ट्रेन चालवणार्या एका लोकोपायलटला व्यक्त व्हावेसे वाटले आणि ‘रूळानुबंध’ हे पुस्तक जन्माला आले. आपल्या अनुभवाची झोळी त्यांनी लोकांसमोर मुक्तहस्ते मोकळी केली. अभिव्यक्तीचा हा नवा अविष्कार साहित्यजगताला समृद्ध करीत आहे. नेमके हे ‘रूळानुबंध’ कसे जुळले, त्याचीच ही गोष्ट...
- ‘रूळानुबंध’ या तुमच्या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘ताराबाई शिंदे पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. आपल्या काय भावना आहेत?
या पुस्तकाची योग्य ती दखल घेतली जात आहे, याचा मला आनंद आहे. ‘रूळानुबंध’ हे पुस्तक खरे तर लोकांनी उचलून धरले. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून मला वाचकांनी तशा प्रतिक्रिया दिल्या. काही प्रतिक्रिया परदेशात राहणार्या मराठी रसिकांनीसुद्धा दिल्या. ट्रेन चालवणार्या माणसाचे आयुष्य कसे असेल, याबद्दल लोकांच्या मनात कायमचे कुतूहल असते. मला वाटते, माझ्या या पुस्तकाच्या निमित्ताने आमच्या जीवनाचा जो एक उपेक्षित भाग असतो, तो मी लोकांसमोर मांडायचा प्रयत्न केला आणि त्याला लोकांनी दाद दिली.
- ‘रूळानुबंध’ हे पुस्तक वाचताना ते आत्मवृत आहे, असे वाटते. आपल्याला हे आत्मवृत्त का मांडावेसे वाटले?
आता मागे वळून बघताना असे लक्षात येते की, मी माझ्या जगण्याचे तुकडे जोडत गेलो. एका रेल्वेचालकाचा भोवताल अत्यंत कठीण असतो. अत्यंत विपरित परिस्थितीचा सामना आम्हाला करावा लागतो. माझ्या या कामातल्या कठीणपणाचा निचरा व्हावा, म्हणून पुस्तकांच्या जगाने मला खुणावले. नंतर हळूहळू मी माझ्या जगण्याबद्दल व्यक्त होत गेलो आणि मला लेखनातून नवा साक्षात्कार झाला. मी जसा जसा लिहित गेलो, तसा तसा मी मोकळा होत गेलो. वेगवेगळ्या मासिकांमधून माझे लेख प्रसिद्ध होऊ लागले. त्यावर लोक आपली प्रतिक्रिया नोंदवायचे. त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये एक असोशी होती. वाचकांचे हे आपलेपण मला बळ देणारे ठरले.
- पुस्तक प्रथमच लिहिण्याचा अनुभव कसा होता? आपल्या पुस्तक लेखनाची प्रक्रिया काय होती?
‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक भानू काळे यांनी माझ्या लिखाणाला दिशा दिली. त्यांनी मला लिहिण्यासाठी उद्युक्त केले. ज्येष्ठ लेखिका उमा कुलकर्णी माझे लेख नियमित वाचत असत. त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की, या लेखांचे पुस्तक व्हायला हवे. ज्येष्ठ लेखक रवीप्रकाश कुलकर्णी यांनीसुद्धा पुस्तकासाठी आग्रह धरला होता. माझा मित्र चंद्रशेखर सानेकरने या बाबतीत मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे. शब्दमल्हार स्वानंद बेदरकर यांनी अखेर माझे सगळे लेख एकत्रित केले आणि हे पुस्तक आकाराला आले. या पुस्तकाचे जे मुखपृष्ठ आहे, ते विजयानंद बिस्वाल यांच्या कुंचल्यातून साकारले आहे. या पुस्तकाच्या आतमध्ये असलेली चित्रे श्रीराम हसबनीस यांनी रेखाटली आहेत. पुस्तकातील मजकुराला अगदी साजेशी चित्रे त्यांनी काढली आहेत.
- ‘रूळानुबंध’मधून समृद्ध वाचन दिसते. तेव्हा तुमच्या वाचनप्रवासाबद्दल थोडक्यात सांगा?
गोविंद तळवलकर यांच्या लेखणीवर पोसलेला मी माणूस आहे. त्यामुळे खूप पूर्वीपासून मी वाचनाची शिस्त स्वतःला लावून घेतली. एखादी गोष्ट वाचनात आली किंवा एखाद्या गोष्टीबद्दल लिहायचे असेल, तर त्याच्या मुळाशी जायला हवे, हा माझा विचार आहे. उदाहरणार्थ ’युद्ध’ या गोष्टीवर जर मला लिहायचे असेल, तर मी जगाच्या परिप्रेक्षात युद्ध नेमके काय होते, याचा विचार केला. वाचनाची सवय खूप पूर्वी लागल्यामुळे, आपल्याला नेमके काय वाचायचे आहे, हे लक्षात येते. भरमसाठ गोष्टींचे वाचन न करता, नेमक्या आणि अचूक पुस्तकांची निवड मी करतो. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, या गोष्टीची मी स्वतःला जाणीव करून देतो. त्यामुळे आपसूकच निरर्थक गोष्टी निकालात निघतात.
- एका लेखकाच्या भूमिकेतून आपल्या समाजातील वाचनाविषयी आपल्या काय भावना आहेत?
माझ्या आजूबाजूला बघताना मला दुर्दैवाने हे सांगावेसे वाटते की, लोक वाचन विसरत चालले आहेत. हातातल्या वृत्तपत्रांची, पुस्तकांची जागा आता मोबाईलने घेतली आहे. लोकांचा ‘स्क्रीन टाईम’ खूप वाढला आहे. ट्रेनमधून प्रवास करतानासुद्धा माझा असा अनुभव आहे की, मी जर एखादे पुस्तक वाचत असेन, तर समोरची एखादी व्यक्ती खोडसाळपणाने त्याचा फोनचा आवाज मोठा करते. म्हणजे लोकांना एका प्रकारे त्यांच्यातलाच माणूस हवा असतो का, असा मला प्रश्न पडतो.
- आपल्या लोकांनी नेमके काय वाचले पाहिजे?
आपले रोजचे येणारे वृत्तपत्र म्हणजे नोंदवलेला इतिहास आहे. आपल्या भोवताली नेमके काय घडते आहे, त्यावर लोक कसे भाष्य करत आहेत, हे आपण जाणून घेतले पाहिजे. मराठी साहित्याला मासिकांची एक समृद्ध परंपरा होती. दुर्दैवाने आज त्या परंपरेचा अस्त होताना आपल्याला दिसून येतोय. अत्यंत दर्जेदार मासिके, साप्ताहिक यामुळे तोट्यात गेली आणि बंद पडली. आपल्याकडे लोक व्यक्तिगत चैन करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतील. पण, मासिकाची वर्गणी द्यायला मात्र कचरतील, ही गोष्ट चुकीची आहे. आपली मातृभाषा या साहित्यातून जगत असते. आपली भाषा जगवायला आपणच कष्ट उपसायला हवे.
- यंदा राजधानी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन पार पडणार आहे. काय भावना आहेत आपल्या?
अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर, या साहित्य संमेलनातून फारसे काही निष्पन्न होते, असे मला वाटत नाही. आपण आपल्या साहित्य संमेलनापासून युवापिढीला दूर ठेवतो. या साहित्य संमेलनात युवापिढीला जास्तीत जास्त वाव मिळायला हवा. आपण बर्याचदा त्याच त्याच राजकारणात, कार्यक्रमांत अडकून बसतो. यात आता नावीन्य शोधण्याची गरज आहे, असे मला वाटते.
- साहित्यातील पुढील वाटचालीविषयी काय सांगाल?
अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी काही ठरवून लेखक झालेला नाही. मला लेखक म्हणून लोक ओळखायला लागले. माझ्या वाचनामुळे माझे लेखन समृद्ध झाले. माझ्या वाचनात अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी आल्या. माझे पुढचे पुस्तक ‘गांधी आणि रेल्वे’ लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी रेल्वेचा वापर कसा केला, गांधीजी आणि रेल्वे यांचे नाते सांगणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या कुंचल्यातून साकारले आहे. लवकरच हा नवीन प्रवास वाचकांच्या भेटीला येणार आहे.