क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंच्या विचारकार्यापासून प्रेरणा घेऊन समाजकार्य करणार्या, पुण्याच्या रागिणी विजयकुमार लडकत यांच्या विचार आणि कार्याचा घेतलेला हा मागोवा...
रागिणी विजयकुमार लडकत यांचे माहेरचे नाव रागिणी रासकर. पित्याचे नाव वसंतराव, तर आईचे नाव यमुनाबाई. सासवडच्या खळद गावचे हे रासकर कुटुंब अत्यंत पारंपरिक विचारसरणीचे. मुलींनी शिकावे, मात्र नोकरी करण्यासाठी घराबाहेर जाऊ नये असे मत. मात्र, पदवी शिक्षण घेतल्यानंतर, रागिणी यांनी आईबाबांकडे हट्ट केला आणि ब्युटीशियनचा कोर्स केला. पुढे विजयकुमार यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी, रागिणी यांना ‘अॅडव्हान्स ब्युटीशियन मेकअप’चा कोर्स करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या उभयतांना दोन अपत्य.
विजयकुमार लडकत माळी समाजाचे धडाधडीचे व्यक्तिमत्त्व. समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या. ते आकाशवाणीमध्ये वृत्तनिवेदन तसेच, महाविद्यालयामध्ये पाहुणे व्याख्याते म्हणूनही काम करत. ‘मासिक माळी आवाज’ या संस्थेचे ते संस्थापक. या संस्थेच्या माध्यमातून विजयकुमार ‘वधुवर सूचक मंडळ’ चालवायचे. तसेच, माळी समाजाचे मासिकही प्रकाशित करायचे. त्यांची पत्नी रागिणी या उत्तम सुलक्षणी गृहिणी. पतीच्या कष्टाने यश उभे राहताना, रागिणी यांनी कायम साथ दिलेली. मात्र, पतीच्या सामाजिक कार्यात सहसा त्या पुढे कधीच नसत. सगळ ठीकच सुरू होते. मात्र, कोरोनाची महामारी सुरू झाली. त्या महामारीने विजय यांचा बळी घेतला. घर कुटुंबात रमलेल्या रागिणी यांच्यावर दु:खाची कुर्हाड कोसळली. दु:ख, भवितव्याची चिंता, मुलांची काळजी यांनी रागिणी यांना जणू घेरलेच. नाही म्हणायला, विजय यांची ‘मासिक माळी आवाज’ नावाची संस्था होती. महाराष्ट्र भर संस्थेची ११ केंद्र होती. हजारो समाजबांधव या संस्थेशी जोडले गेले होते. त्या संस्थेसाठी, रागिणी यांना काही व्यक्ती भेटायला आल्या. त्या व्यक्ती विजय कुमार यांचे सहकारीच होते. ते रागिणी यांना म्हणाले, “पतीचे निधन झाले. तुम्ही बाई माणूस, तुम्हाला कसे जमणार? तुम्हांला काय कळणार, ही सामाजिक संस्था कशी चालवायची ते? असे करा, ही संस्था आम्ही चालवतो. ‘मासिक’ आणि ‘वधुवर सूचक मंडळ’ही आम्ही चालवतो. जे काही उत्पन्न येईल, त्यातले थोडे पैसे तुम्हाला देत जाऊ. त्यातून तुमच्या दोन मुलांचे शिक्षण तुम्ही करा.” हे ऐकून रागिणी यांच्या मनात, विचारांचा कल्लोळ उठला. त्यांचे मन म्हणत होते, “पतीने प्रचंड संघर्ष आणि कष्ट करत ही संस्था उभी केली होती. त्याद्वारे समाजाच्या हजारो लोकांना संघटित केले. समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि न्यायही मिळवून दिला होता. ही सामाजिक संघटना म्हणजे, पतीच्या कर्तृत्वाची साक्ष होती. त्यांचे निधन झाल्यानंतर, ती संस्था अशी कशी सोडायची? संस्था हातात घेऊन ते लोक आपल्याला विनाकष्ट महिन्याला काही पैसे देतीलही. पण, आपल्या पतीच्या स्मृतींचे काय? स्वाभिमानाचे काय? दुसर्यांच्या जिवावर मुलांना का वाढवायचे?”
त्यांनी निर्णय घेतला. रागिणी यांनी त्या व्यक्तींना सांगितले की, “पतीच्या संस्थेसाठी तुम्ही काम करणार आणि मग तुम्ही त्यातून मला उदरनिर्वाहासाठी पैसे देणार, त्यापेक्षा माझ्या पतीची संस्थेसाठी मी स्वत: काम करेन.” त्यावेळी त्या व्यक्तींना हे अपेक्षित नव्हते. कारण, त्यापूर्वी रागिणी संसारातच यातच पूर्णवेळ लक्ष देत होत्या.सवडीनुसार ब्युटीशियन म्हणून थोडेफार कामही करायच्या. पण, ते काही उत्पन्नाच साधन नव्हते की, ठोस पक्के कामही नव्हते.
स्वाभिमान राखण्यासाठी आणि पतीच्या विचारस्मृतींसाठी, रागिणी यांनी दु:ख आवरले. त्यांनी संस्थेतर्फे चालणारे ‘मासिक माळी आवाज’ या मासिकाचे प्रकाशन ,कोणताही खंड न पडता सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले. विजयकुमार हे स्वत: मासिकाचे संपादन करत आणि मुद्रितसंशोधनही करत. पण, आता हे काम कोण करणार? समाजाची जाण असलेली व्यक्ती, या कामासाठी आवश्यक होती आणि रागिणी यांनी मुद्रितसंशोधन करण्यासाठी एका व्यक्तीला नेमलेही.
मात्र, काम सुरू झाल्यानंतर काहीच दिवसात त्या व्यक्तीचेही निधन झाले. मासिकाचे प्रकाशन होणार की नाही होणार, कसे करायचे? पण, दृढ निश्चय केलेल्या रागिणी जराही डगमगल्या नाहीत. त्यांनी धावपळ करून, दुसरी व्यक्ती शोधून मासिक प्रकाशित केलेच. इतकेच नाही, तर २ हजार, ५०० समाजबांधवांपर्यंत ते मासिक वितरितही केले. इतकेच नाही, तर संस्थेच्या माध्यमातून ‘वधुवर सूचक मंडळा’च्या माध्यमातून, मेळावेही भरवले. त्यातून अनेकांचे संसारही फुलवले. विधवा महिलांचे एकत्रीकरण करणे, गरजू महिलांना सर्वतोपरी सहकार्य करणे अशी कामेही त्यांनी सुरू केली. त्यांनी एकट्या असलेल्या महिलांचा, हळदीकुंकू स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यासही सुरुवात केली. महिला स्वावलंबन, सक्षमीकरण यासाठीही त्यांनी उपक्रम सुरू केले. त्या ‘मॅग्नोलिया’ या समाजाच्या, आंतरराष्ट्रीय ग्रुपच्या सदस्य आहेत. त्या माध्यमातून, जगभरातल्या माळी समाजाच्या भगिनींशी त्यांचा संपर्क संवाद आहे. आज रागिणी विजयकुमार लडकत यांच्या शब्दाला, समाजात वजन आहे, मान आहे. पती निधनानंतर रागिणी यांनी, पतीच्या विचार कर्तृत्वाचा वारसा पुढे चालवला. रागिणी म्हणतात, “प्रत्येक स्त्री ही शक्तिदायिनी आहे. यापुढेही समाज संघटन आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणार आहे. मी सावित्रीआईचा वारसा पुढे चालवणार आहे.” दु:ख, संघर्ष अटळ होता. मात्र, त्या सगळ्यांवर मात करत, स्वत:सोबत समाजाचा उत्कर्ष साधू पाहणार्या रागिणी लडकत या खर्या अर्थाने क्रांतिज्योती सावित्रीामाईंच्या वारसदार आहेत. रागिणी लडकत यांच्या पुढील भविष्यासाठी दै.’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!