संघर्ष होताच पण, त्या संघर्षावर मात करत, स्वतःसोबत समाजाच्या उन्नतीसाठीही कार्यरत ‘आनंदी महिला समूहा’च्या अध्यक्षा गौरी पिंगळे यांच्याविषयी...
“तुम्हांला काही तसा त्रास होता का? त्यामुळेच तर तुमचे लेकरू दिव्यांग जन्माला आले.” असे एक ना अनेक प्रश्न त्या आयाबाया, गौरी यांना विचारत असत. त्यांनी बाळासाठी दाखवलेली कणव, दया तसेच त्यासाठी त्यांच्या पालकांनाच जबाबदार धरणे, या सगळ्यामुळे गौरी यांच्या मनात निराशेने घर केले. आपले बाळ दिव्यांग जन्मले, यात त्या बाळाचा आणि आई म्हणून माझा काय अपराध? बाळाला कुणाचेही टोमणे नकोत आणि सहानुभूतीही नको, या विचारानेच अनेक महिने गौरी यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले. अत्यंत निराशेने त्यांना घेरले. मात्र, एक वेळ अशी आली की, त्यांच्या आत्मविश्वासाने त्यांच्या निराशेवर मात केली. त्यांनी ठरवले की, स्वतःला कोंडून हा प्रश्न संपणार नाही. दिव्यांगांबद्दल अल्पशिक्षितच काय, सुशिक्षितांमध्येही फारशी जागृती नाही. दिव्यांग बाळ जन्माला आले म्हणजे, ते पालकांच्या पापाचे फळ नसते. दिव्यांग व्यक्तीलाही इतर माणसांसारखे परिपूर्ण जगण्याचा हक्क आहे. याबाबत समाजामध्ये जागृती करायचीच, हे गौरी यांनी ठरवले. आज त्याच गौरी या ‘अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, पुणे’ शहराच्या कार्याध्यक्ष आहेत, ‘महाराष्ट्र नागरी दक्षता संघ’ उपाध्यक्ष, महिला कमिटी संस्थापक अध्यक्षा, ‘आनंदी प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा, ‘आनंदी महिला समूहा’च्या अध्यक्षा आहेत. अत्यंत धडाडीची सामाजिक कार्यकर्ती म्हणून त्यांनी लौकिक मिळवला आहे. गौरी यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे, पण सोपा नाही.
सिंहगडाच्या पायथ्याशी धायरी गावात माळी समाजाच्या, वसंतराव आणि वैजयंता बेनके यांच्या सुकन्या गौरी. वसंतराव हे अत्यंत धडाडीचे आणि हरहुन्नरी. त्यांना तीन मुली. मुलीच आहेत मुलगा नाही, म्हणून दुसरे लग्न करावे, यासाठी काही नातेवाईक सातत्याने त्यांना सूचवित. मात्र, वसंतराव म्हणत, “माझ्या मुली कुणापेक्षाही कमी नाहीत.” त्यांनी मुलींना शालेय शिक्षणासोबतच पोहणे आणि कराटे यांचेही प्रशिक्षण दिले. ते मुलींना म्हणत, “तुम्ही खूप शिका. मोठ्या व्हा.” वसंतरावांच्या इच्छेनुसार गौरी यांनी, वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले, तसेच टॅक्सेशनचा डिप्लोमाही केला. हा डिप्लोमा केल्यामुळे, गौरी यांना वसंतरावाच्या टॅक्ससंदर्भातल्या कामात सहकार्य करता आले. पुढे गौरी यांचा विवाह पिंपरी-चिंचवडच्या अक्षय यांच्याशी झाला.
अक्षय आणि गौरी यांचा सुखाचा संसार सुरू झाला. गौरी यांना मातृत्वाची चाहूल लागली. मात्र, गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यातच त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे बाळाच्या सुरक्षिततेसाठी सहाव्या महिन्यातच शस्त्रक्रिया करून, बाळाला जन्म द्यावा लागला. निर्धारित वेळेआधी जन्माला आलेल्या बाळाची स्थिती, अत्यंत नाजूक होती. त्यावेळी गौरी यांनी, रुग्णालयातील इतर आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांची परिस्थिती पाहिली. या महिलांसाठी काहीतरी करायचेच, असे गौरी यांच्या मनात आले. ते 2000 साल होते. सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक विनामूल्य आरोग्यदायी योजना आणि सवलती तेव्हा नव्हत्या.
असो. वर्षभरात कळले की बाळ मूकबधीर दिव्यांग आहे. बाळ सुदृढ असो की दिव्यांग, आईसाठी बाळ ते जीव की प्राण असते. गौरी बाळाच्या संगोपनात पूर्णपणे गुंतल्या. मात्र, समाजात दिव्यांगांबाबत जागृती नसल्याने, लोक त्यांना अनेक प्रश्न विचारत. गौरी निराश झाल्या, पण त्यांनी चंग बांधला की, या सगळ्या आयाबायांमध्ये जागृती करायची. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी, बचतगटांचा आधार घेतला. परिसरातील महिलांचे शेकडा बचतगट तयार केले. स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले. बचतगटांतील महिलांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, म्हणून महिलांना प्रशिक्षण दिले. दिव्यांगत्वासंदर्भातही जागृती केली. जागृती झाल्याने, महिलांना दिव्यंगत्व आणि पालक-बालक यांच्याविषयी संपूर्ण महिती मिळाली. त्यांचे अनेक गैरसमज, भ्रम दूर झाले. मुलाच्या दिव्यांगत्वावर प्रश्न उठवणार्या आयाबाया आता, गौरी यांना आपले प्रमुख मानू लागल्या. एक वर्तुळ पूर्ण झाले होते.
पुढे बचतगटाच्या माध्यमातून उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी, व्यासपीठ मिळत नव्हते. गौरी यांनी मुलाच्या नावाने म्हणजे आनंदच्या नावानुसार ‘आनंदी प्रतिष्ठान समूह’ निर्माण केले. त्याद्वारे बचतगटांचे, महिलांचे एकत्रीकरण केले आणि ‘आनंदी महिला समूहा’च्या माध्यमातून त्यांनी, महिलांनी बनवलेल्या वस्तूंना विक्रीसाठी व्यासपीठ मिळवून दिले. त्यांनी ‘पिंगळे वधु-वरसूचक मंडळा’चीही स्थापना केली. त्या माध्यमातून अनेक अनुरूप वधु-वरांचा मेळ साधून दिला. गौरी यांनी याच काळात, वकिलीचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. शिक्षण घेता घेताच समाजातील उपेक्षित, वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठीही त्या काम करू लागल्या. देहविक्री करणार्या महिलांची सुटका आणि त्यांचे पुनर्वसनाचे कामही त्यांनी केले. व्यसनमुक्ती संदर्भातही त्यांनी, भरीव कामगिरी केली. समाजात जातीय तेढ निर्माण करणार्या विघातक शक्तींच्या विरोधातही त्या लढू लागल्या. कोरोना काळातही त्यांनी उत्तुंग समाजकार्य केले. या अनुषंगाने गौरी यांना अनेक पुरस्कारही प्राप्त आहेत. सर्वच स्तरांवर समाजासाठी काम करणार्या गौरी म्हणतात, “माझ्या आयुष्यात मी जे काही आहे, ते बाबा वसंतराव यांच्यामुळेच. तसेच पती अक्षय हेसुद्धा सामाजिक कार्यात कायम सोबत असतात. यापुढेही मला समाजातील वंचित घटकांसाठी आणि अन्यायग्रस्त व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठीच, कार्य करायचे आहे.” गौरी यांचे विचार, कर्तृत्व पाहिले की वाटते, गौरी झाली कर्तृत्वलक्ष्मी! त्यांचे कर्तृत्व सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे.