मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Yogi Adityanath Mahakumbh) उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभात बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसह त्रिवेणी संगमात अमृत स्नान करण्याचा आनंद घेतला. दरम्यान सर्व मंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर गंगाजलाचा वर्षाव करताना दिसले. त्यानंतर सर्वांनी हातात गंगाजल घेऊन सूर्यपूजन केले. विधीमध्ये राज्याच्या समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. राज्य सरकार धर्म आणि संस्कृतीला किती महत्त्व देते, हा संदेश यावेळी देण्यात आला. तत्पूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "संपूर्ण मंत्रीमंडळाच्या वतीने मी महाकुंभासाठी आलेल्या सर्व संत आणि भक्तांचे स्वागत करतो. पहिल्यांदाच संपूर्ण मंत्रीमंडळ महाकुंभात अमृत स्नानासाठी उपस्थित आहे."