मुंबई (अक्षय मांडवकर) - राज्यात दिवसागणिक वाघांच्या मृत्यूचा आलेख चढत आहे (tiger death in Maharashtra). बुधवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी वर्धामध्ये वाघाच्या मादी बछड्याचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले, तर पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे (tiger death in Maharashtra). या प्रकरणामुळे नववर्षाच्या २२ दिवसांमध्येच ११ वाघांचा मृत्यू झाला आहे. (tiger death in Maharashtra)
बुधवारी सकाळी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वनपरिक्षेत्रामधील गिरड भागात गाडीखाली चिरडलेला छिन्नविच्छिन्न अवस्थेतील वाघाचा मृतदेह आढळला. गेल्या महिन्याभरापासून गिरड, खुरसापार या भागात एक वाघीण आणि तिचे तीन बछडे फिरत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वनकर्मचारी मादी आणि तिच्या बछड्यांवर लक्ष ठेवून होते. येथील शेतकरी वन्यजीवांपासून पिकांची सुरक्षा करण्यासाठी रात्री शेताच्या कुंपनात विजेचा प्रवाह सोडतात. म्हणून विजेच्या धक्क्याने पिल्लांचा मृत्यू होऊ नये म्हणून वन विभागाने महावितरणला त्या भागातील विद्युत पुरवठा रात्री खंडीत करण्याची विनंती केली होती. मादी आणि बछड्यावर लक्ष ठेवण्यासाठी वीस कॅमेरा ट्रॅप देखील लावण्यात आले होते. मात्र, बुधवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील गिरड क्षेत्रात धोंडगाव ते मुनेश्वर नगर दरम्यान वाहनाने चिरडलेला वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह मादीचा अजून तिचे वय अंदाजे चार ते पाच महिन्यांचे आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील पश्चिम पेंचमधील नागलवाडी येथे देखील बुधवारी सकाळी वाघाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह जवळजवळ कुजलेल्या अवस्थेत असल्याने पेंच प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासून राज्यात झालेल्या वाघांच्या मृत्यूची संख्या गंभीर आहे. शिकारामुळे आणि अंडरपास किंवा ओव्हरपास न बांधता तयार केलेले रस्ते आणि रेल्वे मार्गिकेवर वाघांचा मृत्यू होत आहे. खास करुन संरक्षित वनक्षेत्राबाहेर वावरणाऱ्या वाघांचा नाहक बळी जात आहे. एकीकडे राज्यातील वाघांची संख्या वाढत असतानाच त्यांना सामावून घेण्यासाठी वनक्षेत्र मात्र अपुरे आहे. त्यामुळे असंरक्षित क्षेत्रात वाघ स्थलांतर करत असून त्याठिकाणी कायमस्वरुपी अधिवास करत आहेत.
२२ दिवसांत ११ वाघांचा मृत्यू
- २ जानेवारी, २०२५ रोजी ब्रम्हपूरी वन विभागात सिंदेवाहीजवळील लाडबोरी शिवारात नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळून आला होता. या वाघाचे सर्व अवयव शाबूत होते. या वाघाचे वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
- ६ जानेवारी, २०२५ रोजी भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचे चार तुकडे आढळून आले होते. शिकाऱ्यांनी रानटी डुकरांची शिकार करण्याकरिता ११ हजार केव्हीच्या विद्युत तारांवर आकोडा टाकला होता. मात्र, त्यात तीन वर्षीय सुमारे दीडशे किलो वजनाची वाघीण अडकली आणि तिचा तडफडून मृत्यू झाला. शिकारी जेव्हा घटनास्थळावर पोहोचले तेव्हा तिथे भलीमोठी वाघीण फासात अडकून मृत पावल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी आरोपींची भंभेरी उडाली आणि त्यांनी मद्यप्राशन करून वाघिणीची विल्हेवाट लावण्याकरिता तिचे अक्षरश: चार तुकडे केले. या आरोपींना वन विभागाने अटक केली असून त्यांच्यावर न्यायालयीन खटला सुरू आहे.
- ७ जानेवारी, २०२५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन विभागाअंतर्गत उकणी कोळसा खाण परिसरात वाघाचा मृतदेह आढळून आला होता. या वाघाचे दोन मुख्य दात आणि १२ नख गायब होती. त्यामुळे या वाघाची शिकार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
- ८ जानेवारी, २०२५ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पात देवलापार वनपरिक्षेत्रात मादी बछड्याचा मृतदेह आढळून आला होता. हा मृत्यू नैसर्गिक होता.
- ९ जानेवारी, २०२५ रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर झोनमध्ये मादी बछड्याचा मृतदेह आढळून आला होता. या वाघाचे सर्व अवयव सुस्थितीत होते. वाघांच्या लढाईमध्ये हा मृत्यू झाल्याचे अंदाज वर्तवण्यात आला होता.
- १४ जानेवारी, २०२५ गोंदियातील दासगाव वनपरिक्षेत्रामध्ये नर वाघाचा मृतदेह आढळून आला.
- १७ जानेवारी रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळला.
- १९ जानेवारी रोजी बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला.
- २० जानेवारी रोजी ताडोबामध्ये वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळला.
- २२ जानेवारी रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मृतदेह आढळला.
- २२ जानेवारी रोजी वर्धामध्ये रस्ते अपघातात मादी वाघाचा मृत्यू.