गेल्या महिन्याभरात राज्यात ११ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामधील काही मृत्यू हे नैसर्गिक आहेत, काही शिकारीशी संबंधित आहेत, तर काही मृत्यू हे रेल्वे-रस्ते अपघतांमध्ये झालेले आहेत. बहेलिया शिकारीचे जाळेदेखील राज्यातून नुकतेचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील व्याघ्र संवर्धनाला संक्रांत लागल्याचे चित्र दिसत आहे. याविषयीच आढावा घेणारा हा लेख...
महाराष्ट्रात किती वाघ?
‘राष्ट्रीय व्याघ्र गणना, २०२३’नुसार राज्यात ४४४ वाघ आहेत. सर्वाधिक ९७ वाघ हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात, तर त्या खालोखाल ५७ वाघ मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आहेत. नागपूरजवळच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात ४८, नवेगाव-नागझिरा येथे ११, तर बोर प्रकल्पात नऊ वाघांचा अधिवास आहे. अशा प्रकारे व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण २९१ वाघ महाराष्ट्रात आहेत, तर उर्वरित १५३ वाघ हे प्रादेशिक वनक्षेत्रांमध्ये आहेत.
असंरक्षित क्षेत्रामधील वाघ
‘स्टेटस ऑफ टायगर्स कोप्रेडेटर्स अॅण्ड प्रे इन इंडिया’ याच अहवालाच्या माध्यमातून असे दिसून आले आहे की, भारतातील वाघांच्या एकूण संख्येपैकी एक तृतीयांश वाघांचा अधिवास किंवा वावर हा व्याघ्र प्रकल्पाबाहेरील क्षेत्रात आहे. या प्रकारचे निरीक्षण देशातील ५० व्याघ्र प्रकल्पांबाहेरील क्षेत्रांमधून नोंदविण्यात आले आहे. भारतातील वाघांच्या संख्येपैकी एक तृतीयांश वाघ हे वाघांसाठी आरक्षित केलेल्या क्षेत्रामध्ये वास्तव्य करत नसल्याचा अंदाज ’राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण’ (एनटीसीए) आणि ’भारतीय वन्यजीव संस्थान’ने (डब्ल्यूआयआय) कॅमेरा ट्रॅप छायाचित्रांच्या आधारे मांडला आहे. ‘एनटीसीए’ आणि ‘डब्ल्यूआयआय’ने अंदाजित संख्येची गणना करून सांगितले आहे की, उत्तराखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक वनक्षेत्रातील वाघ मोठ्या संख्येने बाहेरील क्षेत्रांमध्ये वावरत आहेत. कॉर्बेट, दुधवा, बांधवगड, पेंच, ताडोबा, मुदूमलाई, नगरहोल, बांदीपूर आणि सत्यमंगलम यांसारख्या व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांचा वावर हा मोठ्या प्रमाणात प्रकल्पाबाहेरील वनक्षेत्रांमध्ये आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाचा विचार केल्यास याठिकाणीदेखील ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’पेक्षा राधानगरी ते तिलारी येथील असंरक्षित वनांमध्ये वाघांचा वावर आहे. महत्त्वाचे म्हणजे वाघांच्या मृत्यूची संख्या ही असंरक्षित क्षेत्रामधून जाणार्या व्याघ्र भ्रमणमार्गामध्ये अधिक आहे.
बहेलियाची दहशत
मध्य प्रदेशातील कटनी येथील बहेलिया जमात ही वाघांसारख्या मोठ्या वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी ओळखली जाते. त्यांना ‘कटनी गँग’ या नावाने ओळखले जाते. मानवी जबड्याचा आकाराचे सापळे तयार करुन ते वाघांच्या शिकारीसाठी वापरतात. या सापळ्यांना ‘बहेलिया सापळा’ म्हणतात. हा सापळा पूर्णपणे लोखंडापासून तयार केलेला असतो. दीड ते दोन फूट साखळीला पुढे चिमटा तयार करण्यात आलेला असतो. वन्यप्राण्याचा पाय पडली की चिमटा सुटून त्यामध्ये प्राण्याचा पाय अडकतो. पाय सोडविण्यासाठी प्राणी जेवढा धडपड करेल, तेवढा चिमटा रुतून घट्ट होत जातो.
शिकारीचे आंतरराष्ट्रीय संबंध
अजितचे कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहार यावरून या टोळीचे बाहेर कनेक्शन असल्याचे समोर आले. त्याआधारे शिलाँग इथून माजी सैनिक लालनेईसंगला अटक करण्यात आली. या शिकारी टोळींकडून वाघाचे अवयव म्यानमारला जातात. तिथून पुढे ते चीनच्या मार्केटमध्ये विकले जातात, अशी माहिती मिळाली आहे. बहेलिया टोळीने यापूर्वी केलेल्या वाघांच्या शिकार प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे देण्यात आला होता. ‘सीबीआय’ने बहेलिया शिकार्यांच्या टोळीला अटक केली होती. त्यावेळीही नेपाळमार्गे वाघांचे अवयव चीनला जात असल्याचे तपासात समोर आले होते.
जीवघेणे रस्ते-रेल्वे मार्ग
२०१९-२४ या वर्षात महाराष्ट्रात २२ वाघांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. गेल्या सहा वर्षांत राज्यात १७२ वाघ दगावले. त्यांपैकी २२ वाघ हे रस्ते अपघातामध्ये दगावले आहेत. वाघ दगावल्याची संख्या ही विदर्भामधील आहे. तसेच, रेल्वे अपघातामध्ये वाघ दगावण्याची संख्याही चिंताजनक आहे. गेल्यावर्षी गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गावर तीन वाघांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला होता. हा रेल्वे मार्ग दक्षिणेला ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प’ आणि ’कान्हळगाव वन्यजीव अभयारण्य’ यांना जोडणार्या व्याघ्र भ्रमणमार्गाला छेदून जातो, तर उत्तरेला ब्रम्हपुरीला जोडणार्या भ्रमणार्गाला छेदतो. त्यामुळे याच भागात वन्यजीवांना रेल्वेच्या धडकेत आपला जीव गमावावा लागतो. याच मार्गिकेवर मध्य प्रदेशमधील बालाघाट-नैनपुरदरम्यान वन्यजीवांच्या सुखकर हालचालींसाठी दहा अंडरपास आणि दोन ओव्हरपास बांधण्यात आले आहेत. म्हणजेच काही ठिकाणी रेल्वे मार्ग उन्नत स्वरुपात बांधण्यात आला आहे, तर काही ठिकाणी रेल्वे मार्गावरुन वन्यजीवांसाठी उन्नत पूल उभारण्यात आला आहे.
बहेलिया पुन्हा सक्रिय
मध्य चांदा विभागाच्या संरक्षित वनांमध्ये वनकर्मचारी गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती शिकारीच्या साहित्यासह आढळली. विचारपूस केल्यानंतर त्याने आपले नाव अजित राजगोंड उर्फ अजित पारधी असे सांगितले. अजित हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्या राहत्या ठिकाणी छापेमारी केल्यावर तिथे शिकारीचे सापळे, वाघाचा दात, हाडाचा तुकडा आणि केस आढळून आले. चौकशीदरम्यान त्याने वाघाची शिकार केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबालाही अटक करण्यात आली आहे. अजित राजगोंड हा वाघाची शिकार करण्यात तरबेज आहे. २०१२ मध्ये विदर्भात एकापाठोपाठ वाघांची शिकार झाली होती. या वाघांच्या शिकारीमागे बहेलिया शिकार्यांची टोळी होती. अजित राजगोंड हा त्यावेळी ‘मोस्ट वॉन्टेड’ होता. त्याला २०१४ मध्ये तिरुपती इथून अटक करण्यात आली होती. शिक्षा पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर मध्य प्रदेश वनविभागानेही त्याला अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. आता पुन्हा तो महाराष्ट्राच्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे.
काय करणे गरजेचे?
राज्य सरकार राज्यातील वाढलेल्या वाघांच्या संख्येचा टेंभा मिरवत असली, तरी व्याघ्र नियोजनामधील काही बाबींकडे यंत्रणेने सपशेल दुर्लक्ष केले आहे. राज्यात असंरक्षित वनांमध्ये किंवा व्याघ्र प्रकल्पाबाहेर अधिवास करणार्या वाघांच्या नियोजनाबाबत कोणत्याही प्रकारचा कृती आराखडा वनविभागाने तयार केलेला नाही. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात जन्मलेला निमवस्यक नर वाघ हा बर्याचदा हद्दीचा शोधात लांबवर प्रवास करतो. या प्रवासात बर्याचदा तो असंरक्षित वनांमधून प्रवास करत निश्चित ठिकाणी जात असतो. अशाप्रकारे वाघ जेव्हा भ्रमणात असतो, त्यावेळी त्याचे नियोजन कसे करावे, यासंदर्भातदेखील प्रमाणभूत कार्यपद्धती (एसओपी) उपलब्ध नाही. व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाणार्या प्रस्तावित रस्ते प्रकल्पात वन्यजीवांच्या सुकर भ्रमणांसाठी उपाययोजना राबवण्यामध्येही सरकार थंडावलेले दिसते. ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाणार्या नागपूर-रत्नागिरी या नव्या रस्त्यावर कोल्हापूरमधीलआंबा येथे कोणत्याही प्रकारचे अंडरपास किंवा ओव्हरपास बांधण्यात आलेले नाहीत. हाच रस्ता ओलांडून राधानगरीमधील ‘टी-१’ आणि ‘टी-२’ हे दोन नर वाघ चांदोली अभयारण्यात गेले आहेत. शिकार्यांच्या बाबतही वनविभागाने सर्तक राहणे आवश्यक आहे. ज्यावेळी अजित जामिनावर बाहेर पडला, तेव्हापासूनच त्याच्यावर करडी नरज ठेवणे गरजेचे होते. जे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांनी केले नाही. परिणामी आता पुन्हा एकदा त्याने वाघाची शिकार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृत्यूमागील कारणे काय?
- राज्यातील वाघांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी वनक्षेत्रामध्ये घट होत आहे.
- असंरक्षित क्षेत्रामध्ये वाढणार्या वाघांच्या संख्येबाबत कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही.
- व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाणार्या रस्ते आणि रेल्वे मार्गावर अंडरपास-ओव्हरपासचा अभाव.
- शिकार्यांचा मागमूस काढण्यासाठी आवश्यक असलेली अपुरी यंत्रणा. व्याघ्र भ्रमणमार्गामधील क्षेत्रांच्या संरक्षणामध्ये असलेले अपुरे नियोजन.