स्वीडनचे दु:ख...

    14-Feb-2025   
Total Views |

sweden
 
पूर्वाश्रमीची इराणी नागरिक आणि आताची स्वीडनची नागरिक असलेल्या लीना इशाक या महिलेला स्वीडनमध्ये नुकतीच १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तिने एका याझिदी महिलेला आणि तिच्या सहा मुलांना गुलाम बनवले होते. त्यांच्याकडून जबरदस्तीने इस्लाम कबूल करवून, ती सगळी कामे करून घेत होती. त्या सगळ्यांना तिने बंदी बनवले होते. भयंकर! ‘इसिस’मधल्या पुरुषांनी याझिदी समाजावर अत्यंत क्रूर, अमानवी अत्याचार केले, नरसंहार केला आणि ‘इसिस’मध्ये सामील असलेल्या महिला दहशतवादीही तशाच!
 
त्यापैकीच एक लीना इशाक. धर्मांतरण केल्यावर ‘इसिस’मध्ये भरती होण्यासाठी ती सीरियाला गेली. नंतर ती स्वीडनमध्ये आली. तिने तिच्या १२ वर्षांच्या मुलाला दहशतवादी कारवाया करण्यासाठी ‘इसिस’मध्ये भरती केले. तो मुलगा वयाच्या १६व्या वर्षी एका हल्ल्यात मेला. पण, लीनाची क्रूरता संपली नाही. ‘इसिस’ने छळ करण्यासाठी, अत्याचार करण्यासाठी पकडलेल्या, गुलाम बनवलेल्या याझिदी लोकांमधील एका महिलेला आणि तिच्या सहा मुलांना लीनाने गुलाम बनवले. अल्पवयीन मुलाला दहशतवादी संघटनेत भरती केले, म्हणून लीनाला सहा वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर पुन्हा याझिदी महिला मुलांना गुलाम बनवले, म्हणून १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. लीना इतकी धर्मांध कशी आणि का झाली असेल की, तिने स्वत:च्या मुलालाही ‘इसिस’मध्ये भरती केले? तिच्यासारख्याच स्त्री असलेल्या एका याझिदी महिलेला गुलाम बनवताना लीना इशाकला जराही वाईट वाटले नाही का? जगाला इस्लाममय करू इच्छिणार्‍या या दहशतवादी संघटना बॉम्बस्फोट, आत्मघातकी हल्ले करतात. पण, त्याहीपेक्षा भयंकर आहे ते म्हणजे, माणसाला धर्मांतरित करून त्यांची मानसिकता इतकी अमानवी, क्रूर बनवणे. ख्रिश्चन लीना ते धर्मांतरित लीना इशाक ही याचेच उदाहरण आहे.
 
असो. साधारण २०१३ ते २०१४ या काळात स्वीडनमधून ३०० लोक ‘इसिस’मध्ये भरती व्हायला गेले होते. त्यामध्ये एक चतुर्थांश महिलाही होत्या. अल्लाचे, इस्लामचे राज्य स्थापन करावे, ‘शरिया’ जगभर लागू व्हावा, हे ‘इसिस’चे लक्ष्य. ते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी हे ३०० जण गेले होते. त्यातले बहुसंख्य लोक हे स्वीडनमध्ये शरणार्थी म्हणून आलेले इतर मुस्लीम देशातील लोक होते. पूर्व युगोस्लाव्हिया, सीरिया, अफगाणिस्तान, सोमालिया, इराण आणि इराकमधून जीवाच्या भीतीने पळून आलेले आणि स्वीडनचा आसरा घेतलेले हे लोक. पुरोगामी आणि विरळ लोकसंख्या असलेल्या स्वीडनने या मुस्लीम शरणार्थींचे स्वागत केले. मानवता, करुणा वगैरे संकल्पनांचे राग आळवले. या शरणार्थ्यांचा जीव वाचला. आयुष्यात कधी नव्हे ते स्थैर्य आले. मग या शरणार्थ्यांना त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे, स्वीडनला इस्लाममय बनवण्याचे स्वप्न पडू लागले. स्वीडनने आसरा दिला म्हणून त्यांनी स्वीडनची संस्कृती स्वीकारली नव्हती. त्यांच्या वाळवंटी देशाची धर्मसंस्कृती त्यांनी आणखीन कट्टरतेने जोपासली होती. गोळीबार, हिंसा, धार्मिक उन्माद हा त्यांचा खेळ त्यांनी सुरू केला. गेल्याच आठवड्यात एका शाळेमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यात दहा लोक मृत्युमुखी पडले. गुन्हेगार हा सीरियन वंशाचा आहे. एका अहवालानुसार, स्वीडनमधल्या शरणार्थींपैकी ९० टक्के लोकांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. स्वीडनमध्ये दररोज कुठे ना कुठे बॉम्बस्फोट होतो. त्यामुळे दररोजची घटना म्हणून इथली प्रसारमाध्यमे या बॉम्बस्फोटाची दखलही घेत नाहीत.
 
नुकतेच स्वीडन प्रशासनाने जाहीर केले की, स्टॉकहोम येथील ‘इमाम अली इस्लामिक सेंटर’मध्ये इराणसाठी हेरगिरी केली जाते. या आणि अशा दररोजच्याच अनेक घटनांमुळे मागेच स्वीडनने योजनाही जाहीर केली की, शरणार्थी म्हणून आलेल्या लोकांनी २०२६ साली स्वीडन देश सोडला, तर त्यांना सरकार ३ लाख, ५० हजार स्वीडिश क्रोनर (रु) देईल. पण, स्वीडनलाच इस्लामिक राष्ट्र बनवायचे अशी इच्छा असलेले शरणार्थी सहजासहजी स्वीडन सोडणारच नाहीत. लीना इशाकच्या निमित्ताने स्वीडनचे हे वास्तव समोर येते ते म्हणजे, धर्मांधांच्या दहशतवादाने दु:खी झालेला स्वीडन देश. पण, जगाच्या पाठीवर स्वीडन काही एकटाच हा त्रास सहन करत नाही. कारण, दहशतवादाने धर्मांध झालेली असंख्य लोक स्वीडनमध्ये नाही, तर जगभरात असतील. स्वीडनचे दु:ख आपण भारतीय समजूच शकतो.
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.