'लव्ह जिहाद'विरोधी कायदा आणि...

    15-Feb-2025   
Total Views |

Love Jihad Act
 
महायुती सरकार विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने, ‘लव्ह जिहाद’ धर्मांतरण विरोधात कायदा व्हावा, यासाठी समिती स्थापन झाली आणि अनेक घटनांचा आलेख मनात तरळून गेला. 2022 साली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात लढा उभारत, ‘आंतरधर्मीय परिवार विवाह समन्वय समिती’ची स्थापना केली. मंत्री नितेश राणे यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात रणशिंग फुंकले. तर दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे ही ‘लव्ह जिहाद’विरोधात, महाराष्ट्रभर अभियान राबविले गेलेे. त्या अनुषंगाने या समितीचे महत्त्व अधोरेखित करणारे हे वास्तव...
 
लव्ह जिहाद’ आणि त्यातून होणारे धर्मांतरण याविरोधात महाराष्ट्रात कायदा झालाच पाहिजे, यासाठी अनेक वर्षे ‘सकल हिंदू समाजा’ने लढा उभारला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हिंदूंनी लाखोंचे मोर्चे काढले. ‘लव्ह जिहाद’ विरोधातला संताप इतका प्रखर होता की, ‘लव्ह जिहाद’ विरोधात जाणीव असलेले लोक सत्तेत यावे, म्हणून समाजाने एकमताने भाजपचे सरकार राज्यात आणले. राज्यात भाजपची सत्ता स्थापन झाल्या झाल्या, मग ‘लव्ह जिहाद’चे समर्थक बोलू लागले, “आले ना तुमच्या विचारांचे सरकार. मग, करा आता ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा. हिंदुत्ववादी विचारसरणीचे सरकार अगदी केंद्रात आणि राज्यातही सत्तेत असले, तरी ते महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ धर्मांतरण या विरोधात कार्यवाहीसाठी काहीही करणार नाहीत.” त्यांच्या म्हणण्याचे समर्थन करताना ते जे म्हणायचे त्याचा सारांश असा की, महाराष्ट्रात हिंदू संस्कृतीच्या संरक्षण विचारसणीला विरोध करणार्‍या, त्यानुसार हिंदुत्ववाद्यांच्या ‘लव्ह जिहाद’विरोधी लढ्याला धार्मिकद्वेषच माननार्‍या, अनेक संघटना आणि तशा विचारांचे लोक शक्तिशाली आहेत. त्यांच्या विरोधात जायला कोणतेही सरकार तयार होणार नाही. हे म्हणताना त्या लोकांच्या चेहर्‍यावरचा असुरी आनंद, मनात संतापाची लाट आणायचा. पण, महायुतीच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरणविरोधी कायद्याच्या शिफारशीसाठी, अभ्यास करणारी समिती स्थापित झाली. त्यामुळे राज्यात हिंदुत्व विचारसरणीचे सरकार निवडून दिले, याबद्दल सकल हिंदू समाजामध्ये मनापासून आनंदाचे वातावरण आहे.
 
काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या एक लाख घटना घडल्या आहेत. तसेच, मंत्री मंगल प्रभात लोढा ज्यावेळी महिला बाल कल्याणचे मंत्री होते, तेव्हा तेही म्हटले होते की, “राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या एक लाख घटना घडल्या आहेत.” त्यावेळी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुसलमान पक्षाच्या रईस शेख याने म्हटले होते, “एक लाख घटना घडल्या आहेत, तर त्यासंदर्भातल्या पोलिसात तक्रारी कुठे आहेत? रईस यांनी लोढा यांच्या विरोधात मोर्चाही काढला होता. गेली अनेक वर्षे ‘लव्ह जिहाद’विरोधी काम करत असताना, तसेच, दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’विरोधी जागृती करत असताना, शेकडो वेळा ’लव्ह जिहाद घडत असता, तर कुठेतरी पोलीस स्थानकामध्ये त्याविषयी एक तरी तक्रार असती ना?’ असा प्रश्न कायमच विचारला गेेला. त्याचबरोबर तुम्ही ‘लव्ह जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ बोलून, हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करता का?’ ‘लव्ह जिहाद’ शब्द उच्चारूनच नका कारण, त्याने मुस्लिमांच्या भावना दुखावतात,” असेही अनेक लोक बोलायचे. खरे तर हा दोन धर्मांचा प्रश्न नव्हता, तर प्रश्न होता लव्ह जिहादमुळे, निष्पाप मुली महिलेच्या आयुष्याच्या होणार्‍या वाताहातीचा. प्रश्न होता लव्ह जिहादमुळे, दुर्दैवी नरकसमान जगणार्‍या त्या निष्पाप मुलींचा. त्या मुलीही त्यांच्या आईबाबांच्या काळजाचा तुकडाच होत्या. पण, लव्ह जिहाद करत दुष्टांनी, या काळजाच्या तुकड्याला चिरडून टाकले.
 
असो. लव्ह जिहादविरोधी तक्रारी दाखवा, या प्रश्नाला काय उत्तर देणार? कारण, सत्य दिसायचे आणि असायचेही की, मुलीला प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवून, तिचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केलेले असायचे. तिला सर्वच बाजूंनी हतबल केलेले असायचे. तिचे शोषण करणार्‍या व्यक्तीबरोबर तिने स्वत:हून राहण्यास किंवा पळून जाण्यास तयार व्हावे, धर्मांतरण करावे, अशी परिस्थिती निर्माण केलेली असायची. तसे करण्यास तिने नकार दिला, तर ब्लॅकमेलिंग, शारीरिक, मानसिक अनन्वित अत्याचार केलेले असायचे. पण, याविरोधात तिने पोलिसांकडे तक्रार केली तर? पोलिसांनाही तिच्यावरचे अत्याचार दिसायचे. त्यांनाही गुन्हेगाराविरोधात कारवाई व्हावी असे वाटे. पण, गुन्हा नोंदवणार कोणत्या कलमाखाली? कारण, ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदाच नाही. अमुक एक गुन्हा घडला, तर त्याविरोधात ’लव्ह जिहाद’ अंतर्गत गुन्हा नोंदवून कार्यवाही करावी, अशी कुठेही स्पष्ट व्याख्या नाही. त्यामुळे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवताना, गुन्ह्याची वर्गवारी करण्याची तरतूद ही ठरलेली. जसे छेडछाड, विनयभंग, बलात्कार, अपहरण, घरगुती हिंसाचार. त्यामुळे महाराष्ट्रात वास्तवात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरणाच्या लाखो घटना घडल्या असल्या, तरी पोलिसांच्या कागदोपत्री त्या घटना म्हणजे, घरगुती हिंसाचार, अपहरण, बलात्कार असेच नमूद असते. यामुळेच धूर्तपणे ते प्रश्न विचारायचे की, महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या लाखो घटना घडल्या आहेत ना, मग दाखवा एक तरी तक्रार?
 
या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळेल, अशी आता शाश्वती वाटत आहे. कारण, महायुती सरकारने यासंबंधीचा केलेला शासन निर्णय. निर्णयानुसार, राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली, सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली महिला व बालविकास, अल्पसंख्याक विकास, विधी व न्याय, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचा प्रत्येकी एक सदस्य आणि गृह विभागाचे दोन सदस्य , असे सात जण समितीवर असणार आहेत. राज्याच्या वास्तविक परिस्थितीचा अभ्यास करून, ‘लव्ह जिहाद’ व फसवणूक करून किंवा बळजबरीने केलेले धर्मांतरण, याविषयी प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत उपाययोजना सुचवणे, कायदेशीर बाबी तपासणे, तसेच इतर राज्यातील ‘लव्ह जिहाद’ धर्मांतरण विरोधी कायद्यांचा अभ्यास करणे आणि त्यानुसार कायद्याच्या संदर्भात शिफारस करणे, ही या समितीची कार्यपद्धती असणार आहेे. चला, सुरुवात तर झाली आहे.
 
शरीराचे 36 तुकडे केलेली वसईची श्रद्धा वाळकर, बुरखा घालत नाही म्हणून, गळा चिरून खून झालेली रुपाली चंदनशिवे, नकार देते म्हणून, गळा दाबून हत्या केलेली आणि गोणपटात भरून फेकून दिलेली पुनम क्षिरसागर, एकतर्फी प्रेमातून निघृण हत्या झालेली, मृतदेह उकरड्यावर फेकेलली उरणची यशश्री शिंदे अशा एक ना अनेक निष्पाप मुली. या सगळ्याच घटनांना खूप जवळून पाहिल्यामुळे आणि त्यासंदर्भात काम केल्यामुळे, आज कुठे तरी मनाला समाधान मिळत आहे की, भविष्यात ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना आळा बसेल. कायद्याच्या धाकामुळे, लव्ह जिहादसारखा घृणास्पद गुन्हा करण्यास, सहसा कुणी धजावणार नाही. लव्ह जिहादच्या बळी ठरलेल्या निष्पाप मुलींना, खर्‍या अर्थाने न्याय मिळण्यासाठीचा पहिला दरवाजा आज उघडला आहे. तसेच, या समितीमुळे जिवाचीही पर्वा न करता लव्ह जिहादविरोधी लढा उभारणार्‍या कार्यकर्त्यांना, बळ मिळणार आहे. लव्ह जिहादविरोधात प्रचंड संघर्ष करणार्‍याच्या संघर्षाला, अंशत: यश आले असे वाटते. हिंदू समाजातर्फे तसेच मुली, महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात संवदेनशील असलेल्या इतरही समाजातर्फे ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे मनस्वी आभार!
 
9594969638
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.