आधार देणारे ‘वादळाचे किनारे!’

    15-Feb-2025   
Total Views |
 
Dr. Anand Nadkarni
 
 
 
समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ या भूमिकेत भेटणारे डॉ. आनंद नाडकर्णी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे. मानसिक आरोग्याविषयी सोप्या शब्दांत जनजागृती करणे, हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य. व्यसनाधीनतेचा पीडितांच्या मुलांवर काय परिणाम होतो, याचा वेध घेणारे त्यांचे पुस्तक ‘वादळाचे किनारे’ अत्यंत लोकप्रिय ठरले. सदर मुलाखतीमध्ये या पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
 
  • आनंदजी, सर्वप्रथम बालसाहित्य विभागासाठी आपल्या ‘वादळाचे किनारे’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ‘ना. धो. ताम्हणकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे, त्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. आपल्या काय भावना आहेत?
 
‘वादळाचे किनारे’ या पुस्तकाला मिळालेले यश हे खरे तर ‘मुक्तांगण’च्या कार्याला मिळालेले यश आहे, असे मी मानतो. मागच्या ३८  वर्षांपासून ‘मुक्तांगण’शी मी जोडला गेलो आहे. व्यसनाधीनता या समस्येशी झुंजणार्‍या लोकांशी मी संपर्कात आलो. व्यसनाधीनता ही संकल्पना जशी एका व्यक्तीची असते, तितकीच ती त्याच्या कुटुंबातील त्याच्या बायकोची, आईची, बहिणीची आणि विशेषतः मुलांची असते. व्यसनाधीनतेच्या वादळाचा जसा त्या व्यक्तीवर परिणाम होतो, तसाच तो परिणाम निर्दोष मुलांवरसुद्धा होत असतो. ही मुले खर्‍या अर्थाने असतात, ‘वादळाचे किनारे.’ ‘मुक्तांगण’मध्ये काम करत असताना व्यसनाधीनतेने पीडित असलेल्या कुटुंबासोबत आम्ही काम करत असतो. पण, यातील एक गट मात्र दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे या मुलांचा. या मुलांसाठी ‘अंकुर’ हा आधारगट आम्ही तयार केला. गेली अनेक वर्षे आम्ही या मुलांसोबत काम करतो. ज्यावेळी या मुलांशी आम्ही संवाद साधला, त्यावेळी या मुलांनी आमच्या मनात घर केले. ‘विज्ञान’ विषयाचे प्रबोधन करणारे प्रचारक एकदा आमच्या कार्यक्रमात आले होते. त्यावेळेस बोलताना ते म्हणाले की, ‘मुक्तांगण’चे काम सचित्र पुस्तकांद्वारे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. या कल्पनेने माझ्या मनामध्ये घर केले. ‘गोष्टी’ हा मानवी संवादाचा पुरातन धागा आहे. त्यामुळे गोष्टी रूपात आपण या मुलांचे जग मांडले पाहिजे, असा विचार पक्का झाला.
 
  • पीडितापर्यंत आणि त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा आपला हेतू यशस्वी झाला का?
 
‘अंकुर’च्या माध्यमातून चालणारे काम ही निरंतर प्रक्रिया आहे, असे मला वाटते. या प्रक्रियेच्या अनेक टप्प्यांमध्ये आम्हाला यश मिळत गेले. व्यसनाधीनतेमधून बाहेर पडत असताना, पीडितांना सकारात्मक गोष्टींचा आधार हवा असतो. ‘वादळाचे किनारे’ या पुस्तकामुळे त्यांना तो आधार मिळाला, असे मला वाटते. मुलांच्या नजरेतून व्यसनाधीनतेचे प्रश्न मांडले गेले. यामुळे एक वेगळा दृष्टिकोन आपण समाजासमोर ठेवला. पुस्तके ही वाचकाला दिशादर्शक असतात. त्यांच्यासमोर एक नवा विचार ठेवून पुस्तके प्रबोधन करतात. ‘वादळाचे किनारे’ यामुळे आजपर्यंत अनेक कुटुंबीयांना आधार मिळाला, हेच या पुस्तकाचे यश आहे.
 
  • आपण मुलांच्या नजरेतून व्यसनमुक्तीचे भावविश्व कसे उलगडले?
 
मला असे वाटते की, मी खर्‍या मुलांचे जगणेच गोष्टींच्या रूपात मांडत गेलो. त्यामुळे या मुलांच्या वेदना, संवेदना, त्यांचा संपूर्ण प्रवास मला अवगत होता. त्यांची ही अनुभूती मी कागदावर मांडत गेलो. त्यामुळे ही पात्रं मला दिसत गेली. वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, भौगोलिक गटांतील मुलांचे जीवनचित्र मी रेखाटले. यातील प्रत्येक मुलाचे भावविश्व वेगळे आहे. त्यांच्यासमोर येणार्‍या अडचणी, आव्हाने वेगळी आहेत. एकप्रकारे मी या मुलांच्या जीवनातील पटकथाच लिहीत होतो, असे म्हणायला हरकत नाही.
 
  • ‘वादळाचे किनारे’ला मिळालेल्या यशानंतर आपला पुढचा उपक्रम काय असणार?
 
मरठीतल्या काही वृत्तपत्रांमध्ये गेल्या काही काळापासून माझे स्तंभलेखन व सदरलेखन सुरू आहे. त्या लेखांचे पुस्तक लवकरच बाजारात येणार आहे. त्याचबरोबर ‘वादळाचे किनारे’ या पुस्तकातील लेखांवर आधारित आम्ही सहा लघुपटसुद्धा काढणार आहोत. दृक्श्राव्य माध्यमातून कुठलाही विषय अत्यंत प्रभावीपणे लोकांच्या समोर पोहोचवता येतो. त्याचबरोबर मी एक दोन अंकी इंग्रजी नाटक लिहीत असून लवकरच ते रंगभूमीवर येणार आहे.
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.