ड्रोन तपासणीतून अवैध मासेमारीचा अचूक वेध; ३५ हून अधिक अवैध बोटींवर कारवाई

    21-Jan-2025   
Total Views |
 illegal fishing


मुंबई (अक्षय मांडवकर) -
अवघ्या दहा दिवसांमध्येच मत्स्यव्यवसाय विभागाने ड्रोन तपासणीच्या माध्यमातून अवैध मासेमारी करणाऱ्या ३० बोटींचा वेध घेतला आहे (illegal fishing). या बोटींवर 'महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमा'अंतर्गत प्रतिवेदन दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे (illegal fishing). अवैध मासेमारीवर चाप लावण्यासाठी ९ जानेवारीपासून मत्स्यव्यवसाय विभागाने ड्रोन आधारित निरीक्षण प्रणाली कार्यान्वित केली आहे. (illegal fishing)
 
 
मत्स्यव्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी अवैध मासेमारीसंदर्भात कडक भूमिका घेतल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. ९ जानेवारी रोजी राणे यांनी राज्याच्या किनारपट्टीवर अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण प्रणाली कार्यान्वित केली. याअंतर्गत महाराष्ट्राच्या सात जिल्ह्यांमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाने ड्रोनचे प्रत्येकी एक युनिट सक्रिय केले आहे. यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. यासाठी नऊ ‘ड्रोन’ भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहेत. किनारपट्टीपासून १२ सागरी मैलांचे अंतर इतकी एका ’ड्रोन’ची कार्यकक्षा आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये या ड्रोन सर्वेक्षण प्रणालीने अवैध मासेमारी करणाऱ्या ३० बोटींचा अचूक वेध घेतला आहे.
 
 
ड्रोन सर्वेक्षणामधून विहित कक्षेत पर्ससीन मासेमारी न करणाऱ्या नौका, एलईडी प्रकाशदिवे वापरणाऱ्या नौका, बूम विंच या यंत्राच्या आधारे मासेमारी करणाऱ्या नौका, ट्रॉलर नौका असूनही त्यावर एलईडी प्रकाशदिवे बसवलेल्या नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर काही नौका डिजेल इंधानाची अवैध वाहतूक करत असल्याने देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. गील नेट पद्धतीचे जाळे वापरुन नाव आणि क्रमांक नसलेल्या नौका वापरणाऱ्यांवर देखील ड्रोन सर्वेक्षणाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.
 
 
मासेमारीचे निकष
महाराष्ट्राच्या १२ सागरी मैल क्षेत्र हे पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रात पर्ससीन मच्छीमार सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी वगळता मासेमारी करु शकत नाही. झाई ते मुरुडपर्यंतचा परिसर हा पारंपारिक मच्छीमारांसाठी राखीव असून या परिसरात कोणत्याच कालावधीत पर्ससीन, मिनी पर्ससीन, रिंग सीन या नौका मासेमारी करु शकत नाहीत. मुरुड ते बुरुंडी परिसरादरम्यान १० मीटरच्या खोलीच्या पलीकडे, बुरंडी ते जयगडच्या परिसरात २० मीटर खोलीच्या पलीकडे आणि जयगड ते बांदा दरम्यानच्या परिसरात २५ मीटर खोलीच्या पलीकडे पर्ससीन नौकांना मासेमारी करण्याला परवानगी आहे. याशिवाय एलईडी प्रकाशदिव्यांचा वापर करुन आणि हायड्राॅलिक विंच म्हणजेच बूम विंच वापरुन मासेमारी करण्यावर पूर्णपणे बंदी आहे.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.