लोणचं-चेंडूचा खेळ...

    17-Feb-2025
Total Views |
 
pickleball
 
लोणचे हा जेवणातील सर्वांचाच आवडता प्रकार. त्यात जेवढे लोणचे मुरलेले तेवढेच ते चवीला छान लागते. याच लोणच्याचं इंग्रजी नावाचा आधार असलेला एक खेळ भारतामध्ये पाय रोऊ पाहतो आहे. पिकलबॉल या खेळाचा प्रवास भारतात सुरु झाला असून,त्याचा प्रसार वेगाने होतो आहे. या खेळाच्या इतिहासाचा हा आढावा...
 
चमचा लिंबू हा सहज म्हणून खेळला जाणारा खेळ लहानपणापासून, आपल्या परिचयातील आहे. चमचा लिंबू या खेळात, वापरला जाणारा चमचा आणि लिंबू हे दोन्ही प्रकार आपण जेवणाखाण्यातल्या लोणच्यासाठी वापरत असतो. आज आपण याच लोणच्याचा नामधारी असणारा, आंतरराष्ट्रीय क्रीडाप्रकार चाखून बघणार आहोत. जे पदार्थ कमी खाल्ले जातात किंवा तोंडी लावायचे असतात, ते डाव्या बाजूला थोडेसे मध्यावर वाढतात. जसे की, लोणचे. जेवणात, न्याहारीमध्ये चवीसाठी तोंडी लावण्याकरिता आपण लोणचं घेतो. वेळप्रसंगी पोळी, पुरी वगैरे लोणच्याबरोबर खाऊन पोटाला आधार देतो. श्रीखंडासारखा गोडाचा असो अथवा तिखटामीठाचा जिन्नस असो, ताटात खाणार्‍यांच्या डाव्या बाजूस लोणचं आवर्जून असते. हे लोणचं अथवा इंग्रजीत बोलले जाणारे पिकल आपल्यात पूर्ण रुजलेले आहे.
 
चमचा-लिंबू सारखेच या (शाब्दिक) लोणच्याला चेंडूची साथ देऊन, तयार करण्यात आलेला ‘पिकलबॉल’ हा खेळ आता, क्रीडाविश्वात रुजताना दिसत आहे. लोणचं जसे मुरले आहे, तसे हे पिकलही मात्र आवर्जून आपल्यात मुरलेले आहे. इंग्रजी भाषेत लोणच्याला आपण ‘पिकल’ असे संबोधतो. पिंगपॉन्ग, टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन अशा रॅकेटवाल्या खेळांचे मिश्रण असलेल्या ‘पिकलबॉल’ने आजकाल देशभरात चांगलीच लय धरली असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत, क्रीडारसिक या खेळाच्या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. अमेरिकेतल्या सिएटलमध्ये, १९६५ साली ‘पिकलबॉल’ या खेळाचा जन्म झाला. जोन प्रिटचार्ड यांनी या खेळाचे, ‘पिकलबॉल’ असे अनोखे नामकरण केले. पिकलबॉलच्या प्रारंभाची थोडक्यात माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहू.
 
१९६७ साली, प्रिचर्ड मित्र बॉब ओब्रायन यांच्या निवासस्थानी, मैदानी पिकलबॉल कोर्ट बांधण्यात आले. फेब्रुवारी १९६८ साली प्रिचर्डने, मॅकलमचा मुलगा डेव्हिड आणि इतर दोन मित्र यांनी पिकल बॉल इंकची स्थापना केली. त्या कंपनीने १९७२ साली आपला वार्षिक अहवाल सादर केला. त्यात त्यांनी याचे ‘पिकलबॉल’ असे नाव नोंदवले. या खेळाच्या साहित्यासाठी कंपनी पॅनेल आणि पिकबॉल किट त्यांनी तयार केले. २०१६ साली इंकला, ‘पिकलबॉल सेंट्रल डॉट कॉम’ने विकत घेतले. जे कॉर्पोरेट नावाने, ‘ओला’, ‘एलएलसी’ अंतर्गत कार्यरत आहे. १९७६ मध्ये वॉशिंग्टनमधील तुकविला येथील, लेटिक क्लबला प्रथम औपचारिक पिकलबॉल स्पर्धेचे श्रेय जाते. त्याचवर्षी त्यांनी या खेळासाठी, अधिकृत नियमावली प्रकाशित केली आणि वॉशिंग्टनमधील टाकोमा येथे ‘राष्ट्रीय दुहेरी अजिंक्यपद स्पर्धा’ आयोजित करण्यात आल्या. २००१ साली १०० सहभागी अ‍ॅरिझोना सीनियर ऑलिम्पिकमध्ये, पिकबॉलचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला. नंतर २००८ साली हा खेळ ‘युनायटेड स्टेट्स सीनियर ऑलिम्पिक’मध्ये समाविष्ट करण्यात आला. युएस पिकबॉलने नोव्हेंबर २००९ मध्ये, अ‍ॅरिझोनाच्या बकेये येथे प्रथम ’युएस पिकलबॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा’ आयोजित केली. ‘असोसिएशन ऑफ पिकलबॉल प्रोफेशनल्स’ अर्थात आताची असोसिएशन ऑफ पिकलबॉल प्लेयर्सची स्थापना, युएसए असोसिएशन पिकबॉलने केली आणि त्याला मान्यताही दिली. २०२२ मध्ये वॉशिंग्टन राज्य विधिमंडळाने, त्याला वॉशिंग्टनचा अधिकृत राज्य खेळ असा दर्जा दिला. त्यानंतर कॅनडा, सिंगापूर यांच्यासह, भारतात या खेळाने पाय रोवलेले आपल्याला आढळतात.
 
एका वृत्तसंस्थेने सप्टेंबर २०२४ मध्ये दिलेल्या अहवालानुसार, मागील वर्षभरात भारतातील ५० हजारांहून अधिक लोकांनी हा क्रीडाप्रकार खेळला होता आणि त्यावेळी देशभरात, ५००हून अधिक खेळाची मैदाने अर्थात कोर्ट होती. दर महिन्याला ४० किंवा ५० नवीन कोर्ट जोडली जात होती. २००६ साली सुनील वालावलकर यांनी, भारतात प्रथम पिकलबॉल आणला होता आणि महाराष्ट्र, हरियाणा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये त्याचे लोण आता पसरत आहेत. पिकलबॉल एरिनासारखे विविध क्लब आणि केंद्रे, या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कोचिंग, कोर्ट बुकिंग आणि उपकरणे विक्रीची ऑफर देत आहेत. महाराष्ट्रातील २२ जिल्हे, पिकलबॉलच्या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न आहेत. सध्या शेर ए पंजाब जिमखाना अंधेरी, विलिंग्टन जिमखाना, सांताक्रूझ आणि कामगार कल्याण केंद्र, एलफिन्स्टन येथे या खेळाचे प्रशिक्षण आणि सराव करता येऊ शकतो. लवकरच वांद्रे, दहिसर आणि ठाण्यातही, या खेळासाठी केंद्र सुरू होत आहे.
 
वालावलकर यांना पिकलबॉलचा पहिला अनुभव १९९९ साली ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा येथे आला. जिथे त्यांनी ११० दिवसांच्या वास्तव्यात तो रोज खेळला. २००६ साली सिनसिनाटी, ओहायोनंतरच्या सहलीनंतर, वालावलकरांना टेनिस क्लिनिकमध्ये पिकलबॉलची ओढ लागली होती. भारतात परतल्यावर वालावलकरांनी, गंभीरपणे पिकलबॉलचे प्रात्यक्षिक दाखवणे सुरू केले. त्यांची मुलगी आणि भाची ही त्यांच्या जोडीला आले. आज अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेचे संस्थापक आणि सचिव असलेले सुनील वालावलकर एका मुलाखतीत सांगतात की, “१९९९ साली कॅनडातील युथ एक्सचेंज कार्यक्रमाच्या वेळी, त्यांना या खेळाची ओळख झाली. त्यानंतर २००६ साली सिनसिनाटी येथील टेनिस क्लिनिक कार्यक्रमादरम्यान टेनिसचे प्रशिक्षण घेताना, पिकलबॉलची पुन्हा ओळख झाली. भारतात परतल्यानंतर खेळाला संघटनात्मक बैठक देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, धर्मादाय किंवा सोसायटी कायद्यान्वये, मान्यता मिळण्यात अडचणी आल्याने कंपनी कायद्यांतर्गत, ‘अखिल भारतीय पिकलबॉल संघटने’ची स्थापना झाली.”
 
ते पुढे म्हणाले, “पिकलबॉल, टेनिस किंवा बॅडमिंटनला स्पर्धा नाही. शालेय स्तरावर या खेळाचा प्रसार झाला असून, नुकतेच राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या दहा खेळांमध्ये, पिकलबॉलचा समावेश करण्यात आला आहे. तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी तसेच, शरीराला सुरेख व्यायाम म्हणून तसेच मुख्य खेळांना पूरक म्हणून, पिकलबॉल विकसित होत आहे.” लोणचे जितका वेळ मुरेल, तेवढीच त्याची चव आवडत जाते. पिकलबॉल खेळाच्या बाबतीतही तसेच झाले आहे. मेन कोर्स म्हणून, ऑलिम्पिकचा क्रीडाप्रकार म्हणून समाविष्ट झाला नसला, तरी अनेक ठिकाणी तो स्पर्धेत खेळवला जात आहे.
 
‘पीडब्लूआर डीयुपीआर इंडिया मास्टर्स’ अशा स्पर्धा, दिल्लीतही पार पडली होती. मुंबईमध्ये १३ वर्षांपूर्वी, पिकलबॉल खेळणारे तीनच खेळाडू होते. आता ही संख्या चार हजार खेळाडूंपर्यंत पोहोचली आहे. साधेपणा हे या खेळाचे वैशिष्ट्य असून, मिनी लॉन टेनिस म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पिकलबॉल खेळाची लोकप्रियता वर्षागणिक वाढत आहे. लॉकडाऊनमुळे सगळ्यांच्याच दैनंदिन जीवनावर, काही प्रमाणात निर्बंध आले होते. त्या काळातही पिकलबॉलपटूंना, एक नावीन्यपूर्ण कल्पना सुचली होती. त्यातूनच ‘व्हर्च्युअल पिकलबॉल’ या रंजक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली होती. जयपूरच्या मेघा कपूर यांनी, त्यासाठी पुढाकार घेतला होता. देशभरातील सुमारे २०० पिकलबॉलपटूंनी, घरामध्येच पिकलबॉल खेळतानाचे व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवरून त्यांना पाठवले होते. त्यानंतर हे सर्व व्हिडिओ एकत्र संकलित करून, त्याला संगीताची जोड देण्यात आली होती. हे आव्हानात्मक काम, गोरेगावच्या गोपाळ टिकमनी या तरुणाने केले होते.
 
आता सर्वसाधारण लोकांबरोबरच, पॅरा पिकलबॉलही खेळवले जात आहे. ज्याला ’डॉप्टिव्ह पिकलबॉल’ किंवा ’व्हीलचेअर पिकलबॉल’ म्हणतात. २०१६ साली युएसए पिकलबॉलने, पॅरा पिकलबॉलची अधिकृत शाखा काढली. व्हीलचेअर वरचे नियम किरकोळ बदल करून, यात वापरण्यात आले. २०२३ साली ’ग्लोबल स्पोर्ट्स इंडियन पिकलबॉल ओपन’सारख्या, अनेक पिकलबॉल स्पर्धा भारतात आयोजित केल्या गेल्या आहेत आणि भविष्यातील ’जागतिक पिकलबॉल चॅम्पियनशिप’सारख्या स्पर्धा भारतातदेखील आयोजित करण्याचे नियोजन आहे. याव्यतिरिक्त, अरमान भाटिया आणि महाराष्ट्रातील चोपडा येथील मयूर पाटील यांसारखे उल्लेखनीय भारतीय खेळाडू विविध स्पर्धांमध्ये, चांगली कामगिरी करून उदयास येत आहेत. भारतात हा ‘पिकलबॉल’चा खेळ अधिकाधिक लोकांनी खेळावा म्हणून याच्या संघटनेने, स्पर्धेच्या आयोजकांनी, हिंदी चित्रपट सृष्टीतील तारे तारकांनादेखील साद घातलेली आपल्याला आढळून येते. याचे ताजे उदाहरण म्हणजे, दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या मुंबईतील, ब्रेबॉर्न स्टेडियमवर एका खास पिकलबॉल सामन्यात: अभिनेता आमिर खान आणि अली फजल आमनेसामने आले होते.
 
त्यांनी वर्ल्ड पिकलबॉल लीगसाठी एक खास सामना खेळला. ज्यामध्ये अलीने दिल्ली दिलवालेच्या लॉरेन मर्काडोसोबत भागीदारी केली आणि आमिरने चेन्नई सुपर चॅम्प्सच्या थड्डिया सोबत भागीदारी केली. आमिर आणि थड्डिया यांनी, त्यांच्या कौशल्याने लगेच आघाडी घेतली. पण, अली आणि लॉरेन यांनी जोरदार प्रतिकार केला. ज्यामुळे उपस्थितांना एक रोमांचकारी सामना बघण्याचा आनंद अनुभवता आला. आमिर आणि अली यांनी, स्पर्धक खेळाडूंमधील विनोद आणि खेळकर विनोदांनी भरलेल्या लाईव्ह कॉमेन्ट्रीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. अलीविरुद्ध १३-८ असा आमिर खान याने विजय मिळवला आहे. केप्र, बेडेकर अशा ब्रँडचे लोणचं आज जसे प्रसिद्ध आहे, तसे वालावलकरांचेही पिकल(बॉल) लवकर मुरो आणि क्रीडाविश्वात हा क्रीडाप्रकार अधिकाधिक प्रसिद्ध होवून, क्रीडाप्रेमी या अनोख्या खेळाचा आनंद घेवो.
 
 
इति।
 
श्रीपाद पेंडसे
 
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)