सुदूर पूर्वोत्तर भारतातील आसाममधील राजकवी माधव कंदलीचे रामायण, ‘असामिया’ साहित्यातील पहिले रामायण महाकाव्य आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या आधी 14व्या शतकात, हा राजकवी होऊन गेला. त्याचे रामायणातील फक्त पाच कांड उपलब्ध आहेत. पुढील काळात, थोर संत शंकरदेव यांनी उरलेली आदिकांड, उत्तरकांड लिहून माधव कंदलांचे रामायण पूर्ण केले आहे.
भारताच्या पूर्वोत्तर प्रदेशातील आसाम हे प्राचीन राज्य आहे. महाभारत काळी या राज्याची प्रागज्यातिषपूर ही राजधानी होती. असुरांचा राजा नरकासुराचा श्रीकृष्णाद्वारे वध करून, बंदीवासातील हजारो स्त्रियांची मुक्ती केली ती येथेच. इतिहास काळात येथे वर्मन, शालस्तंभ, अहोम या राजघराण्यांनी राज्य केले. अहोम राजवंशाने येथे सुमारे 600 वर्षे राज्य केले. मोगल बादशहांनी अनेकवेळा आसामवर आक्रमणे केली. पण, त्यांना आसाम जिंकता आला नाही. त्यामुळे आसाम हा मोगलांचे धर्मांध पाय न लागलेला प्रदेश आहे, ही गोष्ट असमिया शौर्याची अमर गाथा आहे. अशा या आसाम राज्यात, 14व्या शतकात माधव कंदली नावाचे विद्वान कवी होऊन गेले. हा थोर नैय्यायिक तत्त्वज्ञ, चिंतक होते. त्याला ‘राजकवी’ म्हणूनच ओळखले जाते. याने राजाच्या इच्छेस मान देऊन असमिया भाषेमध्ये रामायण महाकाव्य लिहिले. या रामायणालाच ‘माधव कंदली रामायण’ म्हणून ओळखले जाते. असमिया भाषेतील हे पहिलेच रामायण, म्हणून त्याला ‘असमिया रामायण’ म्हणूनही ओळखले जाते.
आसाममधील नवगाव (नौगाव) येथे त्यांचा 14व्या शतकाच्या उत्तरार्धात, कंदली ब्राह्मण समाजात जन्म झाला. कंदली हे गावाचे, समाज समूहाचे नाव आहे. आसाममधील थोर संत शंकरदेव यांच्या आधी माधव कंदली यांचा कार्यकाळ असून, शंकरदेवांनी माधव कंदलींची विद्वत्ता, कवित्त्व आणि ‘रामायण’ आदि साहित्याने प्रभावित होऊन, ‘पूर्वकवि अप्रमादी’ असा त्याचा गौरव केलेला आहे.
कविराज कंदली ये आमके बूलिकरा,
माधव कंदली आरो नाम ।
सपाने सचिने मजि ज्ञान काय वाक्य मने,
अहर्निशे चिंतो राम राम ॥
हे माधव कंदलींच्या रामायणातील स्वपरिचय देणारे काव्य, असमिया भाषेत असून देवनागरी लिपीत आहे. असमिया भाषेला स्वतःची लिपी आहे. ती एक दोन बदल वगळता, बांगला आणि मणिपुरी या भाषांच्या लिपीसारखीच आहे. कविराज माधव म्हणतात, “मला ‘कविराज कंदली’ नावाने लोक ओळखतात. माझे नाव माधव कंदली आहे. मी स्वप्नात, जागृतीत, काया, वाचा, मने केवळ राम राम करीत, श्रीरामाचे अहर्निश चिंतन, अनुसंधान करतो.”
कवी माधव कंदली यांना, आदि महाकवी वाल्मिकी ऋषींबद्दल अतिव आदर व पूज्यभाव आहे. कविराज कंदली यांनी वाल्मिकी रामायणाबरोबरच अन्य संस्कृत रामायणांचाही अभ्यास केलेला आहे. वाल्मिकींचा राम हा मानव-मनुष्य आहे, तर माधव कंदली रामाला मानव न मानता देव, विष्णुचा सातवा अवतार, अवतारी विभूती अशा देवत्त्वाच्या दृष्टीने रामाकडे पाहून, सारे प्रसंग रंगवतात. माधव कंदली हे थोर वैष्णव भक्त आहे. आपल्या पंथीय निष्ठेची तेे कोठेही प्रतारणा करीत नाही. कंदली रामायणाचे फक्त पाच कांडच उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे अभ्यासक-समीक्षकांमध्ये माधव कंदलींचे रामायण पाच कांडाचे की, सात कांडाचे याविषयी मतभिन्नता, वाद आहे. माधव कंदली यांनी लिहिलेले सुरुवातीचे ‘आदिकांड’ आणि शेवटचे ‘उत्तरकांड’ अशी दोन कांडे सापडलेली नाहीत. थोर संत शंकरदेव यांनी ही दोन कांडे लिहून, माधव कंदलींचे रामायण सप्तकांडात्मक रूपात पूर्ण केले आहे.
माधव कंदलींनी आपले रामायण सात कांडाचेच असल्याचा स्पष्ट उल्लेख, एका पदामध्ये केलेला आहे. “साताकांडे रामायण पद बंधे निबंधिलो ।” त्यामुळे त्याचे रामायण किती कांडाचे? हा वाद निरर्थक आहे. तसेच, त्याच्या रामायणातील आणखी एका ओळीवरून हे रामायण, श्री राजा वराही महामाणिक्य यांच्या कारकिर्दीत लिहिले, हेसुद्धा स्पष्ट होते. ते म्हणतात, ‘रामायण सुपयार श्री महामाणिक्य ये वाराह राजार अनुरोधे’. असमिया भाषेमध्ये, माधव कंदलींच्या रामायणा इतकेच कवी रुद्र कंदली यांचे ‘द्रोण पर्व’ नावाचे, महाभारतपर काव्य खूपच लोकप्रिय आहे. कवी रुद्र कंदली कवीराज माधव कंदली आणि संत शंकरदेव-माधवदेव, हे असमिया साहित्याला वैष्णव भक्ती पंथाची संस्मरणीय देणगीच आहेत.
माधव कंदली यांची भाषा संस्कृतप्रचूर अत्यंत मधुर असून, ओज आणि प्रसाद असे दोन विशेष गुण आहेत. त्याने केलेली निसर्ग वर्णने बहारदार आहेत. युद्धवर्णने वीर रसयुक्त स्फूर्तिदायक आहेत. त्याच्या रामायणात, स्त्री पात्रांना -सीतेला विशेष प्राधान्य आहे. माता कैकईच्या इच्छेस मान देऊन मातृपितृ आज्ञापालक, कर्तव्यपरायण श्रीराम जेव्हा वनगमनाचा निर्णय घेतो, तेव्हा सीतेला महालातच राहण्यास सुचवतो. तेव्हा सीता ‘जेथे राघव तेथे सीता’ निर्धार व्यक्त करते. त्याविषयी माधव कंदली म्हणतो -
कमन अंग मोक हिन देखिला हा ।
सि कारणे प्रभु मोक उपेक्षित या हा ॥
सूर्य अविहने येन नो शोभय दिन ।
रजनी नो शोभे येन शशधर हीन ॥
वसंत नो शोभे विने कोकिलेर रोले ।
निष्फल जीवन प्रभु तुमि विने कोले ॥
अर्थात ः हे रामा! माझ्या अंगी असे कोणते उणेपण दिसले की, तुम्ही मला इथे सोडून वनात जाऊ इच्छिता? ज्याप्रमाणे, सूर्याविना दिवस, चंद्राविना रात्र, कोकिळकुजनाविना वसंत नाही, तसे तुमच्या सान्निध्याविना माझे पत्नी जीवन नाही.
दृष्टांत, उपमा, संकेत आणि शब्दसौष्ठव याद्वारे आपले काव्य मोहक, रंजक करण्यात माधव कंदली कमालीचे यशस्वी झालेले असून, त्यामुळेच त्यांच्या रामायणाचा गुंजारव आसामच्या घराघरात, सण-उत्सवात गेली 700 वर्षे ऐकू येत आहे. कविराज माधव कंदलींच्या रामायणाने प्रभावित होऊन, रामकथेवर काव्य करणार्या अनेक पिढ्या झाल्या आहेत. त्यामुळे असमिया भाषेतही अनेक रामकथा आहेत.
विद्याधर ताठे
9881909775
(पुढील लेखात ः तामिळ भाषेतील कम्ब रामायण)