ही विकृती ठेचायलाच हवी!

    13-Feb-2025   
Total Views |

Ranveer allahbadiya
 
जगात काय पवित्र, काय अपवित्र याची व्याख्या करणे सोपे नाही. मात्र, पशू आणि माणूस यांतील महत्त्वाचा भेद आहे, तो म्हणजे अपवाद वगळता पशूला नात्यांची ओळख राहात नाही. त्यांच्यासाठी जन्म देणारे माता-पिता कालांतराने नर-मादीच असतात. पण, माणसाचे तसे नाही. नातेसंबंधांचे पावित्र्य आणि नीती तो जपतो.म्हणूनच तर तो माणूस आहे, पशू नाही. या परिक्षेपात रणवीर अलाहाबादिया याने मातापिता आणि लैंगिक संबंध यावरून विचारलेला छिछोर प्रश्न म्हणजे मानवी मूल्य, पावित्र्याची विटंबना करणाराच. त्याच्या विधानाचा अतिशय कठोरपणे समाचार घ्यायलाच हवा.
 
लैंगिक संबंध, शारीरिक व्यंग, कमतरता यांवर गलिच्छ भाषेत विधान करणे, हे खरे तर कोणत्याही संस्कृतीत स्वीकारार्ह नाही. मात्र, तरीही लैंगिकतेवर आधारित द्वयर्थी वक्तव्य किंवा थेट वक्तव्य यांचा आधार घेत समाजमाध्यमांवर रिल्स, पॉडकॉस्ट बनवणारे खूपच आहेत. अतिशय गंभीर म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाला आवडून घेणारेही लोक मोठ्या संख्येने आहेत. या सगळ्याचा कडेलोट मात्र रणवीरने केला. ही मानसिकता कुठून येते, याचाही शोध घेणे गरजेचे आहे. त्याने केलेले विधान हे त्याचे सार्वजनिक विधान नसते आणि ते वैयक्तिक स्तरावरचे असते, तरीसुद्धा ते भयंकरच. ही मानसिकता ठेचायलाच हवी! कारण, आज जर या सगळ्याला समाजमनाने ‘जाऊ दे, सोडून देऊ’ म्हणत गांभीर्याने घेतले नाही, तर यापुढे असे अनेक रणवीर आणि अनेक पॉडकॉस्ट, अनेक रिल्स आणि साहित्य तयार होईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर असेच धंदे होतच राहतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. दुसरीकडे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बहुतेक सगळ्याच वयाची माणसे दिसतील, जी सहजपणे एकमेकांना शिव्या देऊन हाक मारतात. उठसूट लैंगिक, सूचक बोलणे, एखाद्याशी बोलताना सहजच आईबहिणीवरून गलिच्छ शिवीगाळ करून बोलणे, हे समाजात चलनच झाले आहे, असे दृश्य आहे. एखाद्याच्या आईबहिणीबद्दल आक्षेपार्ह बोलत आहोत, याचे भान ना त्या बोलणार्‍याला, ना ते एकणार्‍याला असते. रणवीर अलाहाबादियाला शासन व्हावे, यासाठी समाज एकवटला, हे योग्यच. त्याचप्रमाणे, गलिच्छ, आक्षेपार्ह, लज्जास्पद लिंगार्थी, लैंगिक शब्द वापरणार्‍यांविरोधातही समाजाने एकत्र यायला हवे. हीसुद्धा विकृती आहे. ही विकृती वेळीच ठेचायला हवी!!!
 
 
 
शून्याचा महिमा
 
 
 
‘आपल्याला शून्य खूप आवडतो,’ असे ते म्हणत आहेत. आपल्याला शून्य आवडत नसेल, पण शून्याला आपण आवडतो, असे वाटते ममा. बघ ना, सगळ्या निवडणुकीमध्ये आपण शून्य होत चाललो आहोत. आसेतु हिमालय आपला पक्ष आणि आपण शून्य होणार आहोत का गं? शून्य झालो, तरी आपण विसरायचे नाही की आपण या भारतीयांवर इतकी वर्षे राज्य केले. वंशपरंपरागत सत्ता भोगली. हो, मी हे कधीही विसरत नाही बघ. तू राजमाता आणि मी राजकुमार. त्यामुळे मी आपले जे काही कार्यकर्ते उरले आहेत, त्यांना सांगणार आहे, काहीही झाले, तरी हम नही सुधरेंगे।
 
‘मोहब्बत की दुकान’च्या नावाखाली जातीपातीचे राजकारण करणारच! मला माहीत आहे, माझे पणजोबा म्हणाले होते की, ते अपघाताने हिंदू आहेत म्हणून! पण, आता या ‘इंडिया स्टेट’चे लोक जागे झाले आहेत. त्यांना धर्मबिर्म कळायला लागला ममा. त्यामुळे हिंदू धर्माच्या विरोधात आता उघड बोलू शकत नाही आपण. पण, त्या लोकांच्या श्रद्धा, त्यांचे प्रेरणास्थान याविषयी तर आपण बोलूच शकतो. त्यामुळेच तर मी सावरकरांबद्दल बोलत राहतो. आता लोक याला भुंकत राहतो, असेपण म्हणतात ममा. ‘लेट इट बी.’ मला वाटतं, लोकांना मी काय बोलतो, ते आवडत असेल. पण, ते खोटं असावे ममा. कारण, सगळीकडे आपल्याला हरावे लागले आहे. लोकांना नेमकं काय आवडतं काही कळत नाही. ते कळावे म्हणून मी कसल्या कसल्या यात्रा केल्या! पण, त्या यात्रांमुळेही आपल्या पराजयाची वरात काही थांबली नाही. ममा, लोक काहीही म्हणू देत की, आपल्याला शून्य मिळाले, शून्य मिळाले. पण, त्यांना म्हणावे, शून्याची ताकद केवढी मोठी असते, शून्य ज्याच्यासोबत उभा राहतो, त्याची किंमत वाढवतो. ममा, आपण ज्यांच्यासोबत उभे राहिलो, त्यांची ताकद वाढली असेल का गं? शरद अंकल आणि उबाठा ब्रदर्स, अखिलेश ब्रदर्स, माया आंटी, केजरी अंकल या सगळ्यांना विचारायला हवे. ममता आंटी आता ‘झिरो’ मिळवण्याच्या वेटिंगमध्ये आहेत ना? त्यांना नाही विचारणार. ममा, हे कोण म्हणाले की शून्य सहभावना, शून्य स्नेह, शून्य लोककल्याण, शून्य लोकनिष्ठा या शून्यभावनेने आपण सगळे एकमेकांशी शून्याने बांधलो आहोत. हाच तर आहे, शून्याचा महिमा!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.