स्वस्थ जीवनशैली : ‘आरोग्य भारती’चा प्रमुख आयाम

    21-Jan-2025
Total Views |
Healthy Lifestyle

धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण ‘आरोग्य भारती’च्या उद्दिष्टांबद्दल वाचले असेल, ज्यामध्ये स्वस्थ व्यक्तीला रोगी होण्यापासून वाचविणे हा मुख्य हेतू आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ‘आरोग्य भारती’ने ‘स्वस्थ जीवनशैली’ हा एक महत्त्वाचा आयाम प्रस्थापित केला आहे. त्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊया.

आधुनिक जीवनशैलीत वाढत्या कृत्रिमतेमुळे नैसर्गिक जीवनाचा आधार कमी होत चालला आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि कर्करोग यांसारख्या जीवनशैली आधारित आजारांनी विक्राळ रूप धारण केले आहे. त्यामागची कारणे समजून घेतली पाहिजे.

जीवनशैलीतील बदल आणि त्याचे परिणाम जीवनशैलीतील विसंगती

आज पालकांनी लहानपणी शिकलेले सूर्यास्तानंतर लवकर झोपणे आणि सूर्योदयापूर्वी उठणे, हे तत्त्वच लोप पावत आहे. ‘शिफ्ट ड्युटी’मुळे पालक स्वतःच याचा आदर्श ठेवू शकत नाही. शाळा आणि महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात इतके गुंतवले आहे की, योग्य दिनचर्येचा आदर्श कुणी ठेवत नाही. एडिसनच्या बल्बने रात्री जागण्याची पद्धत वाढवली, तर मोबाईल आणि संगणकाच्या अतिरेकी वापरामुळे निशाचर प्रवृत्ती वाढीस लागली आहे.

प्राकृतिक घड्याळाचे महत्त्व

आपल्या शरीराचे संचालन करणारे हार्मोन्स, मेंदूमध्ये स्थित ‘पीनियल ग्रंथी’ सूर्याच्या प्रकाशाच्या गतीवर अवलंबून असतात. सूर्यप्रकाशाच्या प्रमाणानुसार हार्मोन्स स्त्रवले जातात आणि शरीरातील विविध चयापचय क्रिया घडतात. उजेड आणि अंधार खरे तर आपल्या मेंदूमध्ये स्थित ‘पीनियल ग्रंथी’ला चालना देणारे मुख्य घड्याळ आहे. हे घड्याळ ‘पिट्यूटरी’ नावाच्या प्रमुख अंतःस्त्रावी ग्रंथीला संदेश देऊन विविध हार्मोनचे स्त्राव नियंत्रित करते. त्यानुसार शरीराच्या चयापचय व अन्य गतिविधी होत असतात. अरुणाच्या गतीच्या विरोधात गेले की, ही नैसर्गिक प्रक्रिया विस्कळीत होते. ज्यामुळे स्वास्थ्याला हानी पोहोचते.

दिनचर्या : आरोग्याचा मूलमंत्र

आयुर्वेदात दिनचर्येला विशेष महत्त्व दिले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणते कार्य कसे करावे, याचा सविस्तर उल्लेख आयुर्वेदात आहे. योग्य दिनचर्येचे पालन केल्याने शरीर निरोगी राहते. अनेक आजारांचे मूळ चुकीच्या दिनचर्येत सापडते.
सकाळी उठल्यानंतरच्या सवयी

उठण्याचा योग्य काळ : सूर्योदयापूर्वी दीड ते दोन तास आधी उठावे. या नियमात फक्त रात्री जागावे लागते अशा व्यक्ती, वृद्ध किंवा आजारी असलेल्या व्यक्तींना सूट आहे.

पाणी पिण्याची सवय : उठल्यावर कोमट पाणी प्यावे, यामुळे पचनसंस्था स्वच्छ राहते.

मलविसर्जन : ब्राह्ममुहूर्तावर उठल्याने मलविसर्जन योग्य होते. जे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. योग्य सवयीने अन्नाचे योग्य
पचन होऊन मलविसर्जनाचा नैसर्गिक वेग येतो. मलविसर्जनानंतर गुद प्रक्षालनासाठी कोमट पाणी वापरावे टिश्यू पेपर नाही.

मुखाची स्वच्छता : कडू, तिखट व तुरट रसाने दंतधावन करावे. गोड रसाची टुथपेस्ट योग्य नव्हे. आयुर्वेदाने सुचवलेल्या कडुनिंब, खदिर, वड, बाबूळ यांसारख्या वनस्पतींच्या दातण्या वापराव्यात. आज या वनस्पतींचे चूर्णाचे दंतमंजन उपलब्ध आहेत, ज्या मऊ ब्रशसोबत वापरू शकतो. त्यातील कडू रसाने तोंडातील जंतू नष्ट होतात आणि तुरट रसाने हिरड्या मजबूत होतात. जीभेवर साठलेला मळ, चिकटा साफ करून चूळ भरावी. तोंड स्वच्छ केल्यावर घरातील देवता व वरिष्ठांना नमस्कार करावा. त्यांच्या आशीर्वादाने मानसिक प्रसन्नता व आत्मविश्वास मिळतो. त्यानंतर गण्डूष करावे म्हणजे कोमट पाणी, तेल, तूप, दूध किंवा त्रिफळा, यष्टीमधू सारख्या विविध औषधी काढा तोंडात धरून ठेवा. ज्यामुळे ओठ आणि घसा यांचे आरोग्य चांगले राहाते. मुखाची दुर्गंधी नष्ट होते.

व्यायाम आणि अभ्यंग

अभ्यंग : रोज शक्य नसले, तरी आठवड्यातून एकदा तेल लावून अभ्यंग करावा. यामुळे शरीर पुष्ट होते, त्वचा सतेज होते आणि झोप चांगली लागते.

योग आणि सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार हा सर्वांग व्यायाम आहे, जो शरीर व मनाची ताकद वाढवतो. सूर्यनमस्कार केल्याने शरीर, हृदय व श्वसनतंत्र या सर्वांना उचित चालना मिळते. पायी चालणे, सायकल चालवणे, पोहणे, नृत्य करणे, मैदानावर खेळणे इत्यादी महत्त्वाचे व्यायाम आहेत, ज्याने हृदय स्वस्थ राहाते. अशा प्रकारे हृदयाची तयारी न करता अचानक जिमनेशिय किंवा मेरेथॉन इत्यादी करणे जीवासाठी घातक ठरू शकते.

शवासन आणि प्राणायाम : व्यायामानंतर शवासन आणि प्राणायामाने शरीर शांत होते आणि हृदयगती सामान्य होते.
स्नान आणि स्वच्छता

व्यायामानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन कोमट पाण्याने स्नान करावे. व्यायामानंतर त्वरित थंड पाण्याने आंघोळ केल्याने हृदयावर ताण येऊ शकतो. अंग घासण्यासाठी चंदन, वाळा, दारूहळद, कडूनिंब, कपूर, काचरी, त्रिफळा, मंजिष्ठा इ. द्रव्यांचे उटणे किंवा पपईची सुकलेली साल, मसुराच्या किंवा चण्याच्या डाळीचे पीठ याचा उपयोग साबणपेक्षा अधिक फायदेशीर ठरतो. स्नानाने शरीराची शुद्धी होते. त्वचेचा मळ, मांसपेशींना आलेला थकवा दुर्गंध नष्ट होतो. जास्त गरम पाणी वापरू नये. डोक्यावरून शक्यतो गरम पाण्याने स्नान करू नये. त्याने केस आणि डोळ्यांना हानी होऊ शकते. गरम पाणी खांद्यावरून घ्यावे.
पचन आणि आहार

सकाळी पोटभर, दुपारी तीन-चतुर्थांश, आणि रात्री अर्धपोटी जेवण करावे.

जेवणानंतर वज्रासनात बसल्याने पचनक्रिया सुधारते.

सामाजिक जीवनशैलीचे महत्त्व

मानव हा सामाजिक प्राणी आहे, हे खरे. पण, आजच्या काळात मानव हा समाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याऐवजी आभासी जगात गुंतलेला आहे. जेवण कुटुंब आणि मित्रांसोबत घेणे, सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे, यामुळे मानसिक समाधान मिळते आणि सामाजिक आरोग्य सुधारते.

योग्य प्रवास आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन

शक्य असल्यास कामाच्या ठिकाणी चालत किंवा सार्वजनिक वाहतूक वापरून जावे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि तणाव कमी होईल.

निद्रा : झोपायच्या आधी एक तास तरी स्क्रीनपासून दूर असावे. म्हणजे, ‘पीनियल ग्रंथी’वर प्रकाशझोताचा अपायकारक परिणाम होणार नाही. माणसाच्या वयाप्रमाणे झोपेची आवश्यकता असते. नवजात शिशु १६-१८ तास झोपते, तर वयोवृद्ध व्यक्तीला पाच तासाची झोपही पुरते. सामान्यत: सहा ते आठ तास झोप सामान्य म्हटली जाते.

सायंकाळी शक्य तेवढे लवकर जेवून घ्यावे. रात्री दंतमंजन करून सकाळी उठेपर्यंत काहीही खाऊ-पिऊ नये. त्याने तोंडात रोगाणूंचा प्रसार नियंत्रित राहील. त्यानंतर शतपावली करून मनातील विचारांना दूर सारून नामस्मरण करून शांत पवित्र ठिकाणी झोपावे. झोपण्यासाठी वापरायची शय्या चार इंच जाड, सपाट व सुखकर असावी. पूर्व किंवा दक्षिणेस डोके करून झोपणे उत्तम. पुढल्या सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणे आवश्यक आहे.

आरोग्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन

आयुर्वेद व अर्वाचीन शास्त्राप्रमाणे योग्य जीवनशैलीचा मेळ घातला गेला पाहिजे. स्वस्थ जीवनशैली ही केवळ शरीरासाठीच नव्हे, तर मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठीही महत्त्वाची आहे. या तत्त्वांचे पालन करून आपण आरोग्य भारतीच्या उद्दिष्टांप्रमाणे जीवनशैलीतील शाश्वत आरोग्याकडे वाटचाल करू शकतो.

डॉ. गणेश मु. अ. जोशी (अॅलोपॅथी)
डॉ. हेमंत पराडकर (आयुर्वेद)