मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dr. Krushnagopal on Mahakumbh) प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ परिसरातील सेक्टर १७ मध्ये अखिल भारतीय संत समागम नुकतेच संपन्न झाले. देशभरातील विविध संप्रदाय आणि समाजातील संतांनी दोन दिवसीय संत समागमात 'सामाजिक समरसता' या विषयावर विचारमंथन केले. संपूर्ण देशाला एकतेच्या धाग्यात बांधून ठेवण्याची ताकद महाकुंभात आहे, असे मत यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी व्यक्त केले.
हे वाचलंत का? : योगी आदित्यनाथ यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाने घेतला 'अमृत स्नाना'चा आनंद
उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, महाकुंभ संपूर्ण जगाला अध्यात्माचा संदेश देईल. प्रयागची पवित्र भूमी संपूर्ण हिंदू समाजाला एका धाग्यात बांधण्याचे काम करत आहे. कुंभाच्या माध्यमातून एकता, समता आणि समरसतेचा संदेश देण्याबरोबरच समाजातून भेदभाव नष्ट करण्याची प्रतिज्ञा प्रत्येकाने घ्यावी." दरम्यान व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती आणि विविध संत मंडळी उपस्थित होती.
संत, संघ आणि समाज मिळून भारताला जगात अग्रेसर बनवतील
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल म्हणाले की, सर्वे भवन्तु सुखिनः, वसुधैव कुटुंबकम, विश्व कल्याणाची भावना, हे हिंदुत्व आहे, हे सनातन आहे. भारत हे प्राचीन काळापासून अनादी राष्ट्र आहे. येणारा काळ भारताचा आहे. संत, संघ आणि समाज मिळून भारताला जगात अग्रेसर बनवतील. भारत जगाचे नेतृत्व करू शकतो, असे साऱ्या जगाला वाटू लागले आहे, त्यामुळे जगभरातील शक्ती भारताला कमकुवत करू इच्छित आहेत. त्यामुळे उणिवा दूर करून येत्या १० वर्षात जगाचे नेतृत्व करणारा भारत घडवायचा आहे."