सुप्रिया सुळे संतोष देशमुख कुटुंबाच्या भेटीला! म्हणाल्या, "ही लढाई महिलांनी..."
18-Feb-2025
Total Views |
बीड : बीड अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे. पण पाच-दहा लोकांनी बीडला बदनाम करण्याचे काम केले आहे. आता ही लढाई महिलांनी हातात घ्यायला हवी, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि बजरंग सोनावणेदेखील उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ही गुंडागर्दी थांबायलाच हवी. बीडमधील प्रत्येक महिला मनमोकळेपणाने फिरली पाहिजे. वाल्मिक कराडला पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे. महाराष्ट्र हे सहन करणार नाही."
"बीड अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे. पण पाच-दहा लोकांनी बीडला बदनाम करण्याचे काम केले आहे. आता ही लढाई महिलांनी हातात घ्यायला हवी. हातात लाटणे घेऊन समोर कुणी आला तर त्याला ठोकून काढा. तुम्ही अन्नत्याग करू नका. जे झाले ते दुर्दैवी आहे. पण जोपर्यंत तुमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही," असे त्या म्हणाल्या.
तसेच सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांना अन्नत्याग आंदोलन न करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी परळी येथे महादेव मुंडे कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.