मुंबई मेट्रो मार्ग- ४ वडाळा - कासारवडावलीच्या स्थापत्य काम खर्चात १२७४.८० कोटींची लक्षणीय वाढ
22-Jan-2025
Total Views |
मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग-४ ( Mumbai Metro Route 4 ) (वडाळा - कासारवडवली) प्रकल्पामध्ये स्थापत्य कामात झालेली तब्बल १२७४.८० कोटी रुपयांची वाढ आणि ५ वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा मुंबईच्या विकासासाठी मोठा धक्का आहे. आरटीआयच्या माध्यमातून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरता यावर प्रकाश टाकला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती विचारली होती. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने अनिल गलगली यांस सविस्तर माहिती दिली. मुंबई मेट्रो मार्ग- ४ वडाळा - कासारवडावलीचे काम RInfra- ASTALDI आणि CHEC- TPL या कंपनीला १२ एप्रिल २०१८ रोजी देण्यात आले होते. वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग ४ हा ३२.३२ किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. सदर मार्गामध्ये एकूण ३० स्थानके आहेत. सदर काम जुलै २०२१ रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. आता नवीन डेडलाईन ही ऑगस्ट २०२६ अशी आहे.
दंडात्मक कारवाईचा अभाव:
अनिल गलगली यांनी प्रकल्पाच्या खर्च वाढीमुळे आणि वेळेत काम पूर्ण न होण्यामुळे दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे. मुंबई मेट्रो मार्ग- ४ वडाळा - कासारवडावली प्रकल्पाचा स्थापत्य कामाचा अपेक्षित खर्च हा २६३२.२५ कोटी इतका होता. आता यात १२७४.८० कोटींची लक्षणीय वाढ झाली आहे. खर्चात वाढ आणि ५ वर्षांची दिरंगाई लक्षात घेता दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते पण दुर्दैवाने अद्यापही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही.
सदर मार्ग सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवे, मध्य रेल्वे, मोनोरेल, सध्या सुरू असलेला मेट्रो मार्ग २ब(डी एन नगर ते मंडाळे), मेट्रो मार्ग ५ (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग ६ (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर जोडणी प्रदान करेल. तरीसुद्धा अश्या महत्वाच्या प्रकल्पात झालेली दिरंगाई ही मुंबईकरांच्या सेवेच्या दृष्टीने घातक असल्याचे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे. खर्च वाढीबाबत गलगली यांनी सरकारकडे आणि एमएमआरडीएकडे उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली आहे.