तब्बल पाच दशकांपासून रंगभूमीची सेवा करणार्या अहिल्यानगरमधील ज्येष्ठ रंगकर्मी प्रवीण कुलकर्णी यांच्या रंगभूमीवरील कार्याविषयी...
अहिल्यानगरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘१००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना’त, ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’, उपनगर शाखा यांच्यावतीने समारोपाच्या कार्यक्रमात, विधान परिषद सभापती राम शिंदे आणि संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते, ज्येष्ठ रंगकर्मी प्रवीण कुलकर्णी यांना ‘जीवनगौरव सन्मान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगरमधील नाट्य चळवळीतील एक प्रमुख नाव म्हणजे, ज्येष्ठ रंगकर्मी प्रवीण कुलकर्णी तथा पीडी काका होय. पीडी काका तब्बल पाच दशकांपासून, रंगभूमीची अविरत सेवा करीत आहेत.
१९७३ साली वार्षिक शालेय स्नेहसंमेलनात, पीडी काकांनी पहिले नाटक केले. इथूनच त्यांना नाटकाची आवड लागली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, नाटक आणि क्रिकेट या दोन्ही आवड त्यांनी जपल्या. महाविद्यालय जीवनात एकांकिका बसवत असताना, अभिनेते सदाशिव अमरापूरकर हे पी.डी.काका बसवत असलेल्या नाटकांची तालीम बघण्यासाठी आले. अमरापूरकरांनी या एकांकिकेचे उत्तम दिग्दर्शन केले. यानंतर पुढील दहा वर्षे, पीडी काकांनी सदाशिव अमरापूरकर यांच्यासोबत नाटक शिकत कामही केले. पीडी काकांनी नाट्यक्षेत्राची सुरुवात ही हौस म्हणून केली आणि ते आजतागायत , हौस म्हणूनच या कलेची सेवा करत आहेत.
‘बी.कॉम’ विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण करून, पीडी काकांनी एका पतसंस्थेत काम सुरू केले. काही काळातच त्यांना बँकेत नोकरी लागली. बँकेत अधिकारी पदावर पोहोचण्याची त्यांनी जिद्द बाळगली आणि त्यानुसार, ते कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मात्र, पीडी काकांनी पूर्णवेळ हौशी रंगमभूमीच्या सेवेचा वसा घेतला. इतकेच नाही तर, पीडी काकांनी ‘अभिनय जी.डी.सी. अॅण्ड ए. डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स’ आणि ‘मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट्स’ पदव्युत्तर पदवीचे शिक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले. त्यांनी आतापर्यंत जवळजवळ ४६ नाटके व ६० एकांकिकेचे दिग्दर्शन व त्यात भूमिका आणि दहा नाटकांच्या तांत्रिक बाजू सांभाळलेल्या आहेत. दिग्दर्शन व अभिनयाची अनेक पारितोषिके त्यांना मिळाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक असल्याने आपण या मायभूमीचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील शाळांमधून ‘मी हिंदुस्तानी’ या एकांकिकेचे, ३५ दिवसात ८७ विनामूल्य विक्रमी प्रयोग केले. सांगली येथे आलेल्या पूर आपत्तीवेळी पीडी काका यांनी, सपत्नीक सांगलीमध्ये जात मदतकार्य केले. कोविडमध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता त्यांनी, ‘जनकल्याण समिती’च्या मार्फत अहिल्यानगरच्या कोविड सेंटरचे प्रमुख म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदरी पार पाडली. कोविडच्या दुसर्या काळात रा.स्व.संघाचे सारडा महाविद्यालयाच्या वसतिगृहात केशव माधव कोविड सेंटर सुरू करण्यात आले. तेव्हाही सहप्रमुख म्हणून, पीडी काकांनी पूर्णवेळ कोविड रुग्णांची काळजी घेतली. अहिल्यानगरमध्ये ‘संस्कार भारती’च्या यशस्वी उभारणीतही पीडी काकांचा मोलाचा सहभाग आहे.
पीडी काकांनी रंगभूमीची सेवा करत असताना चौफेर कामगिरी बजावली. गेली अनेक वर्षे राज्य नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून त्यांना, आमंत्रित केले जाते आहे. सोलापूर १८व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी, दिल्लीमधील ४१व्या बृहन्महाराष्ट्र मराठी नाट्य स्पर्धा, लातूर फेस्टिव्हल २०१३-१४ अंतर्गत पु.ल.देशपांडे राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये, परिक्षक म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. परीक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून दोन वर्षे आमंत्रित करण्यात आले. ‘महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धे’ने, महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक वातावरणाच्या विकासामध्ये बजावलेली भूमिका या विषयावरील संशोधनासाठी, केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने पीडी काकांना सिनियर फेलोशिप देण्यात आली. अनेक जणांना त्यांनी, प्रथम रंगभूमीवर काम करण्याची संधी दिली. पी. डी. कुलकर्णी हे नाट्यतंत्राचे सखोल अभ्यासक म्हणून, सुपरिचित आहेतच. तसेच अत्यंत निस्पृह आणि दर्जेदार परीक्षक म्हणूनही संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा लौकिक आहे.
रंगभूमी म्हटले की, आज वयाच्या सत्तरीतही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा असतो. स्वतः उत्तम अभिनेते, दिग्दर्शक असलेले पी. डी. कुलकर्णी, उत्तम कलाकार घडवणारे शिक्षकही आहेत. नाट्यक्षेत्रातील अनुभव संपन्नतेतून नव्या दमाच्या कलाकारांना आणि ज्येष्ठ रंगकर्मींना पीडी काका म्हणतात, “माझ्या वयाच्या रंगकर्मींना कायम वाटत की, जुनं ते सोनं. मात्र जुनं ते सोनं असेल, तर नवा तो दागिना आहे. नाट्यक्षेत्रात येणारी तरुण मुलं ही दागिना आहेत. हा दागिना आपण मिरवला पाहिजे. त्यावर आपणच कलाकुसर केली पाहिजे. आजचे तरुण अत्यंत हुशार आणि आपल्या दोन पाऊल पुढे आहेत. फक्त आजच्या मुलांना, त्यांच्या शब्दोच्चार आणि भाषेवर काम करण्याची आवश्यकता आहे. भाषा समृद्ध होण्यासाठी वाचन करा. आज डिजिटल बुक उपलब्ध आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करा.” केंद्र सरकाराच्या ‘नव्या शैक्षणिक धोरणात सादरीकरण कलेच्या अनुषंगाने, अभिनय कलेचे महत्त्व’ या विषयावर पी.डी.कुलकर्णी हे ‘पीच.डी’ करणार आहेत. या संशोधनासाठी पी. डी. कुलकर्णी यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!