वडिलांचे स्वप्न अधुरे राहू नये, यासाठी त्यांच्या पश्चात, त्यांच्या कार्याची धुरा सांभाळणारे कल्पेश गांगोडा यांच्याविषयी...
डहाणू तालुक्यातील बांधघर हे गाव शहरापासून तसे लांब म्हणजे, अगदी डोंगराळ भागात. या गावात ’आदिवासी उन्नती मंडळ’ ही संस्था गेली दहा वर्षे जनजाती मुलांसाठी कार्यरत आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष कै. सुरेश गांगोडा यांनी ही संस्था, जनजाती मुलांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने स्थापन केली. आज ते हयात नाहीत, मात्र त्यांचा मुलगा कल्पेश सुरेश गांगोडा त्यांच्या पश्चात हा संपूर्ण डोलारा सांभाळतो आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही, केवळ वडिलांनी सुरु केलेले हे समाजकार्य थांबू नये, परिसरातील जनजातींच्या मुलांचे भविष्य पुन्हा पूर्वीसारखे धोक्यात येऊ नये म्हणून, मोठ्या जिद्दीने आपल्या सहकार्यांसह हा जगन्नाथाचा रथ पुढे घेऊन जात आहे.
कल्पेश गांगोडा यांचा जन्म बांधघर गावचाच असून, एमएससी, बी. एड. पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केलेे. घरी सध्या आई व धाकटी बहीण असा परिवार. वडीलांचे २०२१ मध्ये एका अपघातात निधन झाले. वडील सुरेश गांगोडा यांना पूर्वीपासूनच समाजकार्य करण्याची आवड होती. त्यामुळे त्यांनी शिक्षण सेवेच्या माध्यमातून समाजकार्य करण्याचे ठरवले. त्यांची जनजाती समाजाप्रती असलेली तळमळ पाहून, कल्पेश यांना आपल्या वडिलांचा कायम अभिमान वाटायचा. दुर्दैवाने सुरेश गांगोडा यांचा २०२१ दरम्यान पालघरहून घरी परतताना अपघात झाला. त्यात त्यांना देवाज्ञा झाली. वडिलांच्या जाण्याने या संस्थेवरचे मायेचे छप्परच हरवले. वडिलांनी पाहिलेले स्वप्न, असे अर्धवट सोडून चालणार नव्हते. त्यामुळे कल्पेश यांनी ते कार्य पुढे नेण्याचा निर्धार केला आणि आज समर्थपणे, ते यात रुजू झाले आहेत.
बांधघर हा डहाणूतील अतिदुर्गम भाग असल्यामुळे, या ठिकाणी रोजगार उपलब्ध नाही. येथील विद्यार्थ्यांनाही आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे, शिक्षण घेण्यामध्ये पैसे आणि वाहतूक या दोन्ही गोष्टींमुळे खूप अडचणी येते होत्या. या सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, कै. सुरेश गांगोडा यांनी ’आदिवासी उन्नती मंडळ’ची स्थापना केली. संस्थेतील विद्यार्थी इयत्ता दहावी पर्यंत आश्रमशाळेच्या किंवा संस्थेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होते. परंतु, दहावी नंतर आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना गावापासून लांब असलेले उच्च माध्यमिक शिक्षण घेणे, कठीण जात होते. या कारणास्तव बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याने, उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय करण्याशिवाय पर्याय नव्हता. ही अडचण सुरेश गांगोडा यांनी ओळखली. त्यांनी दि. २३ मे २०१७ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांचे स्वयंअर्थसाहाय्यित तत्वावर, कनिष्ठ महाविद्यालय सुरु केले. त्यावेळेस कै. सुरेश गांगोडा हे डोंबिवली नागरी सहकारी बँक, तलासरी येथे नोकरी करत होते आणि कल्पेश यांच्या आई आरोग्य विभागात नोकरी करत होत्या. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयाच्या बांधकामासाठी आपल्याकडील, आर्थिक पुंजी ओतली. या दरम्यान डहाणूचे घर विकायचीही वेळ आली, त्यांनी दागिने गहाण ठेवून महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. गरजू जनजाती विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कुठलीच त्रुटी येऊ नये, हाच त्यांचा मुख्य हेतू होता.
दूर खेड्यापाड्यातून येणार्या विद्यार्थ्यांचा आर्थिकदृष्ट्या विचार करता, सन २०१७-१८ दरम्यान मुलांचे वसतिगृह सुरु केले होते. वर्षभर ते चालले, अगदी धान्याचे कोठार देखील रिकामे केले. मात्र, अर्थसाहाय्य कमी पडल्यामुळे, दुसर्या वर्षापासून वसतिगृह बंद पडले. दरम्यान २०१७-१८ मध्ये आलेल्या वादळामुळे, संपूर्ण महाविद्यालयाचे छत उडाले. लाईट फिटिंग, पंखे, फळे, बाकडे सर्वांची नासधूस झाली. उरल्या फक्त चिरा गेलेल्या भिंती. पुढे लगेच कोरोनाही आल्याने, परिसरातील परिस्थिती आणखी बिघडत गेली. अशा काळात मुलांनी आपले शिक्षण अर्ध्यात सोडू नये म्हणून, सुरेश गांगोडांनी मुलांकडे जास्त लक्ष देण्यासाठी आणि संस्थेच्या विकासासाठी अधिकाधिक वेळ मिळावा म्हणून, आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. आणि पूर्णपणे स्वत:ला त्यांनी या सेवाकार्यात वाहून घेतले. कल्पेशसुद्धा त्यांच्या बरोबरीने हे सर्व अगदी जवळून पाहत होते. जमेल तसा हातभार ते पूर्वीपासूनच लावत होते.
वडिलांच्या निधनानंतर आज कल्पेश ’आदिवासी उन्नती मंडळा’चा कारभार सांभाळत आहेत. आज साधारण ३५० ते ३७० विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होत असली तरी, ही संस्था फारशी प्रकाशझोतात आली नाही. आज महाविद्यालयात होणार्या अनेक उपक्रमांमुळे विद्यार्थी कला, क्रीडा या क्षेत्रातही पुढे जात आहेत. येथील बहुतांश जनजाती विद्यार्थी, प्रथम श्रेणीतून उत्तीर्णही झाले आहेत. कल्पेश म्हणतात, ”एखाद्या दुर्गम गावात जनजाती मुलांसाठी सुरु झालेला जगन्नाथाचा रथ ओढण्यात, समाजानेही आपला खारीचा वाटा उचलण्याची आज खरी आवश्यकता आहे.” त्यामुळेच कल्पेश समाजाला आवाहन करताना सांगतात की , बांधघर महाविद्यालया करिता मदतीचा हात पुढे करावा. बांधघरचे उदाहरण हे प्रातिनिधीक स्वरुपातील आहे. परंतु, इतर भागातही असे समाजकार्य करणारे अनेक आहेत, जे जनजातींच्या विकासासाठी आपले सर्वस्व अर्पण करून झटत आहेत. त्यांचेही कार्य प्रकाशझोतात आणण्याची आज खरी गरज आहे. कल्पेश यांच्या या कार्याला दै.”मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!