उद्धव ठाकरेंच्या मुखातून संजय राऊतांची भाषा बाहेर पडू लागली आहे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे वाळवी आहे. जेथे जाईल, तेथे पोखरायला सुरुवात करतो,” असे निर्लज्ज विधान त्यांनी नुकतेच केले. राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर सातत्यपूर्ण पराभवामुळे आलेल्या राजकीय वैफल्यातून त्यांनी हे विधान केले असावे. पण, आपण कोणाविषयी बोलतो आहोत, याचे भान ठाकरेंनी बाळगायलाच हवे. बरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घसरण्याची ही त्यांची पहिली वेळ नव्हे. कोणत्याही निवडणुकीत भाजपने वरचढ कामगिरी केली की, उद्धवरावांचा संघद्वेष उफाळून येतो. सरसंघचालकांवर खालच्या पातळीत टीका करणे, धर्मपालक हिंदुत्ववाद्यांना गोमुत्रधारी म्हणणे, भगव्या ध्वजाला ‘फडक्या’ची उपमा देणे, असे पातक उद्धव ठाकरेंनी यापूर्वीही केलेच. आता संघाला ‘वाळवी’ संबोधून मात्र त्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.
वास्तविक, ज्यांनी २५ वर्षे मुंबई पालिका अक्षरक्षः पोखरून खाल्ली, त्यांनी संघाला वाळवी म्हणणे हेच मुळी हास्यास्पद! संघाकडे बोट दाखवताना त्यांनी आधी स्वतःच्या घरात डोकावले पाहिजे. गिरण्या बंद पाडल्या, सर्वसामान्य मराठी माणसाला मुंबईबाहेर हाकलले, विकासकांच्या घशात मोक्याच्या जागा घातल्या, हे पाप कुणाचे? त्याही उपर ‘कोरोना’ काळातील लुबाडणूक, ‘कोविड सेंटर’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा, बॉडीबॅग घोटाळा करून मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले. या पैशातून ‘मातोश्री-२’चे इमलेही रचले. तरी ते संघाच्या हिंदुत्वाला वाळवी म्हणत असतील, तर ठाकरेंच्या आधीच कुजलेल्या सडक्या विचारांना वाळवी लागली आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. उद्धव ठाकरे ज्या संघाला दुषणे देत आहेत, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्याप्ती दिवसागणिक वाढतच आहे. पण, खरी वाळवी कोणाला लागली असेल, तर हिंदुत्वद्रोही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला. म्हणूनच की काय, मागच्या तीन वर्षांत शिवसेनेची दोन शकले झाली. हिंदुत्वाला त्यागणार्या पक्षप्रमुखाला नेते, कार्यकर्त्यांनी त्यागले. जे उरले आहेत, ते अल्पावधीतच सीमोल्लंघन करतील. त्यासाठी दसर्याची वाट पाहावी लागणार नाही. मुंबई पालिकेची निवडणूक जाहीर झाली, की उबाठारूपी वाळवीवर जालिम औषध फवारून ते पक्षांतर करतील!
‘देवा’ मला वाचवा!
'काका मला वाचवा’, अशी हाक शनिवारवाड्यात आजही ऐकू येते असे म्हणतात. ‘मातोश्री’मधूनही अलीकडे ‘देवा मला वाचवा’, अशी हाक म्हणे ऐकू येऊ लागली आहे. पण, ती जीव वाचवण्यासाठी नव्हे, तर उबाठा कुटुंबियांकडे राहिलेले एकमेव शासकीय पद शाबूत ठेवण्यासाठी. दादर येथील ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासा’च्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी होऊ नये, यासाठी युवराजांनी देवाभाऊंचा धावा सुरू केल्याचे कळते. पण, दुर्गुण्यांच्या हाकेला धावतील, ते देवाभाऊ कसले? त्यांनी साधी दादही दिली नाही. त्यामुळे अवस्थ झालेल्या युवराजांनी ‘मातोश्री’वरील ‘किचन कॅबिनेट’च्या बैठकीत मोठा राडा केला. शेवटी माजी मंत्री सुभाष देसाईंनी मध्यस्थी करून स्वतः देवाभाऊंकडे शब्द टाकण्याचे आश्वासन दिले, तेव्हा कुठे युवराज शांत झाले. बरे, युवराजांची या पदावरून हकालपट्टीची पार्श्वभूमी तयार करण्यास त्यांचे वडीलच जबाबदार!
लोकसभेत मिळालेल्या यशाने हुरळून जाऊन त्यांनी अनेकांना दुखावले. राज्यात मविआची सत्ता येईल आणि मीच मुख्यमंत्री होईन, अशी स्वप्न पाहणार्या युवराजांच्या पिताश्रींनी बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या उद्घाटनाला चिंधे-मिंध्यांना बोलावणार नाही, अशी बडबोलेगिरीही केली आणि पायावर धोंडा मारून घेतला. तोच धागा पकडून शिवसेनेच्या आमदारांनी युवराज आणि त्यांच्या कुटुंबीयांची स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. तो ठराव मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला. अलीकडच्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती मागवल्याचे कळताच, युवराजांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यात भर म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी दुसर्याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे युवराज म्हणे आणखीच अस्वस्थ झाले. आपल्याला हटवून राज काकांना या खुर्चीवर बसवले जाईल, बाळासाहेबांचे वारसदार म्हणून त्यांना ‘प्रमोट’ केले जाईल, अशी चिंता युवराजांना सतावू लागली. त्यामुळे युवराजाने तातडीने आपले शिलेदार मुख्यमंत्र्यांकडे शिष्टाईसाठी पाठवले. पण, अशा राजकीय वकिलीला किती गांभीर्याने घ्यायचे, हे ज्ञात असलेल्या फडणवीसांनी त्यांना लांबूनच नमस्कार केला. त्यामुळे तूर्त युवराजांना पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा!