मंदिर मुक्ती आंदोलनाच्या रणनीतीसह विहिंपच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप
10-Feb-2025
Total Views | 16
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Pranyasi Baithak Mahakumbh) प्रयागराजच्या महाकुंभ परिसरात विश्व हिंदू परिषदेच्या तीन दिवसीय केंद्रीय प्रन्यासी मंडल बैठकीचा रविवारी समारोप झाला. या बैठकीत मंदिर मुक्ती आंदोलनाच्या रणनीतीसह विविध विषयांवर गहन चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत मंदिरांना सरकारी नियंत्रणापासून मुक्त करू, असे म्हणत बैठकीतील एका ठरावाद्वारे समाजास आश्वस्त करण्यात आले आहे. बैठकीला उपस्थित देश-विदेशातील ९५० प्रतिनिधींनी याबाबत मोठी रणनिती आखल्याची माहिती विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अॅड. आलोक कुमार यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे दिली.
ते म्हणाले, मंदिर मुक्ती आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते इतर हिंदू संघटनांसह प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असून सरकारने हिंदू मंदिरे पुन्हा हिंदू समाजाच्या ताब्यात द्यावीत. उत्तर भारत आणि दक्षिण भारतात मोठमोठ्या जाहीर सभा घेऊन याबाबत महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात येणार आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक राज्यातील बुद्धिजीवी महानगरांमध्ये बैठका घेतील आणि त्यासाठी व्यापक जनसमर्थन गोळा करतील. ज्या राज्यांमध्ये ही समस्या अधिक तीव्र आहे, त्या राज्यांमध्ये आगामी विधानसभा अधिवेशनादरम्यान विहिंपचे कार्यकर्ते विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सदस्यांना भेटून मंदिर मुक्तीसाठी तेथील राजकीय पक्षांवर दबाव आणतील.
बैठकीत घडलेल्या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, मंदिरांना त्यांचे नियमित कामकाज चालवण्याचे जास्तीत जास्त स्वातंत्र्य असावे यावरही एकमत झाले आहे. मंदिर व्यवस्थापनातील कोणत्याही प्रकारचे बाह्य नियंत्रण यापुढे मान्य होणार नाही. मंदिर मुक्ती आंदोलनात विहिंप फक्त त्या मंदिरांबद्दल बोलत आहोत जे अजूनही सरकारी नियंत्रणात आहेत, इतर मंदिरांशी याचा संबंध नाही. मंदिराचा पैसा हिंदूंच्या कामांसाठीच खर्च केला जावा, असे विहिंपचे स्पष्ट मत आहे. मंदिरांच्या कामकाजात संपूर्ण हिंदू समाजाचा सहभाग असेल आणि मंदिरांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टमध्ये इतरांसह महिला आणि अनुसूचित समुदायांचे प्रतिनिधित्व केले जाईल. मंदिरांचे अर्चक, पुजारी आणि इतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात आणि भत्त्यांमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पगार त्या राज्यासाठी निर्धारित केलेल्या किमान वेतनापेक्षा कमी असणार नाही.
या बैठकीत देशभरातील सर्व प्रांतांव्यतिरिक्त ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, हाँगकाँग, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, थायलंड, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, गयाना अशा अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत युगपुरुष पूज्य स्वामी श्री परमानंद जी महाराज आणि बौद्ध लामा पूज्य श्री चोसफेल ज्योतपा जी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे आणि अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी उपस्थित होते.