साहित्यक्षेत्रातील अखंड ‘ज्योत’

    22-Jan-2025
Total Views | 25
Jyoti Kapile

साहित्यिक, प्रकाशक, समाजसेवक आणि मुक्त पत्रकार अशा विविध भूमिका बजावत देशाची भावी पिढी घडविण्यासाठी अमूल्य योगदान देणार्‍या ज्योती कपिले यांच्याविषयी...

मुलांवर संस्कार करणे म्हणजे, एकाप्रकारे मातीला आकार देण्यासारखेच असते. त्यांच्यावर योग्य वयात, योग्य संस्कार झाले, तरच भविष्यात चांगले नागरिक तयार होऊ शकतात. हेच चांगले नागरिक, ही देशाची खरी संपत्ती असते आणि ही संपत्ती निर्माण करण्यात एक महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे ‘बालसाहित्य.’ हा विचार डोळ्यासमोर ठेवून, ज्योती कपिले यांनी बालसाहित्याची निर्मिती केली. लेखिका किंवा साहित्यिक होणे, हे सुरुवातीला त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. साहित्यिक होण्यासारखे वातावरणही, त्यांच्या घरी फार नव्हते. पण, वाचनाची गोडी आणि सवय मात्र त्यांना लहानपणापासूनच होती. हीच वाचनाची गोडी त्यांना, साहित्यिक होण्याच्या प्रवासापर्यंत घेऊन आली.

ज्योती यांचे शिक्षण ‘अर्थशास्त्र’ विषयात झाले होते. ‘अर्थशास्त्र’ या विषयात पदवी मिळवल्यानंतरही, त्यांनी इच्छा आणि आवड म्हणून पत्रकारिता क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेतले. पत्रकारिता त्यांना त्यांच्या साहित्यिक होण्याच्या प्रवासात खूप मार्गदर्शक ठरली. लग्नापूर्वीही ज्योती यांचे लिखाण, थोड्या अधिक प्रमाणात सुरू होते. पण, त्यांच्या लिखाणाला खरी गती मिळाली ती लग्नानंतर. लग्नानंतर संसाराच्या व्यापात अडकलेल्या अनेक स्त्रियांना, त्यांच्या स्वप्नांना पूर्णविराम द्यावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्योती यांच्या बाबतीत मात्र उलटे घडले. त्यांच्या साहित्यिक होण्याच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली, ती लग्नानंतर. लग्नाच्या वेळी त्यांनी त्यांच्या पतीच्या एका पत्राला, कविता लिहून उत्तर दिले होते. त्यावेळी त्यांच्यातील साहित्यिकेची ओळख त्यांच्या पतीला आणि पर्यायाने, त्यांच्या सगळ्याच घरच्यांना झाली. त्यानंतर त्यांची प्रतिभा खुलत गेली.

लग्नानंतर सुरुवातीला ज्योती कपिले मोठ्यांसाठी, कथा-कविता लिहायच्या. आई झाल्यानंतर, त्यांनी मुलांना ऐकविण्यासाठी गोष्टी, कविता लिहायला सुरुवात केली. एकदा त्यांची पुतणी त्यांच्याकडे राहायला गेली होती. त्यांच्या पुतणीला कथा, कविता यांविषयी माहिती होती. त्यामुळे तिला आणखी काय ऐकवावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यावेळी त्यांना सुचली ती ‘गंमत कोडी.’ पुतणीचे मनोरंजन व्हावे आणि सोबतच तिच्या ज्ञानातही भर पडावी, अशा रीतीने त्यांनी त्या ‘गंमत कोड्याची’ रचना केली होती. हळूहळू त्यांची ती ‘गंमत कोडी’ खूप प्रसिद्ध झाली, वृत्तपत्रांमध्ये ती छापून येऊ लागली. गंमत कोड्यांसोबतच त्यांचे इतरही बालसाहित्य, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले. बालसाहित्याशी संबंधित विपुल लिखाण त्यांनी, विविध माध्यमांमध्ये केले आहे.
वृत्तपत्रीय लिखाणासोबतच त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ‘गंमत कोडी-बालकाव्यकोडी संग्रह’, ‘सांगा लवकर सांगा’, ‘रागोबा नि वाघोबा’ हा बालकाव्य संग्रह, ‘पैचान कौन’, ‘कोडी झाली नाटुकली’, ‘ते आंब्याचे दिवस’, ‘फळाफुलांच्या कविता’, ‘मदतीचा हात’ आणि ‘साथी हाथ बढाना’ इत्यादी बालसाहित्य त्यांनी लिहिले आहे. सोबतच ‘मनमुक्ता’ हा कवितासंग्रह आणि ‘मनभावना’ हा ललितलेख संग्रह, त्यांनी मोठ्यांसाठी लिहिला आहे. ‘सूर्यबाला’ आणि ‘शरद जोशी यांच्या कथा’ हा हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवादही, त्यांनी केलेला आहे. लेखिका म्हणून कार्यरत असताना, प्रकाशन क्षेत्रातही त्यांनी पदार्पण केले. ‘जे. के. मीडिया’ ही स्वत:ची प्रकाशन संस्था, त्यांनी स्थापन केली. या प्रकाशन संस्थेअंतर्गत त्यांनी सुरुवातीला, स्वत:ची आणि नंतर इतरही लेखकांची पुस्तके प्रकाशित केली.

बालसाहित्य विषयक अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली आहे. ‘कोकण मराठी साहित्य परिषद, वांद्रे’ शाखेचे काही काळ त्यांनी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पद भूषविले आहे. ‘लिलाई दिवाळी वार्षिक’ आणि ‘टॉनिक’, ‘चेरीलॅण्ड’ या बालमासिकांच्या त्या माजी उपसंपादक होत्या. ‘बालभारती पाठ्यपुस्तक मंडळा’च्या त्या ‘पूरक वाचक साहित्य सदस्य’ आहेत. तसेच ‘कोकण मराठी साहित्य परिषद’, ‘मराठी वृत्तपत्र लेखक संघ’ आणि ‘नॅशनल लायब्ररी, वांद्रे’ या संस्थांच्या त्या आजीव सभासद आहेत. त्यांच्या बालसाहित्य क्षेत्रातील योगदानासाठी, त्यांना अनेक पुरस्कारांनीसुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. यूट्यूब चॅनल, ब्लॉग्स आणि समाज माध्यमे या आधुनिक माध्यमांच्या मदतीनेही, त्या बालसाहित्य वाचकांसाठी पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

साहित्यासोबतच ज्योती कपिले यांना समाजसेवेचीसुद्धा आवड होती. त्यासाठी ‘ज्योती फाऊंडेशन’ ही संस्था त्यांनी स्थापन केली. या संस्थेच्यावतीने नॅशनल लायब्ररीच्या मदतीने, त्यांनी दर महिन्याला ‘बालकट्टा’ हा उपक्रम चालवला, मुलांसाठी पाककला, रांगोळी वर्ग आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले, त्यांना टपाल खाते, अग्निशमन दल इत्यादीची ओळख करून दिली व असे इतर बरेच उपक्रम राबवले.

“कविता-गोष्टींच्या माध्यमातून घरातील मोठ्या मंडळींनी, लहान मुलांना साहित्याची गोडी लावली पाहिजे, त्यातून त्यांना पुस्तक वाचण्याकडे वळवले पाहिजे,” असे ज्योती यांना वाटते. “सोबतच बालसाहित्य प्रकाशित करणार्‍या प्रकाशकांनी पुस्तकाच्या किमती कमी ठेवल्या पाहिजे, जेणेकरून पालकांना किंवा मुलांना ती विकत घेताना फारशी आर्थिक अडचण येणार आहे,” असे त्यांचे मत आहे. बालसाहित्यक्षेत्रात योगदान देत असताना, अजूनही बालसाहित्यिकांना इतर साहित्यिकांएवढे महत्त्व दिले जात नाही, ही खंत त्यांना वाटते. तरीही या बालसाहित्याच्या माध्यमातून, बालकांवर संस्कार घडवण्याचे त्यांचे कार्य अखंडपणे सुरूच आहे. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे खूप खूप शुभेच्छा!

दिपाली कानसे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121