प्रवासकेसरी : केसरी पाटील

    15-Feb-2025   
Total Views | 56

kesari patil
 
 
‘तीर्थाटनातून पर्यटना’च्या पारंपरिक सिद्धांताला छेद देत पर्यटनाची नवीन क्षितिजं पर्यटकांसाठी खुली करणारं नाव म्हणजे ‘केसरी टुर्स’. आपल्या पर्यटककेंद्रीत दर्जेदार सेवेने ‘केसरी’ने ‘आपलं माणूस’ ही ओळख सार्थ ठरवली. देशांतर्गत पर्यटनाबरोबर विदेशातही ‘केसरी’ने ‘एक अविस्मरणीय अनुभव’ची शिदोरी सदैव जपली. अशा या पर्यटनपंढरी ‘केसरी टुर्स’चे जन्मदाते, सर्वेसर्वा केसरी पाटील यांचे शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. इतरांना प्रवासाची गोडी लावणाऱ्या केसरींचा जीवनप्रवासही थक्क करायला लावणारा आहे. एक मेहनती शेतकरी, विद्यार्थ्यांचा लाडका शिक्षक, एक जबाबदार सहलसंयोजक ते एक यशस्वी उद्योजक... अशा या ‘प्रवासकेसरी’च्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश...
 
प्रत्येक गोष्टीची सुरुवात शून्यातून होते. लहानातूनच मोठं घडत जाते. ही सुरुवात, हा बदल केवळ मानवनिर्मित उद्योगधंद्यांपुरता मर्यादित नाही, तर माणसाच्या सर्वांगीण प्रगतीच्या आलेखालाही तो तितकाच साजेसा असतो. याची प्रचिती केसरी पाटील यांचा जीवनप्रवास उलगडताना निश्चितच येते. आज देशविदेशाची आलिशान सफर घडविणार्‍या केसरींची पालघर ही जन्मभूमी. १० एप्रिल, १९३५ रोजी पालघरमधील मथाणे या गावात केसरी पाटील यांचा जन्म झाला. घरची शेतीवाडीही बर्‍यापैकी. शिक्षण पूर्ण झाल्यावर शेतीमध्येही केसरींनी आपला हात आजमावला. नवनवीन प्रयोगही केले. त्यांचे शिक्षण मथाणा आणि एडवणमधील विद्याभवन शाळेत पूर्ण झाले. लहानपणापासूनच केसरींना मराठी, इंग्रजी या भाषांबरोबरच इतिहास-भूगोलातही विशेष रुची. गणितातील आकडेवारीत काही त्यांचे मन फारसे रमले नाही, पण आता व्यवसायाच्या गणितांची बेरीज-वजाबाकी मात्र उत्तम जमत असल्याचे ते आपल्या मिश्किल शैलीत आवर्जून सांगतात.
 
घरावरील कर्ज फेडायचे, या उद्देशाने झपाटलेल्या केसरींनी १९५६ साली विद्याभवन शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली. शिक्षकाच्या तुटपुंज्या पगाराला त्यांनी शेतीच्या उत्पादनाची जोड दिली. एरवी कडू म्हणून काहीशी सापत्न वागणूक मिळणार्‍या कारल्याचीच त्यांनी लागवड केली आणि केसरींचे कारल्याने फुललेले हिरवेगार मळे पाहण्यासाठी दूरवरून गावकरी गर्दी करू लागले. काहीच दिवसांत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रेमाचे मळे फुलले आणि शेती-शिक्षकीपेशा सांभाळतानाच २६ एप्रिल, १९६३ रोजी केसरी पाटील सुनीता राऊत यांच्याशी विवाहबद्ध झाले आणि त्यांच्या जीवनप्रवासाला एका समंजस, सालस साथीदाराची जोड मिळाली. एका वर्षानंतर वीणारूपी कन्यारत्नाने त्यांच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त करून दिला.
 
आईवडिलांबरोबरच आता स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारीही वाढली होती, पण कमाईचा वेग मात्र त्या मानाने संथ होता. अशात केसरी पाटील यांचे मुंबईतील ज्येष्ठ बंधू अप्पा पाटील यांनी त्यांच्या सहलीच्या व्यवसायात केसरींना मदतीसाठी विचारणा केली. आर्थिक परिस्थिती पाहता, सुरुवातीला केसरींनी दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुटीत सहलसंयोजकाची भूमिका लीलया निभावली. इथे शाळेच्या सहलींचा, स्नेहसंमेलन व्यवस्थापनाचा आणि शिस्तीचा अनुभव एक सहलसंयोजक म्हणून त्यांच्या सत्कारणी लागला. घरचा विश्वासू, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व्यवस्थापक मिळाल्याने अप्पाही खूश झाले. १९६६ साली शैलेशच्या रूपाने केसरींना पुत्रप्राप्ती झाली. अशातच अप्पांनी केसरींना त्यांच्या मुलांच्या भविष्याचा, शिक्षणाचा आणि मुंबईत स्वत:च्या हक्काच्या घराचा विचार करता, पूर्णवेळ सहलीच्या व्यवसायात भागीदार म्हणून रुजू होण्यासाठी आग्रह केला. केसरींनीही घरच्यांशी विचारविनिमय करून मनावर दगड ठेवत शाळेची नोकरी सोडली आणि सहलीच्या व्यवसायात ते अप्पांबरोबर पूर्णवेळ उतरले. अभ्यासू वृत्ती, उत्तम वक्तृत्त्व कौशल्य, जिद्द, चिकाटी आणि प्रसंगावधान या केसरीभाऊंच्या गुणांनी पर्यटकांमध्येही ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. काळ पुढे सरकत होता. पर्यटन क्षेत्रातही बदलांचे वारे वाहत होते. केसरींच्या कुटुंबाचा वटवृक्षही एकीकडे बहरत होता.
 
१९६७ साली अप्पांबरोबर या व्यवसायात उतरूनही केसरींच्या आर्थिक प्रगतीचा गाढा मात्र अजूनही स्थिरावला नव्हता. त्यातच अप्पांकडून मिळणारी उपेक्षित वागणूक आणि वाढत्या कौटुंबिक जबाबदारीखातर केसरींना हृदय पिळवटून टाकणारा निर्णय घेण्यास भाग पडले. अप्पांच्या व्यवसायातून मुक्त होऊन त्यांनी स्वत:ची टूर कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. वयाची ४५ वर्षे उलटून गेल्यामुळे आयुष्याच्या या टप्प्यावर कुटुंबाला अस्थिर करण्यासाठी त्यांचे मन खरं तर धजावत नव्हते, पण तरीही बायकोचा, मुलांचा आधार होता म्हणून स्वत:ची ट्रॅव्हल कंपनी सुरू करण्याचे धाडस केसरींना दाखवता आले. १९८४ साली वयाच्या पन्नाशीत प्रवेश करताना ‘केसरी टुर्स’चा माहीमच्या दालमिया चाळीत केवळ १०० फूट जागेत शुभारंभ झाला. बायको-मुलांचा भक्कम आधार, पर्यटन क्षेत्रातील बर्‍या-वाईट अनुभवांची शिदोरी आणि सळसळत्या आत्मविश्वासासह केसरी पर्यटनाच्या व्यवसायात जोमात उतरले. बायकोचे दागिने गहाण ठेवून अतीव कष्टातून त्यांनी व्यवसाय उभा केला. त्यामुळे व्यवसायाच्या प्रारंभी सोबतीला होते, ते केवळ कुटुंबीयांचे पाठबळ आणि पर्यटकांचे शुभाशीर्वाद...
 
‘पर्यटक देवो भव’ या भावनेतून सुरू झालेल्या ‘केसरी’ची पहिली टूर निघाली ती राजस्थानला आणि तीही केवळ १३ पर्यटकांसोबत. पण, केवळ १३ पर्यटक आहेत म्हणून अजिबात खचून न जाता, पर्यटकांनी ‘आनेवाला कल तेरा है’ असा संकेतच दिल्याचे मानून केसरींनी आपल्या वाटचालीचा श्रीगणेशा केला. साहजिकच, हा प्रवास सुकर, सरळ नव्हता. केसरींना आडकाठी करायची म्हणून जाहिरातींतून नकारात्मक शेरेबाजी-प्रसार सुरू झाला. पण, केसरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हे आव्हान स्वीकारलं आणि सकारात्मक विचारांची कास धरून एकजुटीने सर्व संकटांचा नेटाने सामना केला. पर्यटकांची साथ मिळत गेली आणि केसरींच्या टूर्स भरारी घेऊ लागल्या आणि ‘टूर म्हणजे केसरी’ हे समीकरण पर्यटन व्यवसायात प्रचलित झाले. ‘फॅमिली बिझनेस’ नव्हे ‘बिझनेस फॅमिली’ असा उल्लेख केसरी पाटील आपल्या ‘प्रवास....एका प्रवासाचा’ या आत्मचरित्रपर पुस्तकात आवर्जून करतात.
 
‘केसरी टुर्स’मधील नावीन्यपूर्ण संकल्पनांचे, व्यवसायवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्व श्रेय ते आपल्या मुलांना, जावई, सुनांना न विसरता देतात. मग ते महिलांसाठीच्या विशेष टुर्ससाठी ‘माय फेअर लेडी’ असो किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेले ‘सेकंड इनिंग’. ‘केसरी’ने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘नासा’च्या विशेष सहलीनांही भरभरून प्रतिसाद मिळाला. भविष्यात तर चंद्रावर, मंगळावरही टूर नेण्याचा मानस उत्साही केसरीभाऊ बोलून दाखवत. कुटुंबाला जपणारे केसरीभाऊ सहकार्‍यांना अर्थात ‘केसरीयन्स’लाही पर्यटक जपण्याचे, वाढवण्याचे मार्गदर्शन करायचे. पर्यटन क्षेत्रातील अनमोल योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निधनाने पर्यटन क्षेत्राचं चालतं-बोलतं विद्यापीठ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अश्या पर्यटन क्षेत्रातील दीपस्तंभ असणाऱ्या केसरी पाटील यांना दै. मुंबई तरुण भारत आणि महाएमटीबी कडून भावपूर्ण श्रद्धांजली!

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121