास्त्रात नमूद केले आहे. टाकाऊ भाग जितका अधिक काळ शरीरात राहील, तितका शरीराला अपायकारक ठरू शकतो. म्हणूनच या १३ वेगांना ‘अधारणीय शारीरिक वेग’ असे म्हटले आहे. म्हणजे ज्यांचे धारण करू नये, असे वेग. यातील काही वेगांबद्दल मागील लेखात आपण वाचले. आता इतर वेगांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
 
भूक लागणे ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. ज्या प्रकारे भूक नसताना जेवू नये, असे सांगितले जाते, तसेच भूक लागल्यावर भूक मारणे, न खाणे हेदेखील चुकीचे आहे. बरेचदा वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण टाळले जाते किंवा कुरमुरे-तत्सम पदार्थ खाऊन त्यावर पाणी प्यायले जाते किंवा कोरडा फराळ करून त्यावर भरपूर पाणी पिणे, या पद्घतीने केले जाते. पण, कुरमुरे, कोरडा फराळ पाणी प्यायल्यावर पोटात फुगतो व पोट भरल्याचा आभास निर्माण करतो. पण, कुरमुरे हे पित्तकर आहे. त्यामुळे वारंवार असे केल्यास आम्लपित्त, डोकेदुखी, छातीत जळजळ इ. लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. भूक आणि तहान या दोन वेगवेगळ्या संवेदना आहेत. भूक लागली असताना पाणी पिणे, असे कधीही करू नये. वजन कमी करण्याच्या चुकीच्या समजुतींमुळे बरेच रुग्ण असे करताना आढळून येतात.
 
तहान लागल्यावर पाण्याशिवाय तहान भागत नाही, समाधान होत नाही, त्याच पद्घतीने भूक लागल्यावर पाणी प्यायल्यास पोट तुडुंब भरल्यासारखे केवळ भासते. पण, त्याने पोषण होत नाही किंवा ऊर्जा प्राप्त होत नाही. आयुर्वेदाने एक नियम सांगितला आहे. पोट पूर्ण भरेपर्यंत जेवू नये. पोटाचे काल्पनिक तीन भाग योजावेत. एक भाग घन आहाराने, एक भाग द्रव आहाराने आणि एक भाग पचनासाठी रिकामा ठेवावा. तडस लागेपर्यंत जेवू नये. पोटभर जेवून त्यावर पाणी पिणे, असेही करू नये. तसेच, एकदा जेवल्यावर ते अन्न पचेपर्यंत पुन्हा जेवू नये. ढोबळमानाने एकदा जेवल्यावर किमान तीन तास काही खाऊ नये. पण, सहा तासांच्या वर उपाशीदेखील राहू नये.
 
प्रत्येकाच्या प्रकृतिनुरूप तीन ते सहा तास या कालावधीमध्ये भूक लागते. भूक ही संवेदना हलकी हलकी उत्पन्न झाली की जेवणाची तयारी (जेवायला बसायची तयारी) सुरू करावी. भूक लागल्यावर जर अन्नसेवन केले नाही, तर गळून गेल्यासारखे वाटते, पोटात खड्डा पडल्यासारखा होतो, खूप वेळ जर क्षुधावेग धारण केला, तर अन्नातली रुचि निघून जाते, ग्लानी येते, मरगळल्यासारखे होते. पोट दुखणे, चक्कर येणे, गरगरणे इ. लक्षणे उत्पन्न होतात. वारंवार भूक मारावी लागली किंवा भूक मारली, तर असंतुलित बारिक होताना आढळते. पित्त होण्याची प्रवृत्ती असल्यास पित्त खवळून मळमळ, उलट्या व डोकेदुखी तसेच पोटात-छातीत जळजळ आणि धडधड होऊ लागते. हात-पाय लटपटणे, काही न समजणे, कशातच मन केंद्रित न होणे, अति भूक लागली असल्यास झोपही शांत लागत नाही.
 
भूकेप्रमाणेच तहान लागणे हीदेखील एक शारीरिक संवेदना आहे. मनुष्य शरीर हे मुख्यत्वे जलमय आहे. (सुमारे ७० टक्के शरीर जलीय अंशाने बनलेले आहे.) शरीरातील काही धातू (रस, खत, शुक्र इ.) हे घन नाहीत. त्यातील शरीराला निश्चितपणे आर्द्रता, ओलाव्याची गरज असते. पण, जलीय तत्व म्हणजे केवळ पाणी असे समीकरण केले जाते आणि तिथूच सगळी गफलत सुरू होते. सकाळी उठल्या उठल्या दोन लीटर पाणी प्या, जेवताना भरपूर पाणी प्या, झोपताना पाणी पिऊन झोपा इ. अशास्त्रीय सल्ले दिले जातात आणि बरेच रुग्ण त्या सल्ल्यांची अंमलबजावणीदेखील करत असतात.
 
जसे अन्न शरीरात गेल्यावर त्यावर पचनक्रिया होते आणि मग पोषक अंश आणि त्याज्य भाग तयार होतो, त्याचप्रमाणे पाण्यालाही शरीराला पचवावे लागते. मुखापासून मूत्रेन्द्रियापर्यंत पाणी थेट पोहोचत नाही. अशी कुठलीही वाहिनी शरीरात नाही. मुखावाटे पाणी गेल्यावर ते पोटातच जाते. त्यावर पचनक्रिया होते आणि त्याज्य भाग मूत्र (बहुतांशी) आणि घाम (काही प्रमाणात) या मार्गे निष्कासित केला जातो. ज्यांना किडनीचे त्रास असतात, त्यांनादेखील ठराविक प्रमाणात पाण्याचे सेवन करायचा सल्ला आधुनिक शास्त्रदेखील देते. भूक लागल्यावर पाणी पिणे हेदेखील अशास्त्रीय आहे. आयुर्वेदात पचनासाठी जठाराग्निची गरज असते, असे वर्णन केले आहे व जठाराग्निने पचविलेले अंश प्रत्येक धातू (सप्त धातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र) मध्ये जाऊन त्या त्या धातूंच्या अग्निने त्या पोषक अंशांवर प्रक्रिया केली जाते आणि मग ते धातू साम्य रूपात आल्यावर त्या त्या धातूंचे पोषण व वर्धन होते. म्हणजेच, जठराग्निने पचवून केलेला पोषक अंश हा सातही धात्वाग्निंसाठी कच्चा माल आहे. जर कच्चा मालच त्रुटीयुक्त असेल व धातूंच्या पोषण व वर्धनासाठी निर्मित होणारे पोषक अंशदेखील उत्तम दर्जाचे नसतील. तेव्हा जाठाराग्नि उत्तम राखणे अत्यंत गरजेचे आहे. भूक लागल्यावर पाणी प्यायल्यास अग्निवर (विस्तवावर) पाणी घातल्यासारखे होईल. अग्नि मंद होऊन पचनाच्या तक्रारी सुरू होऊ शकतात.
 
आणि तहान लागणे म्हणजे शरीरातील जलीय तत्त्वाची गरज निर्माण झाली आहे. तेव्हा पाणी प्यावे. कोरड ही तोंडाला व घशाला जाणवते. तेव्हा पाणी पिताना भांड्याला-ग्लासला तोंड लावूनच पाणी प्यावे. याने तृप्ती, समाधान लवकर होते आणि अतिरिक्त तडस लागेपर्यंत पाणी प्यायले जात नाही. तसेच पाणी उभ्याने कधीही पिऊ नये, असेही आयुर्वेदाने सांगितले आहे. तहान ही संवेदना दाबू नये. तसे केल्यास थकून गेल्यासारखे, गळून गेल्यासारखे वाटते. अंगात ताकद नसल्यासारखे होते, संपूर्ण अंगात बधिरता आल्यासारखे वाटते, कोरडेपणा जाणवतो, जीव कासावीस होतो आणि काहीच सूचत नाही, बेचैन व्हायला होते.
असे वेगधारण वारंवार केल्यास मूत्रवह संस्थानाच्या व्याधी होऊ शकतात, त्वचा कोरडी-कडक, रुक्ष होऊ शकते. अन्य वेगांबद्दल पुढील लेखात वाचूया. (क्रमश:)
 
वैद्य कीर्ती देव
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
 
९८२०२८६४२९
 
vaidyakirti.deo@gmail.com