जळगाव जिल्ह्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना उघड!

आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. निलम गोऱ्हेंचे निर्देश

    22-Jan-2025
Total Views |

Neelam Gorhe

 
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ऑनर किलिंगची घटना संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवार, २१ जानेवारी रोजी दिले आहेत.
 
जळगाव जिल्ह्यातील पिंप्राळा हुडको इथे राहणाऱ्या २७ वर्षीय मुकेश रमेश शिरसाट या तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार, १९ जानेवारी रोजी घडली. रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी मुकेश शिरसाट आणि पूजा सोनवणे यांचा प्रेमविवाह झाला होता. घटनेच्या दिवशी मृत मुकेश शिरसाटचे पूजाच्या घरच्यांसोबत वाद झाले होते. यावेळी उपस्थित असलेल्या आठ ते नऊ लोकांपैकी एकाने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला आणि यात त्याचा जीव गेला. दरम्यान, याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गंभीर घटनेची दखल घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आरोपीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
हे वाचलंत का? -  केईएम एक हे कुटुंब! रुग्णालयात आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे
 
ऑनर किलिंगची ही घटना संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. हा प्रेमविवाह होऊन चार-पाच वर्ष झाली असून मुकेश शिरसाट आणि त्याच्या सासरची मंडळींसोबत सतत वादविवाद होत असल्याने संबंधित पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांमार्फत या प्रकरणात वेळोवेळी काय कार्यवाही करण्यात आली. तसेच ऑनर किलिंग टाळण्याच्या अनुषंगाने यापूर्वी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागामार्फत काय कार्यवाही करण्यात आली, याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश उपसभापतींनी दिले.
 
मृत मुकेश शिरसाट याच्या कुटुंबाला आवश्यक संरक्षण आणि सुरक्षागृहाची व्यवस्था पुरवण्यात यावी. साक्षीदार संरक्षण कायद्यांतर्गत साक्षीदारास आवश्यक संरक्षण पुरविण्यात यावे. उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी. याप्रकरणी अनुभवी निष्णात सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी. सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून मृत मुकेश शिरसाटच्या कुटुंबास नियमानुसार लाभ देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत समाज प्रबोधन आणि समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.