जिथे जाऊ, तिथे पराभव पाहू!

    11-Feb-2025   
Total Views | 21

congress
 
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार असलेल्या सोनिया गांधी खडबडून जाग्या झाल्या आहेत. नाताळच्या उत्सवानंतर संसदेत गदारोळाचे विक्रम करत त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने जनतेच्या प्रश्नांना चुना लावलाच. परंतु, मुलाने तर थेट खासदारांना धक्काबुक्की करण्याचे महापातक केले. त्याला जोड म्हणून आता मायलेक दोघेच उरले नाहीत, तर त्यात नवी एन्ट्री झाली आहे, ती थेट वायनाडला जाऊन खासदार झालेल्या प्रियांका गांधींची. काँग्रेस कार्यकर्ते बिचारे त्यांच्यामध्ये इंदिरा गांधींना पाहतात. मात्र, त्याने फार काय होते? मतदार मात्र त्यांच्यामध्ये हुकूमशाहीला प्रोत्साहन देणार्‍या इंदिरा गांधी म्हणूनच पाहतात. त्यामुळे निवडणुकीत सध्या मतदारांचे आणि काँग्रेसचे सूत काही केल्या जुळत नाही. काँग्रेसची अवस्था तशी वाईटाहून वाईट होत असताना, त्यात सोनिया गांधी जाग्या झाल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक असा तिसर्‍यांदा भोपळा पदरात पडल्यानंतरही त्यांना कोणतेही मंथन वा पराभवाची कारणे शोधायची नाहीत. शोधायचे आहेत, ती देशात जातीजातीत तेढ कसा निर्माण होईल, यासाठीचे मुद्दे. आताही सोनिया गांधी यांनी स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच जनगणनेला विलंब झाल्याचे आरोप केले असून, अन्न सुरक्षा कायद्याचा आधार असलेली जनगणना करण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचेही त्या म्हणाल्या.
 
खरं तर २०११ साली झालेली जनगणना २०२१ साली होणे अपेक्षित होते, मात्र कोरोना काळामुळे ती लांबणीवर पडली. माणसे मोजण्यापेक्षा ती वाचवणे या काळात महत्त्वाचे होते. त्यात अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्येही मनुष्यबळ गरजेचे असते. त्यामुळे जनगणना पुढील काळात होणार, हे निश्चित आहे. मात्र, त्यामुळे काँग्रेसला पोटदुखी का होते आहे, हाच खरा प्रश्न. देशभरात ‘जिथे जाऊ, तिथे पराभव पाहू’ अशा स्थितीत काँग्रेस पोहोचलेली असताना त्यांना जणगणनेच्या आधारावर केंद्र सरकारवर टीका करायची आहे. मुद्द्यांच्या आधारावर राजकारण करण्याऐवजी राहुल गांधी दिल्ली निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना यमुनेचे गढूळ पाणी दाखवत होते आणि लोकसभेला हातात हात घालून फिरत होते, त्यामुळे काँग्रेसने शून्यापासून पुढे जावे आणि मग जनगणनेवर बोलावे...
 
 
चेकाळणारा ‘छोटा भाऊ’
 
 
ओरडणे आणि चेकाळणे अशा दोन पद्धतीत आवाज एक असला, तरी संदर्भ बर्‍याचदा वेगळे ठरतात. बॉलिवूडवाले संजूबाबा तुरुंगवारी केल्यानंतर एकदमच शांत झाले. शांत म्हणण्यापेक्षा अडगळीत गेले. यात ते स्वतः गेले की, त्यांना तसे करणे भाग पडले, हा वेगळा विषय. मात्र, तो संजू शांत झाला. मात्र राजकारणातला ‘संजू’ काही केल्या थांबत नाही. ‘विश्वप्रवक्ते’ अशी बिरुदावली असली, तरीही लोकांना त्याचे अप्रूप नाही, ना कौतुक. दिल्लीत भाजपने प्रचंड बहुमत मिळविल्यानंतर तर संजय राऊत पूर्वी ओरडायचे तसे ओरडत नसून आता चेकाळू लागले आहे. महाविकास आघाडीचे सरकार तब्बल २५ वर्षे सत्तेत राहील, अशी भविष्यवाणी करूनही सरकार शाबूत राहण्याऐवजी अख्खा पक्षच फुटला. उबाठा गटाचे राजन साळवी आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा राऊत तोंड उघडतात, तेव्हा उबाठा गटाला गळती लागते. पक्षाची वाताहत होत असताना राऊतांना त्याची काहीही पडलेली नाही. स्वतःच्या पक्षात फक्त २० आमदार असताना ते सध्या तीन राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेसला सल्ले देत सुटलेले आहेत.
 
काँग्रेस हा ‘इंडी’ आघाडीतील ‘बिग ब्रदर’ अर्थात ‘मोठा भाऊ’ आहे. मोठ्या भावाचे काम हे समन्वयाचे आहे. फक्त जागावाटपात मोठा वाटा मागण्याचे काम मोठ्या भावाचे नाही, असे सांगत राऊतांनी थेट काँग्रेसला टोले लगावले. आपण शाब्दिक कोट्या करतो, म्हणे फार काहीतरी जगावेगळे करतो, असा राऊतांचा समज फक्त स्वतःला आणि उबाठा गटाला खुश करण्याइतपत मर्यादित आहे. बाकी इतर त्याकडे फारसे गांभीर्याने पाहतही नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आम्हीच मोठा भाऊ असे ठणकावून ठाकरेंनी सांगितले. मात्र, जागावाटपात ठेंगा मिळाला. उबाठा गटाचे दुखणे हे पुन्हा जागावाटपच. भाजपसोबत युती असतानाही तीच अडचण होती आणि दुसरी चूल मांडूनही अडचण तीच. मग भाजपसोबत आणि महाराष्ट्रासोबत गद्दारी करून उबाठाने मिळवले ते फक्त २० आमदार आणि नऊ खासदार. त्याउलट एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली, मिळवली, वाढवली व टिकवलीसुद्धा. मात्र, बाळासाहेबांचे चिरंजीव असूनही उद्धव यांना सूडाशिवाय दुसरे काही दिसले नाही. स्वतःला जे वाटते ते सांगता येत नाही, तेव्हा राऊत कामाला येतात. काँग्रेसचा राग आता अशापद्धतीने बाहेर पडतो आहे!

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121